50 व्या वाढदिवसानिमित्त महिलेला मिळाले नवजीवनाचे गिफ्ट
50 व्या वाढदिवसानिमित्त महिलेला मिळाले नवजीवनाचे गिफ्ट
मधुमेहासाठीच्या शस्त्रक्रियेमुळे मिळाली त्रासातून आणि कटकटीपासून सुटका
मुंबई, 15 फेब्रुवारी 2023 :- मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या सौ.वीणा या गेली 2-3 वर्षे मधुमेहाच्या त्रासामुळे प्रचंड त्रस्त झाल्या होत्या. इन्सुलिनसह मधुमेहासाठीची औषधे त्या नियमितपणे घेत होत्या. मात्र तरीही त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येत नव्हती.
मधुमेहामुळेत्यांच्या खाण्या-पिण्यावरही बरेच निर्बंध आले होते. वीणा यांनी मुंबई सेंट्रल इथे असलेल्या वोक्हार्ट रुग्णालयातील डॉ.रमण गोयल यांचा सल्ला घेण्याचं ठरवलं होतं. डॉ.गोयल हे वोक्हार्ट रुग्णालयातील मधुमेह आणि बॅरिआट्रीक शल्यचिकीत्सा विभागाचे संचालक आहेत. डॉ. गोयल यांनी सांगितले की, "जेव्हा सौ.वीणा त्यांच्याकडे तपासणीसाठी आल्या होत्या तेव्हा त्यांचा मधुमेह नियंत्रणात नव्हता आणि त्यांना बऱ्याच कटकटींना सामोरे जावे लागत होते. वोक्हार्ट रुग्णलायात पुढील उपचारासाठी आलेल्या सौ.वीणा या स्वत: परिचारिका म्हणून काम करतात. त्या मधुमेह नियंत्रणात राहावा यासाठी 5 प्रकारची औषधे घेत होत्या, ज्यात इन्सुलिनचाही समावेश आहे. ही औषधे घेतल्यानंतरही त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहात नव्हती. त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण काही खाण्यापूर्वी 240 च्या आसपास असायचे तर खाल्ल्यानंतर हीच पातळी 400 च्या आसपास असायची. तीन महिने HbA1c चाचणीतील पातळी ही 15 च्या आसपास होती."
मधुमेह काहीही केल्या नियंत्रणात येत नसल्याने वीणा यांनी मधुमेहासाठीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. वीणा यांना मधुमेहापासून मुक्ती मिळवून पूर्वीप्रमाणे सामान्य आयुष्य जगायचे होते. यासाठी त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. डिसेंबर 2022 च्या अखेरच्या आठवड्यात वीणा यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतरच्या तिसऱ्या दिवसापासून त्यांचे इन्सुलिन बंद करण्यात आले आणि दिवसाला केवळ एका गोळीमुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी ही 100 ते 200 च्या मध्ये राहू लागली.
डॉ.गोयल यांनी पुढे म्हटले की "आतापर्यंतची प्रसिद्ध करण्यात आलेली आकडेवारी आणि माहिती पाहिल्यास दिसून येते की, शस्त्रक्रियेनंतर 80 टक्के मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते आणि त्यांना औषधांचीही गरज भासत नाही. शस्त्रक्रियेच्या 10 वर्षानंतर 36 टक्के रुग्णांना कोणत्याही औषधाशिवाय रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण मिळवणं या शस्त्रक्रियेमुळे शक्य होतं. ब्रेन स्ट्रोक, मूत्रपिंडे निकामी होणे, डोळ्यांच्या समस्या उद्भवणे, हृदय विकार यासारख्या मधुमेहामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर मात करणं देखील या शस्त्रक्रियेमुळे शक्य होतं."
या शस्त्रक्रियेबाबत बोलताना सौ.वीणा म्हणाल्या की, "जानेवारी महिन्यात माझा वाढदिवस 50 वा वाढदिवस होता. पन्नाशीनंतर सामान्य आयुष्य जगता यावे ही माझी इच्छा होती, ज्यामुळे मी ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेनंतर मी इन्सुलिन घेणं पूर्णपणे बंद केलं. शस्त्रक्रियेनंतर माझी रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात आली. मला आता दिवसाला 1 किंवा 2 गोळ्या घ्याव्या लागतात. शस्त्रक्रियेला आता जवळपास 40-50 दिवस झाले असून पुढच्या काही दिवसात मी मधुमेहापासून पूर्णपणे मुक्ती मिळवेन याची मला खात्री आहे. शस्त्रक्रियेनंतर मला आता छान आणि निरोगी वाटायला लागलं आहे. धाप न लागता मी आता पायऱ्या चढू शकते. मला हे नवीन आयुष्य दिल्याबद्दल मी वोक्हार्ट रुग्णालय आणि डॉ.गोयल यांची मनापासून आभारी आहे."
मधुमेहासाठीची शस्त्रक्रिया ही जास्त चिरफाड न करता केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेमुळे इन्सुलिनला निर्माण होणारा अडथळा कमी होण्यास मदत होते. या शस्त्रक्रियेमुळे शरीरातील इन्सुलिन निर्मिती मूळ पदावर येण्यास मदत होते, ज्यामुळे खाल्ल्यानंतरही रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. आजकाल ही शस्त्रक्रिया मधुमेहापासून सुटका मिळवण्यासाठीचा प्रभावी उपचार म्हणून ओळखली जाते. अमेरिकन डायबिटीज असोसिएशन, इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन आणि अन्य संघटनांनी 27.5 kg/m2 पेक्षा जास्त बीएमआय असलेल्या आणि मधुमेह नियंत्रणात नसलेल्या आशियाई रूग्णांना या शस्त्रक्रियेचा सुचवली आहे. डॉ.गोयल यांनी म्हटले आहे की,"या शस्त्रक्रियेमुळे एकीकडे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येते, मधुमेहासाठीच्या औषधांपासून मुक्ती मिळते, मधुमेहाशी निगडीत अन्य समस्या दूर होतात तर दुसरीकडे रुग्णाचे आयुर्मान 5 ते 9 वर्षांनी वाढण्यास मदत होते."
Comments
Post a Comment