इफ्फी 2025 मध्ये एसआरएफटीआय- कोलकाता, एफटीआयआय- पुणे आणि एफटीआयआय- इटानगर या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी मास्टरक्लास मालिकेचा झाला प्रारंभ
इफ्फी 2025 मध्ये एसआरएफटीआय- कोलकाता, एफटीआयआय- पुणे आणि एफटीआयआय- इटानगर या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी मास्टरक्लास मालिकेचा झाला प्रारंभ
इफ्फी 2025 मध्ये प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्या एका सत्राने एका विशेष मास्टरक्लास मालिकेचा प्रारंभ झाला. कोलकात्यातील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एसआरएफटीआय), पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय), तसेच इटानगर येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) या संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी ही मालिका तयार करण्यात आली आहे. या तीन राष्ट्रीय चित्रपट संस्थांमधील उदयोन्मुख चित्रपट व्यावसायिकांना एकत्र आणून सहयोगात्मक शिक्षणाचा अनुभव देणे, हा या मालिकेचा उद्देश आहे.
या मालिकेची सुरुवात गोव्यातील कला अकादमीच्या ब्लॅक बॉक्स थिएटर येथे "द प्रोसेस ऑफ कास्टिंग" या विषयावरील एका विस्तृत सत्राने झाली. दंगल, छिछोरे, गँग्स ऑफ वासेपूर आणि बजरंगी भाईजान यासारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले मुकेश छाब्रा यांनी या सत्रात कास्टिंगची कला आणि प्रक्रियेची तपशीलवार माहिती दिली. कास्टिंग म्हणजे केवळ कलाकारांची निवड नव्हे तर प्रत्येक पात्राचे सखोल आकलन, खऱ्या अर्थाने योग्य प्रतिभेचा शोध, आणि चित्रपटाच्या भावनिक गाभ्याला दृढ करणाऱ्या अभिनयाची घडण, अशी ही एक व्यापक प्रक्रिया आहे.
दिग्दर्शकाचा दृष्टीकोन आणि अभिनेत्याच्या भाव व्यक्त करण्यात कास्टिंग कसे दुवा बनते, तसेच नवीन कलाकारांना शोधताना अंत: प्रेरणा, निरीक्षण आणि संवेदनशीलता किती महत्त्वाची असते, हे देखील त्यांनी अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांनी सत्रात सक्रिय सहभाग घेत उद्योगातील पद्धती, कॅरेक्टर ब्रेकडाऊन आणि ऑडिशन प्रक्रियेबद्दल प्रश्न विचारले आणि माहिती मिळवली. छाब्रा यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, शिस्त आणि कुतूहलाने चित्रपट क्षेत्राकडे पाहण्यास प्रोत्साहित केले. प्रत्येक भूमिका, मग ती मोठी असो किंवा लहान, चित्रपटाच्या व्यापक कथारचनेत योगदान देते, याची त्यांनी आठवण करून दिली. त्यांनी कास्टिंग पद्धतींबद्दलचे त्यांची अंतर्दृष्टी सामायिक केली, तसेच उदयोन्मुख कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांना कास्टिंगशी संबंधित करिअर मार्गदर्शन केले आणि व्यावहारिक टिप्स देखील दिल्या.
या सत्राने मास्टरक्लास मालिकेसाठी एक रचनात्मक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण केले. 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत ही मालिका सुरू राहणार आहे. पुढील काही दिवसांत दिग्दर्शन, पटकथालेखन, छायांकन, ध्वनी रचना आणि निर्मिती यासारख्या विविध क्षेत्रातील अग्रणी उद्योग तज्ज्ञ विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये आणि सर्जनशील आत्मविश्वास बळकट करण्यासाठी परस्परसंवादी सत्रे घेणार आहेत. उदयोन्मुख प्रतिभेचे संगोपन करण्यासाठी आणि चित्रपट निर्मात्यांच्या पुढच्या पिढीसाठी सहयोगी शिक्षणाचे व्यासपीठ तयार करण्यासाठी इफ्फीची निरंतर बांधिलकी या उपक्रमातून प्रतिबिंबित होते.
Comments
Post a Comment