रस्ते अपघातांतील रुग्णांवर उपचार करताना डोळ्याच्या दुखापतींकडे अधिक लक्ष देण्याचे तज्ज्ञांचे आवाहन
रस्ते अपघातांतील रुग्णांवर उपचार करताना डोळ्याच्या दुखापतींकडे
अधिक लक्ष देण्याचे तज्ज्ञांचे आवाहन
देशात होणाऱ्या रस्ते अपघातांमध्ये डोळ्यांना दुखापती होण्याची टक्केवारी लक्षणीय आहे, त्यामुळे बहुसंख्य रुग्णांना दृष्टी गमवावी लागते. मात्र, गाडी चालवताना काही साधे खबरदारीचे तसेच सुरक्षिततेचे उपाय केल्यास हे टाळण्याजोगे असते, असे मुंबईच्या आदित्य ज्योत आय हॉस्पिटलमधील सर्जन्सचे मत आहे. आदित्य ज्योत आय हॉस्पिटल हा डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल ग्रुपचा एक भाग आहे. सध्या चाललेल्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षितता सप्ताहादरम्यान तज्ज्ञांनी हे मत मांडले.
भारतात नोंदवल्या जाणाऱ्या एकूण नेत्र दुखापतींमध्ये रस्ते अपघातांमध्ये झालेल्या नेत्र दुखापतींचे प्रमाण 34% असल्याचा अंदाज आहे. डोळे खूपच संवेदनशील, जटील आणि नाजूक इंद्रीय आहे. ड्रायव्हिंग करताना होणाऱ्या अपघातांमुळे डोळ्यांचे नुकसान होण्याची शक्यता मोठी असते. डोळ्यांवर आघात झाल्यामुळे, पापण्या, कॉर्निया (डोळ्यातील बाहुलीचा पडदा), कक्षीय भित्तीका (ऑर्बिटल वॉल), बुबुळातील पांढरा बाह्यस्तर (स्क्लेरा), डोळ्याचे रक्षण करणारा पडदा (कंजंक्टिव्हा) आदी भागांना हानी पोहोचते. यामुळे डोळ्यातील ग्लोब फुटणे, रेटिना विलग होणे, दृष्टीपेशींना ईजा होणे, डोळ्यातील जेलसारखा प्रवाही पदार्थ (व्हिटरस) गळणे किंवा कमी होणे, यांसारख्या अवस्था निर्माण होऊ शकतात. यातील बहुतेक अवस्थांमुळे दृष्टी जाण्याचा धोका असतो, असा इशारा नेत्रविकार तज्ज्ञ देतात.
रुग्णालयांच्या आपत्कालीन विभागांत रस्ते अपघातांमधील रुग्णांवर उपचार करताना डोळ्यांकडे अधिक लक्ष दिले जावे असे आवाहन करताना, डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल ग्रुपचा भाग असलेल्या मुंबईतील आदित्य ज्योत आय हॉस्पिटलच्या क्लिनिकल सेवा विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. एस नटराजन म्हणाले, “जेव्हा रस्ते अपघातातील रुग्णांना रुग्णालयात आणले जाते, तेव्हा ट्रॉमा सर्जन्स रुग्णांचे डोळे सर्वांत शेवटी तपासतात. रुग्णाचे प्राण वाचवण्याच्या दृष्टीने त्यांचा भर फ्रॅक्चर्स, डोक्यावर झालेले आघात यांच्यावर असतो. आघातामुळे झालेल्या दुखापतींमध्ये, विशेषत: डोक्यावर आघात झाला असेल, तर डोळ्यांचे काय नुकसान झाले आहे याची तपासणी लवकर केली पाहिजे. डोळ्याला हानी झाल्याची शंका आल्यास ऑप्थल्मोलॉजिस्टना तातडीने बोलावले पाहिजे. अगदी रुग्ण कोमात असला तरी हे केले गेले पाहिजे.”
“रुग्णालयांतील आपत्कालीन विभागांतील मानसिकता व उपचारांचे नियम यांत बदल करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून, रुग्ण दाखल झाल्यानंतर अन्य इंद्रियांप्रमाणेच डोळ्यांकडेही लक्ष दिले जाऊ शकेल. सध्या हे घडत नाही आहे. उदाहरणार्थ, डोक्याला दुखापत झाल्यास मेंदूविकार तज्ज्ञांना तत्काळ रुग्णाला तपासण्यासाठी बोलावले जाते, पण नेत्रविकार तज्ज्ञांना क्वचितच बोलावले जाते. रस्ते अपघातातील रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे, जेणेकरून, आय ट्रॉमा स्पेशालिस्टद्वारे डोळ्यांना नुकसान पोहोचल्याच्या लक्षणांकडे तातडीने लक्ष दिले जाऊ शकेल,” असे डॉ. एस. नटराजन पुढे म्हणाले.
आज तंत्रज्ञान खूपच प्रगत झालेले आहे. जर कोर्नियाचा किंवा रेटिनाचा केंद्रबिंदू व दृष्टीशी संबंधित पेशींना हानी झालेली नसेल, तर रुग्णाची दृष्टी वाचवली जाण्याची शक्यता खूप असते, असे प्राध्यापक डॉ. एस. नटराजन म्हणाले. प्रतिबंध उपचारांहून नेहमीच उत्तम असतो असे सांगून ते पुढे म्हणाले, “वाहन चालवताना लोकांनी हेल्मेट, सीट बेल्ट, हेड रेस्ट व एअरबॅग्ज आदी संरक्षक साधनांचा पुरेपूर वापर केला पाहिजे. गाडी चालवताना स्टीअरिंग व्हील व ड्रायव्हर यांच्या मध्ये कोणतीही वस्तू येणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास ड्रायव्हिंग करताना गॉगल्स वापरावेत. कारच्या पुढील सीटवर पालकांपैकी कोणाच्या तरी मांडीवर छोटे मूल ठेवण्याची पद्धत आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आढळते. हे काटेकोरपणे टाळले पाहिजे,” असे ते म्हणाले.
Comments
Post a Comment