भवानी शंकर रोड, दादर येथील 'ब्राह्मण सेवा मंडळा'चे शतकमहोत्सवी वर्षे!
भवानी शंकर रोड, दादर येथील 'ब्राह्मण सेवा मंडळा'चे शतकमहोत्सवी वर्षे!
शतकमहोत्सवी वर्षानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि
मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल!
अभिनेत्री मुक्ता बर्वे, सृहा जोशी, संकर्षण कऱ्हाडे यांचे मनोरंजनाचे विशेष कार्यक्रम!
ब्राह्मण सेवा मंडळाची स्थापना दि. १० डिसेंबर १९१६ रोजी झाली. तथापि पहिला श्री गणेशोत्सव ११ ते २० सप्टेंबर १९२६ रोजी ‘मुकुंद मॅन्शन’ मध्ये संपन्न झाला. व्याख्याने – प्रवचने – कीर्तन – भजनी मंडळाचे कार्यक्रम, मंत्रपुष्प – मंत्रजागर – सहस्त्रावर्तन असे कार्यक्रम त्या काळात संपन्न झाले. १९५० हे वर्ष गणेशोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्नांनी वर्गणी गोळा करून गणेशोत्सव दणक्यात साजरा केला होता. अनेक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये श्री. राम मराठे, श्रीमती. जयमाला शिलेदार इत्यादी मान्यवर सहभागी झाले. विसर्जनाच्या मिरवणुकीत पुढे भगवा ध्वज आणि त्याच्या मागे शिस्तबद्ध स्वयंसेवक अशी दादरकरांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी मिरवणूक आयोजित केली होती.
त्यानंतर १९७५ साली तर्कतीर्थ श्री. लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या हस्ते सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सवाचे उद्घाटन झाले. यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये डॉ. प्रभा अत्रे, प्रा. वसंत बापट, श्री. वि. दा. करंदीकर, श्री. मंगेश पाडगावकर इत्यादी मान्यवर सहभागी झाले. अमृतमहोत्सवी २००० साली गणेशोत्सवात शुभारंभ श्री. सच्चिदानंद शेवडे यांच्या प्रवचनाने झाली. श्री. रामदास कामत, श्रीमती. आशा खाडिलकर, श्री. चारुदत्त आफळे, श्री. दिलीप प्रभावळकर, श्री. प्रशांत दामले, श्री. राहुल देशपांडे, श्री. कौशल इनामदार इत्यादी अनेक कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. तसेच विविध स्पर्धांचेही आयोजन केले होते.
यंदाचा शतकमहोत्सवी गणेशोत्सव असल्यामुळे तो संस्मरणीय राहावा अशा प्रकारे साजरा करण्याचे संस्थेने ठरविलेले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम खालीलप्रमाणे आयोजित केले आहेत. श्रीं च्या आगमनाचा सोहळा, श्री गणेश याग, श्री गणेश अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन, महाप्रसाद व श्रींच्या विसर्जन सोहळ्याची पारंपारिक अशी भव्य मिरवणूक इत्यादी कार्यक्रम योजिले आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रम :
१) दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वा. ‘प्रिय भाई... एक कविता हवी आहे’, सादरकर्त्या : मुक्ता बर्वे आणि सहकलाकार.
२) दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वा. ‘ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’. वक्ते : मा. ले. ज. विनायक पाटणकर (नि.) व मा. ले. ज. एस. एस. हसबनीस (नि.), मुलाखतकार : जेष्ठ पत्रकार उदय निरगुडकर.
३) दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वा. ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’ - वक्ते : प्रद्योत पेंढारकर, मुलाखतकार : सर्वेश देशपांडे.
४) दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वा. स्मृतीगंध निर्मित, गौरी थिएटर प्रस्तुत, प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ सादरकर्ते : संकर्षण कऱ्हाडे व स्पृहा जोशी आणि सहकलाकार.
५) दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वा. पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी निमित्ताने माणिक वर्मा यांच्या सुमधुर गीतांवर आधारित कार्यक्रम ‘हसले मनी चांदणे’.
६) दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वा. वारकरी कीर्तन – ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज पाटील.
अश्या दररोज भरपूर कार्यक्रमांचा आस्वाद गणेशभक्त रसिकांना घेता येणार आहे.
Comments
Post a Comment