शेखर कपूर आणि ट्रिसिया टटल यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये असलेले परिवर्तनकारी आश्वासन उलगडून दाखवले
शेखर कपूर आणि ट्रिसिया टटल यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये असलेले परिवर्तनकारी आश्वासन उलगडून दाखवले
गोवा येथे आयोजित 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘एक युरेशियन महोत्सवी आघाडी: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विश्वात आपल्याला चित्रपट पुनर्परिभाषित करण्याची गरज आहे का?’ या विषयावरील संभाषणात्मक सत्राने जगातील दोन सर्वात सन्माननीय व्यक्तिमत्त्वांना एकत्र आणले: इफ्फीचे महोत्सव संचालक शेखर कपूर आणि बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उत्सव संचालक ट्रिसिया टटल. या सत्राच्या संचालनाची सूत्रे शेखर कपूर यांच्या हाती असली तरीही यावेळी उत्साही दुतर्फी संभाषणासारखे विचारांचे आदानप्रदान झाले आणि त्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सर्जनशीलता आणि चित्रपट महोत्सवांचे भविष्य यांच्या उभ्या-आडव्या छेदांचा मागोवा घेतला गेला.
महोत्सवात प्लास्टिकच्या बाटल्यांचे वाटप केल्याबद्दल शेखर कपूर यांनी महोत्सव आयोजकांचे अभिनंदन करत एका हार्दिक, वैयक्तिक पातळीवर सत्राची सुरुवात केली, तर ट्रिसिया टटल यांनी जेव्हा 1998 मध्ये चित्रपट संस्थेची एक युवा पदवीधर म्हणून शेखर कपूर यांच्या एलिझाबेथ या चित्रपटावर आधारलेल्या त्यांच्या मास्टरक्लासमध्ये उपस्थिती नोंदवली होती त्या क्षणाची आठवण काढली. “हे एक संपूर्ण वर्तुळ आहे,” असे उद्गारत त्यांनी जुन्या अनुभवांचा चित्रपटांच्या उलगडत जाणाऱ्या भविष्याशी मिलाफ साधणारा सूर लावला.
संपूर्ण सत्राच्या कालावधीत, शेखर कपूर यांनी कितीतरी वेळा याच मुद्द्यावर भर दिला की,कितीही नवनवे तंत्रज्ञान येउ द्या, मग ते डिजिटल साधनांच्या रुपात असो वा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या स्वरुपात असो, चित्रपट जिवंत आहेत कारण मानवी कल्पनाशक्ती जिवंत आहे. कोणतीही अभिनव कल्पना तिचा वापर करणाऱ्या माणसांच्या सर्जनशीलतेला झाकोळू शकत नाही याची उपस्थितांना आठवण करून देत कपूर यांनी कोणतेही नवे साधन वापरणारा हा शेवटी, सर्जक असतो यावर अधिक भर दिला.
कोणे एके काळी चित्रपट निर्मिती क्षेत्रात डिजिटल पद्धतीचे आगमन झाल्यानंतर, चित्रपटांचे विश्व नाहीसे होईल या भीतीने कसे गारुड केले होते याची आठवण सांगत ट्रिसिया टटल यांनी तंत्रज्ञानविषयक बदलांना वेढून राहिलेल्या पूर्वीच्या चिंतांचे वर्णन केले. “पण शेवटी टिकून राहते ती कल्पना, कलाकुसर आणि मानवता,” त्या म्हणाल्या. शेखर कपूर यांनी पुढे सांगितले की कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही प्रगत होऊदे, एक महान अभिनेता दृश्यात अभिव्यक्त करतो ती नाजूक भावना, सूक्ष्म बदल आणि विशेषतः डोळ्यांमध्ये होणारे संयत बदल हे सर्व ती समजून घेऊ शकत नाही. ती भावनिक चमक खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना कथेशी जोडून ठेवते हे सांगून ते म्हणाले, “एआयला डोळ्यांच्या बाहुल्या समजत नाहीत.”
नवीन सर्जनशील साधनांचा शोध घेणाऱ्या व्यक्तींबाबत उत्साहाने चर्चा करत शेखर कपूर यांनी त्यांच्या एआय तंत्रज्ञानाने निर्मित वॉर लॉर्ड या मालिकेची झलक देखील प्रस्तुत केली. या सर्व शक्यतांचा स्वीकार करत असताना देखील त्यांचे संभाषण त्यांच्या याच विश्वासावर ठाम राहिले की तंत्रज्ञान कथाकाराची पुनर्परिभाषा करत नाही, खरेतर, कथाकार तंत्रज्ञानाला नवी धाटणी देतो.
प्रेक्षकांना आनंद देणाऱ्या त्या क्षणी कपूर यांनी त्यांच्या आचाऱ्याने चॅटजीपीटीचा उपयोग करुन मिस्टर इंडिया चित्रपटाच्या पुढच्या भागाची पटकथा लिहील्याचे आणि त्यावेळी घडलेल्या गमतीशीर प्रसंगाची आठवण सांगितली. शेखर कपूर म्हणाले, “तो माझ्याकडे अत्यंत उत्साहात आला. मला खरंच कळत नव्हतं की, त्याने केलेल्या स्वयंपाकाची तारीफ करावी; की त्याने लिहीलेल्या पटकथेची.” कलात्मक निर्मितीची साधने कशी सहज उपलब्ध आहेत आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अनपेक्षित लोकांकडूनही कशा कल्पना मांडल्या जातात हे या मजेशीर प्रसंगातून अधोरेखित झाले.
वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या काळातही चित्रपट हा कसा एकत्रित सामाजिक अनुभव आहे याबाबत दोन्ही वक्त्यांनी चर्चा केली. “चित्रपट पाहायला जाणे हा एक सामाजिक अनुभव आहे. एआय साधने किंवा घरात बसून चित्रपट पाहण्याची सुविधा त्याची जागा घेऊ शकत नाही,” असे शेखर कपूर म्हणाले. घरपोच खाद्यपदार्थ मिळत असतानाही लोक रेस्टॉरंटमध्ये जातातच असे त्यांनी नमूद केले. स्वतंत्र आणि साहसी चित्रपटांचा अनुभव घेता येईल अशा चित्रपगृहांचे महत्त्व ट्रिसिया टटल यांनी सांगितले. ही जबाबदारी चित्रपट महोत्सवांनी पुढे सांभाळली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या चर्चेत कर्मचाऱ्यांच्या कमी होत जाणाऱ्या संख्येबाबत आणि चित्रीकरणाच्या सेटवरील कामगारांच्या भविष्याबाबतही चिंता व्यक्त केली गेली. चित्रपटाच्या सेटवर केवळ असण्याचे महत्त्व सांगताना ट्रिसिया टटल म्हणाल्या, “त्यांच्या मुलाने एकदा सेटवर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. दिग्दर्शक किंवा लेखक म्हणून नाही तर चित्रपट निर्मितीचे जग जवळून पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी.” शेखर कपूर म्हणाले की, “ऍक्शन आणि कट म्हणण्याची क्षमता मी हरवून बसेन की काय अशी मला भीती वाटते. चित्रपटाच्या सेटवर घडत जाणारे माणसामाणसामधले बंध कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे निर्माण करता येत नाहीत.”
वाङमयचौर्य, नीतीमूल्ये आणि एआयची कलात्मक वैधता याबाबतच्या प्रश्नांवर प्रेक्षकांशी संवाद साधताना शेखर कपूर यांनी आपले परखड मत मांडले. ते म्हणाले, “एआय ही काही जादू नाही. ती अनागोंदीही नाही. हा एक बदल आहे. खऱ्या कथाकथनाचा मात्र अंदाज बांधता येत नाही. एआय भविष्यात काय घडेल सांगू शकत नाही, त्याला केवळ भूतकाळाचे अनुकरण करता येते. एआयचा वापर करुन अथवा न करता केलेले वाङमयचौर्य सृजनात्मक आळशीपणातून घडते. भावनिकतेने सादर केलेली कथा नेहमीच त्या कामामागील मानवी चेहेरा उलगडून दाखवते.”
चित्रपट जगतात बदल होत राहतील, मात्र त्यातील मानवी कल्पनाशक्ती, भावनिक सत्य आणि कथेची ताकद या मूलभूत गोष्टी कोणत्याही तांत्रिक बदलामुळे मागे पडणार नाहीत; यावर दोन्ही वक्त्यांनी या सत्राच्या शेवटी सहमती दर्शवली. कार्यक्रमाच्या अखेरीस माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात यांचा सन्मान करण्यात आला.
Comments
Post a Comment