ताश्कंदच्या पर्वतांपासून ते स्लोव्हाकियाच्या दुर्गम खेड्यांपर्यंत, मानवी भावकथांचा इफ्फी 56 मध्ये रुपेरी पडद्यापर्यंत प्रभावी प्रवास
ताश्कंदच्या पर्वतांपासून ते स्लोव्हाकियाच्या दुर्गम खेड्यांपर्यंत, मानवी भावकथांचा
इफ्फी 56 मध्ये रुपेरी पडद्यापर्यंत प्रभावी प्रवास
(अशोक रा. शिंदे यांजकडून)
56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) जगभरातील विविधतेने नटलेले चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटातून सामर्थ्यवान आणि प्रभावी कथा प्रेक्षकांसमोर प्रदर्शित केल्या जात आहेत. यापैकी लक्ष वेधून घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये उझबेक चित्रपट 'इन पर्सूट ऑफ स्प्रिंग' आणि स्लोव्हाक चित्रपट 'फ्लड' यांचा समावेश आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत, या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांनी त्यांच्या चित्रपट निर्मितीच्या प्रवासातील अनुभव कथन केले.

स्लोव्हाक चित्रपट "फ्लड" च्या निर्मात्या, कॅटरिना क्रॅनाकोवा म्हणाल्या की हा चित्रपट एका जलाशयाच्या बांधकामासाठी एका गावातील लोकांना कराव्या लागलेल्या स्थलांतरावर आधारित आहे. स्लोव्हाकियाच्या माजोवा प्रदेशात चित्रित झालेल्या या चित्रपटात जवळजवळ 80 टक्के कलाकार रुथेनियन अल्पसंख्याक समुदायातील आहेत. "या चित्रपटाने रुथेनियन समुदायाला स्वतःच्या भाषेत रुपेरी पडद्यावर सादरीकरण करण्याची दुर्मिळ संधी दिली," असे त्यांनी नमूद केले.
अर्जेंटिनामधील एका चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाल्यानंतर, ‘फ्लड’ या चित्रपटाचे जगातील दुसरा प्रीमियर गोव्यातील इफ्फीमध्ये झाला. खरोखरच ज्यांना प्रकल्पामुळे स्थलांतर करावे लागले अशा लोकांच्या जीवनप्रसंगावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाचे एक विशेष प्रदर्शन त्याच समुदायासाठी करण्याची योजना या चित्रपटाचा चमू आखत आहे.

पत्रकार परिषदेत "इन पर्सूट ऑफ स्प्रिंग" या उझबेक चित्रपटाचे प्रतिनिधित्व दिग्दर्शक अयुब शाहोबिद्दिनोव्ह आणि मुख्य अभिनेत्री फरिना जुमाविया यांनी केले. चित्रपटाची ओळख करून देताना दिग्दर्शक म्हणाले की या चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा राहत शुकुरोव्हा हिचा प्रवास दाखवला आहे. या प्रवासात तिच्या अनेक वेदनादायक आठवणी आणि दीर्घकाळ दडलेली रहस्य प्रेक्षकांसमोर येतात. "भूतकाळ पुन्हा समोर येत असताना, राहतला स्वतःशी समेट करण्यासाठी जुन्या जखमा आणि लपलेल्या सत्यांमधून मार्गक्रमण करावे लागते," असे त्यांनी स्पष्ट केले.
जरी या चित्रपटाची कथा उझबेकिस्तानमध्ये सोव्हिएत काळाच्या शेवटच्या टप्प्यात घडलेली असली तरीही, चित्रपटाचा विषय आणि भावनिक संघर्ष आजही तितकाच प्रासंगिक आहे. जगभरातील चित्रपट निर्मात्यांना आपले काम प्रदर्शित करण्यासाठी आणि जागतिक नेटवर्क तयार करण्यासाठी इफ्फी एक मौल्यवान आंतरराष्ट्रीय व्यासपीठ प्रदान करते, असे चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी इफ्फी’ची प्रशंसा करताना सांगितले. "आम्ही इफ्फीचा भाग आहोत याचा आम्हाला आनंद आहे," असेही त्यांनी म्हटले.
Comments
Post a Comment