चित्रीकरणाच्या परवानग्यांसाठी आता ‘एक खिडकी योजना’

चित्रीकरणाच्या परवानग्यांसाठी आता ‘एक खिडकी योजना’

मंत्री जयकुमार रावल यांनी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना सुपुर्द केली जीआरची प्रत

 राज्यात विविध स्थळांवर होणारी चित्रपट निर्मिती, टीव्ही मालिका, जाहीरातपट, माहितीपट आदींच्या चित्रीकरणासाठी आता विविध विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळणार आहेत. या परवानग्या सुलभरीतीने आणि ठराविक मुदतीमध्ये मिळण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ कार्यान्वित करण्यात आली असून पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नुकताच त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला. राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज मंत्रालयात या शासन निर्णयाची प्रत सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना सुपुर्द केली.


हा शासन निर्णय बॉलीवूड आणि टिव्ही क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचा असून त्यामुळे महाराष्ट्रात विविध प्रकारच्या चित्रीकरणाला मोठी गती मिळेल. त्याचा राज्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीनेही मोठा लाभ होईल, अशी प्रतिक्रिया यावेळी दिग्दर्शक श्री. आशुतोष गोवारीकर यांनी दिली.

      दिग्दर्शक श्री. आशुतोष गोवारीकर यांनी आज मंत्रालयात पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी बॉलीवूडचा सहभाग कसा मिळेल, या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. या बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजय गौतम, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, सरव्यवस्थापक श्रीमती स्वाती काळे, उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.

बॉलीवूड टुरीजमवर मोठा भर - जयकुमार रावल

मंत्री श्री. रावल यावेळी म्हणाले की, मुंबईतील बॉलीवूड हे महाराष्ट्राचे एक भूषण आहे. देशासह आशिया खंड आणि जगभरातील लोकांना बॉलीवूडचे मोठे आकर्षण आहे. याचा उपयोग देश – विदेशातील पर्यटकांना मुंबई आणि महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी केला जाईल. निर्माते - दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यासह बॉलीवूडमधील इतर अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शकांनी याकामी सकारात्मकता दाखविली आहे. त्यांच्या सहाय्याने येत्या काळात बॉलीवूड टुरीजमवर मोठा भर देण्यात येईल, असे ते म्हणाले.

बॉलीवूड, टिव्ही क्षेत्रासाठी महत्वाचा निर्णय – आशुतोष गोवारीकर

चित्रपट दिग्दर्शक श्री. गोवारीकर यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राच्या भूमीत मोठी क्षमता आहे. येथील चित्रीकरणस्थळे बॉलीवूडला नेहमीच आकर्षित करीत असतात. पण बऱ्याच वेळा आवश्यक परवानग्या न मिळाल्याने ऐनवेळी चित्रीकरणस्थळे बदलावी लागतात. पण राज्य शासनाने आता चित्रीकरणासाठी एक खिडकी योजनेद्वारे विविध परवानग्या एकाच ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलीवूडला महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी या निर्णयाचा मोठा फायदा होईल, असे ते म्हणाले.

‘आती क्या खंडाला’ गाण्याचा प्रभाव

दिग्दर्शक श्री. गोवारीकर म्हणाले की, १९९० च्या दशकात आलेल्या गुलाम चित्रपटातील ‘आती क्या खंडाला’ या गाण्यामुळे त्या काळात खंडाळ्याच्या पर्यटनात मोठी वाढ झाली होती. देशभरात बॉलीवूडच्या असलेल्या प्रभावाचा हा परिणाम होता. देशासह जगभरात बॉलीवूडची मोठी लोकप्रियता असून त्याचा महाराष्ट्राच्या पर्यटनवाढीच्या दृष्टीने उपयोग करुन घेणे गरजेचे आहे. बॉलीवूड यासाठी निश्चितच योगदान देईल, असे ते म्हणाले.

शासन निर्णयातील ठळक बाबी –

·        १५ दिवसांत मिळणार परवानग्या

·        महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी ही संनियंत्रण संस्था

·        शासकीय जागांवरील स्थळांसाठी मिळणार परवानग्या

·        निर्मात्यांनी परवानग्यांसाठी www.maharashtrafilmcell.com या वेबपोर्टलवर अर्ज करणे आवश्यक

·        प्रथम टप्प्यात मुंबई शहर आणि उपनगराकरीता एक खिडकी योजना लागू.

·        टप्प्याटप्प्याने उर्वरीत महाराष्ट्राकरीता योजना लागू होणार

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy