राष्ट्रीय विज्ञान दिनी सरकारी शालेय विद्यार्थ्यांनी घडवून आणलेल्या तांत्रिक नाविन्यता अन्य ३,००० मुलांना देणार प्रेरणा
राष्ट्रीय विज्ञान दिनी सरकारी शालेय विद्यार्थ्यांनी घडवून आणलेल्या तांत्रिक नाविन्यता अन्य ३,००० मुलांना देणार प्रेरणा
मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी नवीन युगातील तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या प्रकल्पांचे दर्शन घडवणारी "हाय टेक एक्स्प्रेस फॉर यंग अडोलेसंट्स" शाळा-शाळांमध्ये फिरणार
मुंबई, २८ जानेवारी २०२०: दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी भारतभरात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. भारतातील भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांनी १९२८ मध्ये शोधून काढलेल्या ‘रमण प्रभावा’ची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. हे थोर शास्त्रज्ञ आणि त्यांनी लावलेला हा गेल्या सहस्रकातील महत्त्वाच्या संशोधनांमध्ये गणला जाणारा शोध यांपासून प्रेरणा, घेऊन सलाम बॉम्बे फाउंडेशनने मासून या स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने शुक्रवारी “हाय टेक एक्स्प्रेस”ला कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री श्री नवाब मलिक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला.
वर्ष २०२० सुरू झाले आणि जगाने अल्ट्रासोनिक संवेदक-सक्षम ग्लोव्ह्जचा शोध लावला. हे ग्लोव्ह्ज अंध लोकांच्या वाटेतील नजीकचा अडथळा ओळखू शकतात आणि बिपच्या माध्यमातून त्याचा इशाराही देऊ शकतात. अंध (किंवा ग्लोव्ह्ज घालणारी कोणतीही) व्यक्ती अडथळ्याच्या समीप जाऊ लागते तशी बिपची वारंवारता वाढते. एवढेच नव्हे तर विविध विभागांमध्ये (आयसोलेटेड वॉर्डस्) उपचार घेणाऱ्या वयोवृद्ध व भिन्नक्षमताधारक रुग्णांसाठी रोबो प्रारूपावर आधारित असा एक अर्ड्युनो उनो मायक्रो कंट्रोलर विकसित करण्यात आला आहे. रोबोच्या एलडीआर पॅनलवर टॉर्चचा प्रकाश टाकला असता, रोबो हालचाली करतो आणि औषधे, पाण्याची बाटली अशा वस्तू पकडीत घेतो व त्या रुग्णाला देतोही. कालपर्यंत एखाद्या सायन्स फिक्शन मालिकेतील दृश्ये भासावीत अशा गोष्टी आता वास्तवात उतरल्या आहेत. याहून अधिक विस्मयाची बाब म्हणजे ही सर्व अत्यंत मर्यादित संसाधने उपलब्ध असलेल्या समुदायांतील लहान मुलांची निर्मिती आहे.
“हाय टेक एक्स्प्रेस फॉर यंग अडोलेसंट्स” हा एक अनोखा उपक्रम आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि पुणे महानगरपालिका (पीएमसी) शाळांतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचे या उपक्रमाद्वारे दोन बसेसमधून प्रदर्शन करण्यात येईल. या बसेस आठवड्याभराच्या काळात मुंबईतील एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवास करतील आणि ३,००० मुलांपर्यंत पोहोचतील. त्यांच्याच वयाच्या मुलांनी केलेले प्रकल्प त्यांना दाखवून प्रेरणा देणे हा यामागील उद्देश आहे. या प्रकल्पांमध्ये लाइन फॉलोअर, अंधांसाठी स्मार्ट ग्लोव्ह, टोटो- द रोबो, पी१० बोर्ड डिस्प्ले, कीपॅड लॉक, वॉटर डिस्पेन्सर, हॉस्पिटल रोबो प्रोटोटाइप, थ्रीडी प्रिंटिंग मशिन आणि आयओटीवर आधारित होम ऑटोमेशन प्रणाली यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्याक विकास, औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री श्री. नवाब मलिक यांनी या बसेसना नरिमन पॉइंट येथून हिरवा झेंडा दाखवला. ते म्हणाले, "कौशल्य विकासावर सरकार देत असलेला भर बघता, २१व्या शतकातील करिअर्ससाठी सज्ज होण्यासाठी नवीन युगातील तंत्रज्ञानांचे प्रशिक्षण आवश्यक आहे. मासूम आणि सलाम बॉम्बेसारख्या स्वयंसेवी संस्था सरकारी व सरकारी अनुदानप्राप्त शाळांतील किशोरावस्थेतील मुलांना प्रशिक्षण देऊन सरकारच्या उद्दिष्टाला हातभार लावत आहेत. एरवी कौशल्यविकासाच्या या संधी त्यांना मिळणे कठीण होते."
हे प्रकल्प तयार करणाऱ्या कुमारवयीन मुलांना रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) या तंत्रज्ञानांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणांमुळे नव्या युगातील तंत्रज्ञानाधारित कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रमांसाठी आपली कौशल्ये जोपासण्यात त्यांना मदत झाली आहे. पाठ्यपुस्तके व नियमित शालेय अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन नवीन रस्ते चोखाळण्याच्या संधीही त्यांना या व्यासपीठाने दिल्या आहेत. या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यात व त्यांना उत्तम पार्श्वभूमीतून येणाऱ्या मुलांच्या स्तरावर नेऊन ठेवण्यात या प्रशिक्षणाने संप्रेरकाची भूमिका पार पाडली आहे. आता या मुलांच्यात तुल्यबळ सामना शक्य आहे. विज्ञान हा शिक्षण प्रणालीचा एक महत्त्वाचा खांब आहे. देशाच्या प्रगतीला, वाढीला व विकासाला आकार देण्यात सातत्याने उत्क्रांत होत राहणाऱ्या तंत्रज्ञानात्मक क्रांतीची भूमिका निर्णायक आहे.
पुढील पाच वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेला २.७ ट्रिलियन डॉलर्सनी वर उचलत ५ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठून देण्यास इंटेलिजंट ऑटोमेशन सज्ज आहे, असे ऑटोमेशन एनीव्हेअरने लोकार्पित केलेल्या नवीन अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे. आजच्या काळात स्वयंचलन उद्योगांसाठी कार्यक्षमतांना चालना देत आहे, यामुळे बॅक ऑफिसमधील उत्पादनक्षमता नाट्यमयरित्या वाढत आहे. तसेच फ्रण्ट ऑफिसमधील ग्राहक अनुभव सुधारत आहे.
अर्न्स्ट अँड यंग इंडियाने (ईवाय) केलेल्या अभ्यासानुसार, देशाच्या अर्थव्यवस्थेला लक्षणीय चालना मिळून ती वर्ष २०२४ च्या सुरुवातीला ५ ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठणार आहे. या संशोधनात स्वयंचलनाच्या आर्थिक परिणामाचे परीक्षण करण्यात आले आहे आणि रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन (आरपीए), आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि मशिन लर्निंग यांसारख्या स्वयंचलन तंत्रज्ञानांचा मोठ्या प्रमाणावर अवलंब झाल्यास कार्यक्षमता वाढतील, नवीन रोजगार निर्माण होतील व परिणामी पुढील काही वर्षांत आर्थिक वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वर्ष २०२०च्या अर्थसंकल्पातही कौशल्य विकासावर रोजगारनिर्मितीसह सर्वांत महत्त्वपूर्ण घटक म्हणून भर देण्यात आला आहे. या दिशेने जाण्यासाठी सरकार सध्या देशातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यांतच कौशल्यविकासाला चालना देण्याच्या उद्देशाने अनेकविध उपक्रम राबवत आहे. यातील एक म्हणजे अटल टिंकरिंग लॅब्ज हा उपक्रम होय. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाच्या माध्यमातून नवोन्मेषकारी कौशल्यांनी सुसज्ज करणे हा आहे. हे एक महत्त्वाकांक्षी पाऊल आहे आणि आतापर्यंत ५,४४१ शाळांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे. सलाम बॉम्बे फाउंडेशनसारख्या स्वयंसेवी संस्था या उपक्रमांशी सुसंगत काम skills@school सारख्या प्रकल्पांद्वारे करत आहेत. हा प्रकल्पही समान धर्तीवर काम करतो आणि मर्यादित संसाधन पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना नवीन युगातील तंत्रज्ञानांचे प्रशिक्षण व कौशल्य देऊन आपला आवाका वाढवण्यात मदत करतो.
सलाम बॉम्बे फाउंडेशनचे उपाध्यक्ष गौरव अरोरा या उपक्रमाबद्दल म्हणाले, “उत्तम पार्श्वभूमीतून येणारे विद्यार्थी व वंचित घटकांतील विद्यार्थी यांच्यातील कुशलतेची दरी भरून काढणे हेच सलाम बॉम्बे फाउंडेशनचे ध्येय आहे. दरवर्षी आम्ही आमच्या skills@school कार्यक्रमांतर्गत मुलांना प्रशिक्षण देतो आणि त्यांना अधिक उज्ज्वल भवितव्यासाठी सज्ज करतो. आयुष्याच्या प्रत्येक बाजूत तंत्रज्ञानाचा प्रवेश झाला आहे आणि डिजिटायझेशनच्या पुढील लाटेमध्ये आणखी अनेक नावीन्य मॉडेल्स तयार होतील आणि त्यांचा संपूर्ण समाजाला लाभ होईल. सलाम बॉम्बे फाउंडेशनचे विद्यार्थी या प्रवाहात झटपट सामावून जातात आणि म्हणूनच आम्ही त्यांच्या प्रशिक्षण व कौशल्य विकासासाठी अविरत काम करत आहोत, कारण त्यांना योग्य संधी मिळाल्या तर ते चमत्कार घडवू शकतात हे आम्हाला माहीत आहे.”
Comments
Post a Comment