इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा भारताचे माननीय राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान
इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा
भारताचे माननीय राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान
आयआयएसएम: माजी भारतीय क्रिकेटर श्री. निलेश कुलकर्णी यांनी सुरु केलेल्या या संस्थेला क्रीडा शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रणी कामगिरी बजावल्याबद्दल राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार बहाल
मुंबई, २९ ऑगस्ट, २०२०: इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट (आयआयएसएम) या माजी भारतीय क्रिकेटर श्री. निलेश कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या, क्रीडा व्यवस्थापन क्षेत्रात अग्रणी कामगिरी करत असलेल्या संस्थेला भारताचे माननीय राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. आयआयएसएमने क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन आणि विकास यादृष्टीने केलेल्या लक्षणीय कार्यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.
आयआयएसएमच्या वतीने श्री. कुलकर्णी यांनी मंत्रालयात पार पडलेल्या एका व्हर्च्युअल समारंभात हा पुरस्कार स्वीकारला. आजवरच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे (२०२०) आयोजन व्हर्च्युअली करण्यात आले, माननीय राष्ट्रपती दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथून या समारंभात सहभागी झाले.
क्रीडा व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील अग्रणी उपक्रम आयआयएसएमची स्थापना क्रिकेटपटू श्री. निलेश कुलकर्णी व त्यांच्या पत्नी श्रीमती रसिका यांनी दहा वर्षांपूर्वी केली. निलेश यांनी भारतासाठी तीन कसोटी व १० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहेत. अंधेरी येथे असलेल्या या आयआयएसएममध्ये पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम चालवले जातात. देशात आजवर न रुळलेल्या क्रीडा व्यवस्थापन शिक्षणाच्या नव्या दिशा खुल्या करण्याचे काम ही संस्था करत आहे.
प्रतिष्ठेचा राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. निलेश कुलकर्णी यांनी सांगितले, "क्रीडा व्यवस्थापन क्षेत्रातील योगदानासाठी आयआयएसएमला हा गौरव प्राप्त होणे ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. भारतात क्रीडा व्यवस्थापनामध्ये हा अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम आहे आणि याची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. क्रीडा उद्योगामध्ये उत्तम करिअर घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये प्रदान करून सक्षम बनवण्याच्या आमच्या कामात हा पुरस्कार अतिशय मोलाचा व प्रेरणादायी ठरणार आहे."
आयआयएसएमने आपल्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक उपक्रम सर्वात आधी सादर केले आहेत:-
- मुंबई विद्यापीठ आणि जीआयसीईडी यांच्या सहयोगाने पदवीपूर्व आणि पदव्युत्तर प्रोग्रॅम्स सादर करणारी भारतातील पहिली व्यावसायिक क्रीडा व्यवस्थापन संस्था
- देशातील सर्व अव्वल क्रीडापटूंच्या सहभागासह चित्रित करण्यात आलेल्या भारतीय राष्ट्रगीताची निर्मिती सर्वात पहिल्यांदा आयआयएसएमने केली.
- पहिल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२० आणि खेलो इंडिया युथ गेम्स २०२० चे नॉलेज पार्टनर म्हणून कामगिरी बजावताना आयआयएसएमच्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही स्पर्धांसाठी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स (एसओपी) तयार केल्या.
- आयआयएसएमने स्पोर्ट्स अकॅडेमिया रिसर्च जर्नल या भारतातील सर्वात पहिल्या स्पोर्ट्स रिसर्च जर्नलची सुरुवात केली. हा उपक्रम इंटरनॅशनल ऑनलाईन जर्नल इन्साईड जर्नलच्या सहयोगाने चालवला जातो. आयआयएसएमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले पाच अहवाल एसएआरजेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
- माजी बीसीसीआय चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर प्रोफेसर रत्नाकर शेट्टी यांच्या सहयोगाने आयआयएसएमने 'क्रिकेट वर्ल्ड कप २०११ रिपोर्ट' हा भारतातील पहिला रिपोर्ट सादर केला.
- आयआयएसएम विद्यार्थ्यांनी भारतातील क्रीडा पायाभूत सोयीसुविधांवर (स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडिया) अहवाल तयार केला आहे.
- एफआयसीसीआयच्या सहयोगाने आयआयएसएमने 'स्पोर्ट्स डेव्हलपमेंट अँड युथ एंगेजमेंट' हा नॉलेज रिपोर्ट सादर केला.
- इंडिया टुडे, असोचॅम अँड वर्ल्ड एज्युकेशन समिट, साऊथ एशियन पार्टनरशिप समिट व बिझनेस एक्सेलन्स अवॉर्ड्स यासारख्या अनेकांनी आयआयएसएमला 'सर्वोत्तम क्रीडा व्यवस्थापन संस्था' म्हणून गौरवले आहे.
- आयआयएसएमने १००% इंटर्नशिप्स मिळवून देण्यात आणि सातत्याने चांगला प्लेसमेंट रेकॉर्ड राखण्यात यश मिळवले आहे. आयआयएसएमचे विद्यार्थी बीसीसीआय, आयएमजी रिलायन्स, स्टार स्पोर्ट्स, ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट, एफआयसीसीआय, राजस्थान रॉयल्स, स्पोर्ट्झ इंटरॅक्टिव्ह आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया यासारख्या स्पोर्ट्स फेडरेशनमध्ये काम करत आहेत.
Comments
Post a Comment