कोविड-19 विरोधातील लढ्यात एल अँड टी सहभागी

 कोविड-19 विरोधातील लढ्यात एल अँड टी सहभागी
पीएम-केअर्स निधीला 150 कोटी रुपयांची देणगी घोषित

मुंबई, 30 मार्च : कोविड-19 या विषाणूविरुद्धच्या लढ्यात लार्सन अँड टुब्रो ही कंपनीदेखील सामील झाली आहे. या लढ्यासाठी निधी उभारणी, सामुदायिक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आणि कौशल्य प्रदान करण्याच्या कॉर्पोरेट क्षेत्राच्या कार्यक्रमात ती सहभागी झाली आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एल अँड टी कंपनीने पीएम-केअर्स फंडासाठी 150 कोटी रुपयांची देणगी जाहीर केली आहे.
तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बांधकाम, उत्पादन आणि वित्तीय सेवा या क्षेत्रांत प्रकल्प व्यवस्थापन करणाऱ्या या दिग्गज कंपनीने आपल्या 1 लाख 60 हजार इतक्या कंत्राटी कामगारांना मदत करण्याच्या हेतूने दरमहा 500 कोटी रुपयांची अतिरिक्त तजवीज केली आहे. सध्याच्या टाळेबंदीच्या काळातही या कामगारांना वेतन देता यावे, तसेच इतर मजुरांना अन्न व मूलभूत सुविधा पुरविता याव्यात यासाठी ही रक्कम वापरण्यात येणार आहे.
करोना व्हायरसच्या साथीवर मात करण्यासाठी कंपनीने आखलेल्या योजनेची माहिती देताना लार्सन अँड टुब्रो समुहाचे अध्यक्ष ए. एम. नाईक म्हणाले, एल अँड टी ही नेहमीच गरजेच्या वेळी देशाच्या बाजूने उभे राहिलेली आहे. कोविड-19 विषाणूविरुद्धच्या लढ्यासाठी त्वरित निधी उभारणे, तसेच आमच्या प्रशिक्षण शाळांचे रुपांतर विलगीकरण केंद्रांत करणे, अशा अनेक कल्याणकारी उपक्रमांतून आम्ही मदत करीत आहोत. आमच्या अभियांत्रिकी व बांधकाम क्षेत्रांतील कौशल्याचा व ज्ञानाचा उपयोग आम्ही सरकारी अधिकाऱ्यांना संकटाचा सामना करण्यासाठी करून देत आहोत.
कंपनीच्या मालकीची सर्व प्रशिक्षण केंद्रे आणि इतर निवडक आस्थापनांचे रुपांतर विलगीकरण कक्षांमध्ये करण्याचा विचार एल अँड टी करीत आहे. कोविड-19च्या  रूग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना गंभीर आजारांसाठीच्या आरोग्यसेवा साधनांचा पुरवठा करण्याचे कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीची स्वतःची सामूहिक आरोग्य व वैद्यकीय केंद्रे चोवीस तास सुरू ठेवण्याचे तसेच रुग्णांना जवळच्या रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे निर्णयही एल अँड टी कंपनीने घेतले आहेत.
एल अँड टी स्मार्ट वर्ल्ड अँड कम्युनिकेशन या लार्सन अँड टुब्रोच्या एका उपकंपनीने मुंबई, पुणे, नागपूर, प्रयागराज, अहमदाबाद, विशाखापट्टणम, हैदराबाद अशा २० शहरांमध्ये स्मार्ट तंत्रज्ञान स्थापित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे कोविड-19 शी प्रभावीपणे लढण्यास विविध राज्य सरकारे आणि स्थानिक अधिकाऱ्यांना मदत मिळणार आहे.
कोविड-19 विरुद्धच्या लढाईत एल अँड टीने हाती घेतलेल्या सज्जतेचा सारांश पुढीलप्रमाणे :
कल्याणकारी कार्यक्रम :
-       टाळेबंदी असतानाही कामगार आणि उप-ठेकेदारांना वेळेवर वेतन देणे. कामगारांच्या लिंक केलेल्या बँक खात्यात थेट पैसे जमा करणे.
-       प्रकल्पांच्या साइट्सवर असणाऱ्या कामगार वस्त्यांवर सामाजिक स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, अन्न पुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवण्यासारखे प्रतिबंधात्मक उपाय अशी अतिरिक्त दक्षता घेणे.
-       सर्व ठिकाणांवरील कामगार आणि कर्मचार्‍यांना वैद्यकीय सहाय्यासाठी रुग्णवाहिका, डॉक्टर आणि इतर वैद्यकीय सुविधांची 24 तास उपलब्धता करून देणे.
-       कोविड-19चे स्वरुप, त्याची लक्षणे व त्यासंबंधीची चाचणी सुविधा याबाबतची माहिती कामगार व कर्मचारी यांना वेळोवेळी देण्याकरीता इंग्रजी, हिंदी आणि इतर स्थानिक भाषांमध्ये एसएमएस अलर्ट पाठविण्यासाठी मोबाईल अप्लिकेशनचा (वर्कफोर्स इंडक्शन अँड स्किल्स अप्लिकेशन – विसा) वापर करणे.
कर्मचाऱ्यांसाठीचे उपक्रम :
-       दररोज 1 लाख 20 हजार कर्मचार्‍यांना विविध आरोग्य सल्ला आणि संबंधित संदेश पाठवणे.
-       केंद्र व राज्य सरकार, तसेच स्थानिक अधिकारी यांच्या निर्देशानुसार सर्व कार्यालये व इतर आस्थापना बंद करणे. कर्मचार्‍यांना घरून काम करण्यास प्रोत्साहित करणे.
-       सतत बदलत असणाऱ्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि आवश्यक ती कारवाई करण्यासाठी कोविड-19 प्रतिबंधात्मक पथक (सीआरटी) आणि तात्काळ कारवाई पथक (डीआरटी) तयार करणे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE