विशाल भारद्वाज यांच्या संगीत आठवणी आणि लताजींच्या हृदयस्पर्शी स्मृतींनी प्रेक्षक मंत्रमुग्ध
विशाल भारद्वाज यांच्या संगीत आठवणी आणि लताजींच्या हृदयस्पर्शी स्मृतींनी प्रेक्षक मंत्रमुग्ध
(अशोक रा. शिंदे यांजकडून)
इफ्फीमधील वार्षिक लता मंगेशकर स्मृती व्याख्यान `द रिदम्स आॅफ इंडीया : फ्राॅम द हिमालयाज टू द डेक्कन` हा कार्यक्रम एका रंगतदार संगीत प्रवासासारखा उलगडला. यामध्ये स्मृती, सुरावट आणि सर्जनाच्या जादुई प्रक्रियेची सुंदर गुंफण झाली. संगीत दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि बी. अजनीश लोकनाथ यांची संवादयात्रा, आणि समीक्षक सुधीर श्रीनिवास यांच्या संयोजनातून हे सत्र प्रेक्षकांना दोन विलक्षण संगीत मनांच्या सर्जनशील विश्वाची दुर्मिळ सफर घडवणारे ठरले.
कार्यक्रमाची सुरुवात आत्मीय वातावरणात झाली. चित्रपट निर्माते रवी कोट्टारक्कर यांनी वक्त्यांचा सत्कार करताना, संगीत ही उचलून धरणारी व बांधून ठेवणारी शक्ती आहे, असे नमुद केले. त्यांच्या या शब्दांमुळे पुढच्या संभाषणाला सौम्य, चिंतनशील, हलका फुलका आणि संगीतबद्ध असा स्वर मिळाला.
प्रशंसा, प्रेरणा आणि अविस्मरणीय संगीत-धून
सुधीर यांनी संवादाची दिशा ठरवताच प्रेक्षकांना आठवण करून दिली की, अजनीश हे फक्त कंताराचे संगीतकारच नाहीत; आणि विशाल व अजनीश या दोघांच्या उपस्थितीमुळे भारतीय संगीताचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य एका सभागृहात एकत्र आले आहे. त्यानंतर चर्चा दोन्ही कलाकारांच्या परस्पर प्रशंसेच्या, आदराच्या आणि सर्जनशीलतेच्या सुंदर आदान-प्रदानात परिवर्तित झाली.
सर्वप्रथम विशाल यांनी बोलताना ‘कंतारा’ चे संगीत आत्तापर्यंत तयार झालेल्या सर्वोत्तम चित्रपट धूनपैकी एक असल्याचे म्हटले आणि त्यामागील संगीतकार कोण, हे शोधण्यास प्रवृत्त केले , असे सांगितले. अजनीश यांनी हसतच उत्तर दिले—‘माचीस’, ‘चप्पा चप्पा’ आणि विशाल यांच्या संगीतामधील ती डोलणारी लय याने त्यांना लहानपणापासून घडवले. त्यांनी त्या लयीतले काही सूर थेट कार्यक्रमात गुणगुणून दाखवले आणि सभागृहात टाळ्यांचा वर्षाव झाला.
संवाद पुढे ‘पानी पानी रे’ कडे वळला तेव्हा संपूर्ण सभागृह अधिकच तल्लीन झाले. विशाल यांनी सांगितले की पाण्याचा आवाज, नदीकाठी पसरलेली शांतता, या सर्वांनी त्या गीताचा आत्मा घडवला. त्यांनी लता मंगेशकर यांची नोंदवहीसारखी अचूक संगीत स्मरणशक्ती नमुद केली: त्या प्रत्येक सूर लक्षात ठेवत, एकाच प्रयत्नामध्ये गात, आणि गाण्याच्या चालीत पाण्याच्या प्रवाहाशी जुळणारे बदल सुचवत असत. त्या फक्त गायिका नव्हत्या, असे नमुद करत विशाल म्हणाले की, त्या स्वतः एक संगीतकार होत्या.
संगीतकाराच्या अंतरंगात
त्यानंतर अजनीश यांनी त्यांची स्वतःची आगळीवेगळी कार्यपद्धती उलगडून दाखवली. गीताचे बोल येण्यापूर्वी भावना व्यक्त करता येतील असे 'अय्ययो' आणि 'अब्बब्बा' सारखे शब्द त्यांच्या सुरांमध्ये कसे शिरतात, यांचे वर्णन त्यांनी केले. दिग्दर्शक बहुतेक वेळा ते शब्द तसेच ठेवण्याचा आग्रह धरतात, असेही ते म्हणाले. रिलीजच्या 20 दिवस आधी 'वराहरूपम्' या गीताला स्वरसाज चढवण्याच्या प्रचंड दडपणाच्या दिवसांबद्दलच्या त्यांच्या किश्श्याने प्रेक्षकांमध्ये हशा पिकला.
जेव्हा सुधीर यांनी विचारले की संगीतकार बहुतेकदा सर्जनशीलतेला आध्यात्मिक शक्तीशी का जोडतात तेव्हा या संवादाने तात्विक वळण घेतले. विशाल भारद्वाज यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले: "आपण शांततेच्या सर्वात जवळ जातो ते संगीताच्या माध्यमातून." “एखादी धून कशी अचानक येते - जणू कुठल्यातरी वेगळ्याच विश्वातून", असे ते म्हणाले. अजनीश यांनीही या मताशी सहमती दर्शविली. आपण सर्जनशील अवस्थेत कसा शिरतो हे आपल्याला कधीही उमगलेले नाही असे अजनिश यांनी सांगितले. आपण 'कांतारा'साठी कधीही स्वतःला श्रेय दिले नाही, असे त्यांनी विनयपूर्वक नमूद केले.
भाषा, लोकपरंपरा आणि भारताचे नादविश्व
यानंतर संभाषण भाषा आणि संगीत यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्याकडे वळले. अजनिश यांनी 'कर्मा' हे गाणे कसे ब्रम्हांडाशी जोडले गेले आहे याबद्दल सांगितले, तर सांस्कृतिक संदर्भाची संलग्न असलेली गाणी तितकी दूरवर पोहोचली नाहीत, असेही ते म्हणाले. विशाल यांनी मल्याळम भाषेतील गाणी संगीतबद्ध करताना, एमटी वासुदेवन नायर आणि ओएनव्ही कुरुप यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. तसेच एखादी भाषा आपल्याला अवगत नसताना त्या भाषेत संगीत देण्यातील आव्हाने त्यांनी रंजकपणे सांगितली.
यानंतर संवादाच्या केंद्रस्थानी लोकसंगीत आले. अजनीश यांनी लोकसंगीताचे वर्णन "निरागसतेतून जन्मलेली कला" असे केले, 'कांतारा'चे संगीत चित्रपटाच्या शेवटी येणाऱ्या वाद्यमेळ्यापर्यंत कसे पूर्णपणे आदिवासी वाद्यांवर अवलंबून होते, हे त्यांनी स्पष्ट केले. कोरगा समुदायाचे लोक वेगवेगळ्या ढोलांच्या तालाद्वारे कसे संवाद साधतात, याचे उदाहरण देत त्यांनी भारताच्या तालवैविध्याची झलक दाखवली. विशाल यांनी यात भर घालत पुढे सांगितले की, भारतात "अनेक संस्कृती" आहेत, प्रत्येकाच्या स्वतःच्या बोली, पोत, लोकपरंपरा आणि संगीतसाज आहेत.
संगीताचे भविष्य: कृत्रिम बुद्धिमत्ता, गीतलेखन आणि कथा मांडणी
प्रश्नोत्तर सत्र सुरू होताच ही चर्चा गीतलेखनापासून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगीताच्या भविष्य यासारख्या विषयांकडे वळली. काही ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त ठरू शकते, असे मत अजनिश यांनी मांडले. तर तंत्रज्ञानाची भीती बाळगू नये, "आपण काय वापरायचे आणि काय सोडायचे ते शिकू," असे मत विशाल यांनी प्रेक्षकांना समजावताना मांडले.
अखेर, या स्मरणीय संवादाने केवळ भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना औपचारिक आदरांजली वाहिली नाही तर भारतीय संगीताचा विस्तृतपट शास्त्रीय संगीत ते लोकसंगीत, वैयक्तिक आठवणींपासून आध्यात्मिक अनुभूतीपर्यंत सफर घडवली. आणि प्रेक्षकांना सर्जनशीलतेचे अत्यंत स्वाभाविक स्वरूप पाहण्याची संधी मिळाली. हा केवळ आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम नव्हता; तर लय, संस्कृती, स्मृती आणि भारतीय कल्पनाशक्तीला आकार देणाऱ्या अनंत सुरांचा जिवंत जल्लोष होता.
Comments
Post a Comment