'वाघेऱ्या' गावात वाघाने घातला धुमाकूळ !
'वाघेऱ्या' गावात वाघाने घातला धुमाकूळ !
'लांडगा आला रे आला' ही गोष्ट लहानपणी सर्वानीच ऐकली आहे. लांडगा आला म्हणून कुणीतरी खोडी काढायची आणि मग अख्खे गाव जागे व्हायचे, अशी ती गोष्ट होती. या गोष्टीत थोडा फेरबदल केला आणि लांडग्या एवजी गावात 'वाघ' आला तर काय गोंधळ उडेल ! अगदी हाच गोंधळ 'वाघेऱ्या' या आगामी सिनेमातील वेड्यांच्या गावात आपल्याला पाहायला मिळणार आहे. गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवाले निर्मित, तसेच 'बॉईज' सारखा सुपरहिट सिनेमा देणारे सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या 'वाघेऱ्या' या आगामी सिनेमाचे नुकतेच ट्रेलर आणि 'उनाड पोरं' या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले. संपूर्ण स्टारकास्टच्या उपस्थितीत प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यामधून 'वाघे-या' नामक गावातील गमतीजमती प्रेक्षकांना दिसून येतात.
गावात 'वाघ' शिरला असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरते. या बातमीमुळे संपूर्ण गाव वाघाच्या दहशतीखाली येते आणि मग या वाघाला पकडण्यासाठी विविध शक्कला लढवल्या जातात. शिवाय, या सगळ्या गोंधळामुळे स्वत:च्या लग्नाला उभा असलेल्या वनअधिका-यालासुद्धा ताबडतोब वाघेऱ्या गावात पाचारण करावे लागते, त्यामुळे त्याच्या मनाची झालेली घालमेल या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
ग्रामीण विनोदाचा वारू चौफेर उधळवणाऱ्या या ट्रेलरबरोबरच, सिनेमाचे दिग्दर्शक समीर आशा पाटील लिखित आणि संगीतकार मयुरेश केळकर दिग्दर्शित 'उनाड पोरं' हे उडत्या चालीचे गाणेदेखील यावेळी प्रदर्शित करण्यात आले. आदर्श शिंदेच्या भारदस्त आवाजातील हे गाणे सिनेरासिकांचे भरघोस मनोरंजन करणारे ठरत आहे.
'वाघे-या' या सिनेमात ऋषिकेश जोशी, किशोर कदम आणि भारत गणेशपुरे यांची प्रमुख भूमिका असून, सुहास पळशीकर, नंदकिशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम या मराठीतील दिग्गज कलाकारांच्या कसदार अभिनयाची जुगलबंदीदेखील यात आपल्याला अनुभवता येणार आहे. 'वाघे-या' गावात खरंच वाघ आला होता का? की फक्त एक अफवा होती? हे जाणून घेण्यासाठी येत्या १८ मे रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात 'वाघेऱ्या' सिनेमा नक्की पाहायला जा.
Comments
Post a Comment