शाळकरी मित्र भेटीचा सुवर्णकांचन योग
शाळकरी मित्र भेटीचा सुवर्णकांचन योग
५ आणि ६ जानेवारी २०१९ हे दोन दिवस आम्हा बोरिवली( पूर्व ) येथील गोपालजी हेमराज हायस्कूलमधील १९६९ साली शालांत परिक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावेत असे उगवले. कारण होतं शाळा सोडल्यानंतर तब्बल ५० वर्षांनी होणाऱ्या सुवर्ण महोत्सवी पुनर्भेटीचं . हे स्नेह सम्मेलन निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ॲम्बी व्हॅलीत स्थित आमच्या एका मित्राच्या बंगल्यावर संपन्न झालं . आमच्यापैकीच एका उत्साही वर्ग मित्राने एक व्हाटसप समुह स्थापून एवढ्या मोठ्या कालावधीत इत:स्तता विखुरलेल्या मित्रांना एकत्र आणण्याचे महत्वाचे काम केले , तर काही जणांनी सातत्यपूर्वक पाठपुरावा करुन या कार्यक्रमास मूर्त स्वरुप आणले होते . परिणामतः कार्यक्रमाला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता .
बऱ्याच वर्षांनी भेट होत असल्यामुळे प्रत्येकात आमुलाग्र बदल झालेला दिसून येत होता . काही जण तर ओळखूही येत नव्हते इतके वेगळे दिसत होते . मात्र पुनर्भेटीचा एक अनोखा आनंद प्रत्येक जण अनुभवत होता . प्रत्येकाला एकमेकांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागून गेली होती . आज दुर्दैवाने हयात नसलेल्या काही वर्ग सोबत्यांना श्रध्दांजली अर्पण करुन प्राथमिक विचारपूस करत भेटीला औपचारिकरित्या सुरुवात झाली .
५ तारखेला रात्री कॅंपफायरच्या सोबतीने गप्पांचा फड रंगला . आम्ही सर्वजण टाईम मशीनमधे बसून मनाने जणू ५० ते ५४ वर्षे मागे गेलो . गो . हे .शाळे मधल्या गत स्मृती त्या शेकोटी भोवती आमच्या बरोबर फेर धरु लागल्या . इ .८ वी ते इ .११ वी पर्यंत आम्हाला शिकवणारे , आमच्यावर उत्तम संस्कार करणारे , आमचं व्यक्तिमत्त्व घडवणारे , सारे गुरुजन आठवणींच्या रुपाने साक्षात समोर अवतरले . त्यात मराठी शिकवणाऱ्या होनावर बाई , उपाध्ये सर , बुवा बाई , खांडेकर बाई , धोपेश्वर सर , गणिताचे राऊत सर , संस्कृत शिकवणारे पाठक सर , चित्रकलेच्या मुळे मॅडम , शारिरीक शिक्षणाचे देसाई आणि सुरती सर , कडक शिस्तिचे प्राचार्य आर . एन . पाठक सर आणि उप प्राचार्य वडवाणी सर , सारे सारे होते . आम्ही त्यांच्या लकबी , शिकवण्यामागची तळमळ या बद्दल बोलत असताना धूसर होणाऱ्या आमच्या डोळ्यासमोर ते कौतुकाने आणि कृतार्थ नजरेने आमच्याकडे पाहात आहेत अस जणू वाटत होतं. त्यांना अभिमान वाटावा असेच त्या बॅचचे सर्व विद्यार्थी आहेत . त्यांनी ज्ञानदान देऊन सुशिक्षित आणि सुसंस्कारित केलेले त्यांचे विद्यार्थी /विद्यार्थीनी समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात बहुमुल्य योगदान देउन आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवण्यात यशस्वी झाले आहेत .
डॉ . राजेंद्र कुडतरकर ( प्रसूती तज्ञ ) , डॉ . सुनील दाभाडे ( हृदय विकार तज्ञ ) , डॉ . धनंजय सामंत ( एम . बी . बी . एस ) , सुहास देशपांडे ( ख्यातमान आर्किटेक्ट ) , रमाकांत जाधव (शिवालिक वेंचर्स मध्ये बांधकाम उद्योजक) अजीत कुलकर्णी ( बांधकाम उद्योजक ) , चारुदत्त चोगले , कृष्णकुमार राऊत , अच्युत निमकर , उदय अधिकारी ( इंजिनियरींग ) , दत्तात्रय रायकर , वसंत पटवर्धन , कांचन पाठारे , अनिल आंगणे , रमेश प्रभू , गिरीश शहा , मुकेश शहा , निलम कुलकर्णी ( बॅंकिंग ) , दिपक नायक ( माहिती तंत्रज्ञान ) , रेखा चाफेकर ( सामाज कल्याण अधिकारी ) , नसिर सैय्यद ( तंत्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ता ) , प्रकाश सावंत ( तंत्रज्ञ आणि तबला वादन ) , प्रमिला मुझुमदार ( विमान सेवा क्षेत्र - हवाई सुंदरी ) , अविनाश कदम ( रेल्वे सेवा ) , परपेड डिकॉस्टा ( मुंबई पोलिस कमिशनर कार्यालय ) आणि अलका पाटील ( महानगरपालिका अधिक्षक ) असे आपल विशीष्ट योगदान देणारे त्यापैकी काही जण . यातील उदय अधिकारी या उद्योजकाच्या नावावर त्याच्या संशोधित उत्पादनास आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटंट मिळवण्याचे कर्तुत्व आहे .आमच्या या यशात गुरुजनांच आणि शाळेच मोठं योगदान आहे त्या साठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत .
Comments
Post a Comment