वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या 81 व्या बैठकीचे मुंबईत 2 ते 5 डिसेंबर दरम्यान आयोजन
वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या
81 व्या बैठकीचे मुंबईत 2 ते 5 डिसेंबर दरम्यान आयोजन
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल बैठकीचे उद्घाटन करणार
35 देशांचे 400 पेक्षा जास्त प्रतिनिधी बैठकीत सहभागी होण्याची शक्यता
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने 2 ते 5 डिसेंबर 2023 दरम्यान मुंबईमध्ये जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीची (आयसीएसी) 81 वी पूर्ण सत्र बैठक आयोजित केली आहे. वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयाने, भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय), भारतीय वस्त्रोद्योग महासंघ (सीआयटीआय), आणि भारतीय कापूस संघटनेच्या (सीएआय) सहयोगाने ही बैठक आयोजित केली आहे. जवळजवळ 8 वर्षांनंतर या कार्यक्रमाचे आयोजन करणे, ही भारतासाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे.
केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल, 2 डिसेंबर 2023 रोजी मुंबईमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे दुपारी दोन वाजता या बैठकीचे उद्घाटन करतील.
चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत विविध कापूस उत्पादक आणि ग्राहक देश/प्रदेशातील सरकारी प्रतिनिधी, प्रतिष्ठित उद्योगपती, महत्वाचे व्यावसायिक प्रतिनिधी, नामवंत शास्त्रज्ञ आणि संशोधक यासह जगभरातील 35 देशांचे 400 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. कोविड-19 महामारीमुळे, 2019 नंतर आयोजित केली जाणारी संपूर्ण समितीची ही पहिलीच बैठक असेल. भारताने 2015 मध्ये यापूर्वीचा कार्यक्रम आयोजित केला होता. फ्रॉम फार्म टू फॅब्रिक: मेनी फेसेस ऑफ कॉटन’, अर्थात, ‘शेतीपासून कापडा पर्यंत: कापसाची अनेक रूपे’, या संकल्पनेवरील या कार्यक्रमात मूल्य-वर्धनावर विशेष भर देण्यात आला होता. हीच संकल्पना पुढे नेत, तिला अर्थशास्त्रापासून पर्यावरणापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या सहा दशकांमध्ये भारतात आयसीएसीची पूर्णसत्र बैठक आयोजित करण्याची ही पाचवी वेळ आहे.
आयसीएसी ही संयुक्त राष्ट्रांची मान्यता असलेली, कापसाचा अंतर्भाव असलेली आंतर-सरकारी संस्था आहे. 1939 मध्ये आयसीएसी ची स्थापना झाली आणि सध्या यामध्ये 28 सदस्य देशांचा समावेश आहे. भारतासह ब्राझील, इजिप्त, फ्रान्स, सुदान आणि अमेरिका हे या मंचाचे संस्थापक सदस्य आहेत. याशिवाय, आयसीएसी चे सदस्य नसलेले इतर देश देखील परिषदेत सहभागी होत आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2022 दरम्यान 80 वी सर्व सदस्यीय बैठक दूरदृश्य प्रणाली द्वारे आयोजित करण्यात आली होती. ‘नवोन्मेष आणि नेतृत्वाच्या माध्यमातून शाश्वततेला चालना देणे’, ही त्याची संकल्पना होती.
यंदाच्या बैठकीची संकल्पना, “कापूस मूल्य साखळी: जागतिक समृद्धीसाठी स्थानिक नवोन्मेष’, ही आहे. गतिमान आणि चक्राकार कापूस अर्थव्यवस्थेसाठी उत्पादकता, आणि हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता याबाबत जगभरातील नवोन्मेष, दर्जाची अपेक्षित पातळी, चांगल्या पद्धती आणि अनुभवाचे आदान प्रदान करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करणे, हे 81व्या बैठकीचे उद्दिष्ट आहे. यामध्ये स्थानिक नवोन्मेष आणि अत्याधुनिक तंत्रज्ञांवर लक्ष केंदित केले जाईल. स्थानिक पातळीवर विकसित करण्यात आलेली आणि जागतिक कापूस मूल्य साखळीवर परिणाम करण्याची क्षमता असलेली शाश्वतता तसेच उत्पादन, प्रक्रिया, व्यापार, फॅशन आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित लाखो लोकांचे जीवनमान सुधारणाऱ्या शाश्वततेवर यावेळी भर दिला जाईल.
या बैठकीत कापूस उद्योगाशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा होईल. यामध्ये उत्पादकता वाढवणारे तंत्रज्ञान, कापूस उत्पादनामध्ये आमुलाग्र बदल घडवणारा हवामान-अनुकूल नवोन्मेष, अलीकडील प्रभावी तांत्रिक प्रगती, वस्त्रोद्योगासाठी उद्योग 4.0, या मुद्यांचा समावेश असेल.
हा कार्यक्रम भारतातील कापूस आधारित वस्त्रोद्योगाची क्षमता, विकास आणि लवचिकता प्रदर्शित करण्याची, केस स्टडी, यशोगाथा, आणि लहान आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांनी हाती घेतलेले उपक्रम, कार्बन उत्सर्जन कमी करून उत्पादकता, शाश्वतता वाढवण्यासाठी हाती घेण्यात आलेले स्थानिक उपक्रम, यासारख्या गोष्टी प्रदर्शित करण्याची भारताला संधी देईल.
या बैठकीमध्ये कापूस अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंवरील दिवसभराच्या सत्रांचा समावेश असेल आणि त्यानंतर संध्याकाळी उद्योग आणि व्यापार क्षेत्रा द्वारे स्वागत समारंभ आणि मेजवानीचे आयोजन केले जाईल.
या चार दिवसांच्या आयसीएसीच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर, इच्छुक प्रतिनिधींसाठी 6 ते 8 डिसेंबर, 2023 दरम्यान अहमदाबाद इथली वस्त्रनगरी आणि आसपासच्या परिसरात तंत्रज्ञान विषयक दौरा आयोजित आयोजित करण्यात आला आहे.
प्रगती मैदान, नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि मेळावा केंद्रात 26 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत होणाऱ्या भारत टेक्स 2024 या जगातील सर्वात मोठ्या वस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यासाठीही भारत सज्ज आहे.
Comments
Post a Comment