जास्त जोखीम असलेल्या गर्भवतींनी घेण्याची काळजी

 

जास्त जोखीम असलेल्या गर्भवतींनी घेण्याची काळजी

 

डॉ. गंधाली देवरुखकर, स्त्रीरोगतज्ज्ञ, वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल

 


सध्याची जीवनशैली आणि कामाचे स्वरुप पाहता अनेक महिला जास्त जोखीम असलेल्या गर्भावस्थेतून जात असतात. तुम्ही जास्त जोखीम असलेल्या गर्भावस्थेतून जात असाल तर भावनिक उतार-चढाव होणे साहजिक आहे. चिंतातुरता आणि तणाव हे अपरिहार्य असले तरी या जास्त जोखीम असलेल्या गर्भावस्थेचा जास्त त्रास करून घेण्याची आवश्यकता नाही. अप्रतिम वैद्यकीय सुविधा आणि नियमित जन्मपूर्व आरोग्यसेवांचा विकास झाल्यामुळे जास्त जोखीम असूनही तुमचे बाळ सुदृढ असू शकते आणि प्रसूत सुरक्षित असू शकते.

 

सुदृढ बाळासाठी खाली काळज्या तुम्ही घ्यायच्या आहेत.

 

  1. स्वीकार

जास्त जोखीम असलेली गर्भावस्था हाताळण्याची पहिली पायरी म्हणजे या परिस्थितीचा स्वीकार करणे. आपल्याला जास्त जोखीम असलेली गर्भावस्था आहे हे माहीत असेल तर तुम्ही अधिक जागरुक असता आणि ही परिस्थिती हाताळण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार असता. तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जाणार आहात हे तुम्हाला माहीत असते. यात होणाऱ्या गुंतागुंतीचीही तुम्हाला जाणीव असते. तुम्ही ही परिस्थिती आहे हे मान्यच केले नाही तर तुम्ही यातील धोके समजू शकणार नाही आणि आवश्यक उपचार तुमच्यावर होणार नाहीत.

 

  1. विश्वास

जास्त जोखीम असलेली गर्भधारणा हाताळण्याची गुरूकिल्ली म्हणजे तुमच्या डॉक्टरवर विश्वास ठेवणे. तुमचे डॉक्टर तुमचे हित चिंततात आणि त्यानुसार सल्ला देतात यावर विश्वास ठेवा. इंटरनेटवरील लेख वाचणे किंवा नातेवाईक किंवा मित्रमंडळींच्या अनाहूत सल्ला ऐकून विनाकारण गुंतागुंत वाढू शकते. तुम्ही केवळ तज्ज्ञांचाच सल्ला घ्यावा. ऑनलाइन अनावश्यक माहिती वाचणे आणि मनाचा गोंधळ वाढविणे टाळा.

 

  1. सातत्य

तुमच्या व्यवस्थापन नियोजनात सातत्य ठेवा. तुमची औषधे वेळेवर घ्या. कोणतीही सप्लिमेंट्स चुकवू नका. हे सर्व घटक तुमच्या सुदृढ बाळाच्या वाढीसाठी गरजेची आणि महत्त्वाचे असतात. काही साइड इफेक्ट्स उद्भवले तर लगेचच तुमच्या डॉक्टरना कळवा. कोणताही त्रास होत असेल तर डॉक्टरना कळविण्यास कचरू नका. तुमच्या जास्त जोखीम असलेल्या गर्भावस्थेत तुम्हाला कोणत्या समस्या जाणवत आहेत, ते विस्तृतपणे सांगा.

 

  1. काटेकोर नियंत्रण

आहार हा निरोगी जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग असतो. तुमची जास्त जोखीम असलेली गर्भधारणा पाहता सकस आहार अधिकच गरजेचा ठरतो. प्रत्येक तलफ भागविण्याच्या मोहात पडू नका. प्रमाणात आहार घेणे महत्त्वाचे आहे. तुमचा आहारावर नियंत्रण ठेवा आणि स्निग्ध साखरयुक्त पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवा. जंक फूड पूर्णपणे वर्ज्य करा. गर्भलिंग मधुमेह असेल तर तुम्हाला साखर पूर्ण वर्ज्य करावी लागेल. गरोदरपणात उच्च रक्तदाब म्हणजेच एक्लेम्प्सिया आणि प्रि-एक्लेम्प्सिया असेल तर मीठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला पूर्ण विश्रांती घेण्यासही सांगितले जाऊ शकते. अतिरिक्त मीठ साखर शरीरात जाऊ नये यासाठी आहाराचे पथ्य पाळणे हितकारक असते.

 

  1. नियमित व्यायाम

व्यायामामुळे शरीर मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या फिट राहते. पण तुम्हाला जास्त जोखीम असलेली गर्भधारणा असेल आणि प्लॅसेंटाने गर्भाशयाचा अंशतः किंवा पूर्ण भाग आच्छादला असेल तर योगासने प्रसवपूर्व व्यायाम करू नये. तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि तुमच्यासाठी योग्य असलेले व्यायाम निवडा आणि ते नियमितपणे करा.

 

 

 

  1. दक्षता

तुमची लक्षणे समजून घ्या. संभाव्य गुंतागुंतीचे साइड इफेक्ट्स आणि लक्षणे समजून घ्या. जणेकरून तुम्ही तुमच्या डॉक्टरांना लगेचच सांगू शकता. कोणत्याही प्रकारचे स्पॉटिंग (योनीतून किंचित रक्तस्त्राव होणे) किंवा रक्त जात असल्याचे किंवा बाळाच्या हालचाली कमी होऊन अचानक वेदना होऊ लागली तर लगेचच स्त्रीरोगतज्ज्ञांना कळवा. त्यामुळे तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यावर गुंतागुंत टाळू शकाल.

 

  1. सज्जता

प्रसूतीनंतर आवश्यक असलेल्या सर्व गरजेच्या वस्तू तयार ठेवा. जास्त जोखीम असलेली गर्भावस्था असेल तर तुमची प्रसूती कधीही होऊ शकत असल्यामुळे तुमची हॉस्पिटल बॅग आधीच भरून ठेवून तयार राहा. बहुतांश प्रकरणांमध्ये उत्तरलक्षी प्रसूती नियोजन तयार असते. पण इमर्जन्सी उद्भवली तर शेवटच्या क्षणी धावपळ होता तुम्ही जाण्यास तयार असाल.

 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला आधार देणारी माणसे सोबत असावी. तुमची ज्या व्यक्तीला सर्व काही सांगू शकता आणि तुमच्या सर्व चिंता व्यक्त करू शकता अशी व्यक्ती तुमच्यासोबत असणे आवश्यक आहे. त्यांनी तुमचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे आणि तुम्हाला शांत आणि तणावमुक्त राहण्यास मदत केली पाहिजे. तुमच्या शरीराचे आणि बाळाचे म्हणणे समजून घ्या. ते तुम्हाला योग्य दिशेला जाण्यास मार्गदर्शन करतील. स्त्रीरोगतज्ज्ञांची नियमित भेट घ्या आणि तुमच्या सर्व शंकांचे निरसन करून घ्या. निरोगी गर्भधारणेसाठी आणि गुंतागुंतरहीत प्रसूतीसाठी आनंदी राहा आणि हसत राहा. लक्षात ठेवा, तणावमुक्त गरोदरपणा हा आनंदी गरोदरपणा असतो.

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App