सागरी स्वप्नांपासून ते जहाजावरील आव्हानांपर्यंत, इफ्फीच्या मंचावर उलगडली पेस्काडोरची कहाणी
सागरी स्वप्नांपासून ते जहाजावरील आव्हानांपर्यंत, इफ्फीच्या मंचावर उलगडली पेस्काडोरची कहाणी
सध्या सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) चित्रपट दिग्दर्शक हॅरॉल्ड डोमेनिक रोस्सी यांनी पेस्काडोर चित्रपटाच्या निर्मितीवेळचे ह्रदयस्पर्शी अनुभव सांगितले. “वैद्यकीयदृष्ट्या बेशुद्ध अवस्थेत असताना आलेल्या अनुभवांमधून ही कथा जन्माला आली. त्या अवस्थेत मला फक्त समुद्र दिसत असे. एकटेपणाचा हा अनुभव थरारक होता,” असे त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. निर्माती बार्बरा ऍन रसेल आणि छायाचित्रणकार, निर्माते आयझॅक जोसेफ बँक्स हे त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते.
“ते भावनिक अंतर आणि संपर्क साधण्याची तीव्र इच्छा, चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा पेस्काडोर हा माझ्यासाठी एक मार्ग होता,” असे ते म्हणाले. समुद्रात चित्रीकरण करताना येणाऱ्या समस्या रोस्सी यांनी हसत हसत, प्रामाणिकपणे सांगितल्या. “गतकाळातला प्रत्येक चित्रपटकर्ता तुम्हाला सांगत असतो – नावेवर चित्रपटाचे चित्रीकरण करू नका. मी ऐकले नाही,” त्यांनी हसून सांगितले. “पण लवकरच मला कळले ते असे का सांगत होते. भर समुद्रात प्रत्यक्ष कोळ्याच्या नावेवर आणि घनदाट जंगलात चित्रीकरण करणे अत्यंत आव्हानात्मक होते. पण त्यामुळे चित्रपटाला प्राप्त झालेला सच्चेपणा हा संघर्ष सार्थ ठरवणारा होता.”
“चित्रपटातली मच्छिमाराची मध्यवर्ती भूमिका अभिनयाची काहीच माहिती नसलेल्या सामान्य माणसाने केली आहे. आम्ही एक प्रयोग केला.. आणि तो यशस्वी ठरला. त्याचे सहज वावरणे चित्रपटाला वेगळा अर्थ देणारे ठरले.”
निर्मात्या बार्बरा रसेल म्हणाल्या की “पेस्काडोर हा खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय सहकार्यातून निर्माण झालेला चित्रपट आहे. चित्रपटातले कलाकार आणि इतर कर्मचारी अमेरिका आणि कोस्टा रिकामधले आहेत. आम्ही एकत्र राहून काम केले, एकमेकांची भाषा शिकलो. हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर, अनोखा अनुभव होता.”
छायाचित्रणकार आणि निर्माते आयझॅक जोसेफ बँक्स चित्रपटाच्या दृश्यांतून व्यक्त होणाऱ्या भाषेविषयी बोलले. “दोन्ही प्रमुख भूमिकांच्या चित्रीकरणाबाबतचा माझा आणि हॅरॉल्डचा दृष्टीकोन वेगवेगळा होता. त्या भिन्न, विरोधी दृष्टीकोनांमुळे कथा सशक्तपणे साकारता आली.”
चित्रपटाच्या कथेचा मूळ गाभा, आंतरराष्ट्रीय भावना आणि समुद्रातली साहसी निर्मिती यामुळे पेस्काडोर इफ्फी 2025 मधील प्रेक्षकांवर सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या, आकर्षक चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
Comments
Post a Comment