महाराष्ट्र सरकार आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात स्टार्ट-अप इकोसिस्टीम आणि नागरी सेवांच्या विकासासाठी सामंजस्य करार
महाराष्ट्र सरकार आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात स्टार्ट-अप इकोसिस्टीम आणि नागरी सेवांच्या विकासासाठी सामंजस्य करार
काल पार पडलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र : कन्व्हर्जन्स २०१८’ या जागतिक गुंतवणूकदार परिषदेत महाराष्ट्र सरकार आणि मायक्रोसॉफ्ट इंडिया यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या. राज्यातील डिजिटलायझेशनच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी क्लाऊड-आधारित आधुनिक तंत्रज्ञान पुरवण्याच्या दृष्टीने हा करार करण्यात आला. या करारान्वये, राज्यातील व्यावसायिकतेला चालना देत नागरी सुविधांमध्ये विकास घडवून आणण्यासाठी क्लाऊड,मशीन लर्निंग आणि मोबाईल आधारित सोल्यूशन्सचा अवलंब करण्यात मायक्रोसॉफ्ट ही कंपनी राज्य सरकारला मदत करणार आहे.
विविध नागरिककेंद्री सेवांसाठी डेटा अॅनालिटिक्स, जिनोमिक्स, डीप लर्निंग, ब्लॉकचेन, रोबोटिक्स, आयओटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आदी सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी महाराष्ट्र आयटी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाआयटी)ला आता मायक्रोसॉफ्टची साथ लाभणार आहे. यात नागरिक प्रतिसाद यंत्रणा, राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ उपक्रमांतर्गत तक्रार निवारण, जमिनीच्या नोंदींचे ऑटोमेशन तसेच, डिजिटल शेती आणि कौशल्यविकास व शिक्षण यांसारख्या एक ना अनेक उपक्रमांचा समावेश होतो. संगम या मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड आधारित व्यासपिठावरून अझ्यूर सेवा, ऑफीस ३६५ आणि लिंक्डइन यांसारख्या सेवा पुरवल्या जात असून या मार्फत कौशल्यविकास आणि रोजगार निर्मितीसाठी राज्यभर विविध आधुनिक सोल्यूशन्स पुरवली जाणार आहेत.
या कराराचा एक भाग म्हणून, वरील विभागांत तंत्रज्ञान धोरणांचा अवलंब करण्यासाठी मायक्रोसॉफ्टतर्फे सल्लागार, अनुभवी आणि सक्षम अधिकारीही दिले जाणार आहेत. तसेच, महाआयटीतर्फे स्थापन करण्यात येणार्या सक्षम संशोधन केंद्रांनाही कंपनीतर्फे विशेष सहाय्य पुरवले जाणार आहे.
यावेळी बोलताना मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या आरोग्य, शिक्षण व सार्वजनिक विभागाचे कण्ट्री महाव्यवस्थापक मनीष प्रकाश म्हणाले, ‘‘भारतातील शेतकरी, आरोग्यसेवा पुरवठादार, शिक्षणक्षेत्रातील यंत्रणा व विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तसेच, विकसित नागरी सेवांसाठी आम्ही गेल्या काही वर्षांत क्लाऊड, मोबाईल आणि मशीन लर्निंगआधारित सोल्यूशन्स अत्यंत यशस्वीरित्या विकसित केली आहेत. महाराष्ट्र सरकारच्या डिजिटल प्रवासात त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने हा करार म्हणजे आम्ही पुढे टाकलेले आणखी एक महत्वपूर्ण पाऊल आहे. राज्याच्या वृद्धीसाठी आम्ही कटीबद्ध असून ही भागीदारी अधिक मजबूत होईल, अशी आम्ही आशा बाळगतो.’’
महाराष्ट्र सरकारशी साधारण गेले दशकभर मायक्रोसॉफ्टची बळकट भागीदारी असून अन्य राज्य सरकारेही आपापल्या विभागांचे परिचालन सुरळीत करण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या तंत्रज्ञानाचा वापर करतात. यात महाराष्ट्र रेरा, औरंगाबाद इन्फ्रास्ट्रक्चर बोर्ड आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) या विभागांचा समावेश होतो. सुरुवातीला टीव्ही व्हाईटस्पेसेसच्या माध्यमातून कनेक्टीव्हिटीचे पर्याय पुरवून महाराष्ट्रातल्या अमरावतीतील हरीसाल गावाच्या डिजिटायझेशनसाठी मायक्रोसॉफ्टने राज्य सरकारला मदत केली आहे. तसेच, येथील आरोग्यसेवा, शिक्षण, टेलिमेडीसीन आणि स्मार्ट शेतीसाठीही कंपनीने राज्य सरकारशी भागीदारी केली आहे. आज, अझ्यूर व्यासपिठावरून या सेवा पुरवल्या जात असून हरीसाल व आजूबाजूच्या गावांतील २० हजारांहून अधिक लोकांची आयुष्ये यामुळे सुखकर झाली आहेत.
भारतीय भाषांमध्ये स्थानिक भाषांतील कम्प्युटिंगच्या सेवा पुरवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट सातत्याने प्रयत्न करीत आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफीस आणि विंडोजतर्फे ११ भारतीय भाषांच्या लिपींना सहाय्य मिळत असून मराठीसह भारतातील एकूण २२ भाषांना या व्यासपिठांवर चांगला वाव देण्यात येत आहे. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने, विविध भारतीय भाषांतील भाषांतरे व स्पीच रेकग्निशनचा विकासही मायक्रोसॉफ्टतर्फे सध्या केला जात आहे.
Comments
Post a Comment