इंडिया-अफगाणिस्तान इंटरनॅशनल ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट शो'चे मुंबईत आयोजन
इंडिया-अफगाणिस्तान इंटरनॅशनल ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट शो'चे
मुंबईत आयोजन
~ अफगाणिस्तानातील उद्योगांशी व्यावसायिक संबंध जोडण्यासह गुंतवणुकीच्या संधी होणार प्राप्त ~
युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएड), भारत सरकार आणि अफगाणिस्तान सरकारतर्फे दुसऱ्या "पॅसेज टू प्रॉस्परिटीः इंडिया-अफगाणिस्तान इंटरनॅशनल ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट शो"ची घोषणा करण्यात आली. या व्यापारी संमेलनासाठी अफगाणिस्तान, भारत आणि आंतरराष्ट्रीय उद्योगजगतातील ६००हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात अफगाणिस्तानातील उत्तम कापड, गालिचे, जवाहिरे आणि दागिने आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसाठी उपलब्ध असणार आहेत. हा कार्यक्रम १२ ते १५ सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुंबईतील जेडब्ल्यू मॅरिअट मुंबई सहार हॉटेल येथे आयोजित करण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर २०१८ म्हणजेच या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस सर्वांसाठी खुला असेल. या दिवशी अफगाणिस्तानातील व्यापारी त्यांच्या उत्पादनांचा नमुना थेट ग्राहकांना विकू शकतील.
उत्पादन विक्रीबरोबरच या कार्यक्रमात उद्योगांना भागीदारी करण्याची, गुंतवणूकीच्या संधी जाणून घेता येतील आणि विविध क्षेत्रांमध्ये परस्परपूरक ठरणाऱ्या उद्योजकांना एकमेकांची भेट घेता येईल. या निमित्ताने कृषी, उर्जा, आरोग्यसेवा, उच्चशिक्षण, खनिकर्म, अवजड उद्योग इत्यादी क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध होणार आहेत. उद्योगांना एकमेकांशी जोडण्यासाठी भारतीय अभ्यागत अफगाणिस्तानातील भागधारकांना नावीन्यपूर्ण बिझनेस मॉडेल्सविषयी माहिती देणार आहेत. यात महिला उद्योजकांवर भर असलेले उद्योग विकसित करण्याबाबतही चर्चा करण्यात येणार आहे.
या तीन दिवसीय कार्यक्रमात अभ्यागत विविध परिसंवादांमध्ये सहभागी होतील. यात 'डुइंग बिझनेस इन अफगाणिस्तान' (अफगाणिस्तानातील व्यवसाय संधी) या विषयाचाही समावेश आहे. या निमित्ताने जे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योग अफगाणिस्तानात कार्यरत आहेत ते आपला अनुभव उपस्थितांना सांगणार आहेत.
भारतातील अफगाणिस्तानचे राजदूत डॉ. शाइदा मोहम्मद अब्दाली म्हणाल्या, "यूएसएडच्या सहकार्याने अफगाणिस्तानला आपला व्यापार आणि निर्यात यंत्रणा पुनर्स्थापित करता आल्या आहेत. अफगाण निर्यातीसाठी एअर कार्गो अधिक वेगवान आणि रस्ते वाहतुकीच्या तुलनेने किफायतशीर आहे. २०२० सालापर्यंत भारत आणि अफगाणिस्तानातील द्विपक्षीय व्यापाराची उलाढाल २ अब्ज डॉलरहून अधिक असेल. पॅसेज टू प्रॉस्परिटीच्या माध्यमातून अफगाणिस्तान आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संबंध विकसित होतील आणि व्यापाराच्या एकात्मिकरणात सुधारणा होईल."
Comments
Post a Comment