‘नन्ही कली’ प्रकल्पातर्फे टाळेबंदीच्या काळातही मुली सक्रीय, सर्जनशील, सकारात्मक राहण्यासाठी प्रयत्न


नन्ही कलीप्रकल्पातर्फे टाळेबंदीच्या काळातही मुली सक्रीय, सर्जनशील, सकारात्मक राहण्यासाठी प्रयत्न
·         नन्ही कली संघातर्फे प्रत्येक मुलीशी व तिच्या कुटुंबाशी नियमित संपर्क साधून विचारपूस.
·         मुलींना सक्रीय राहण्यास प्रोत्साहन देण्यासाठी नन्ही कलीतर्फे उन्हाळी शिबिरांचे आयोजन, ओरिगामी, कला, कौशल्ये, वाचन आणि कथाकथन यांसारख्या उपक्रमांमध्ये गुंतवून ठेवण्याचे प्रयत्न.
·         नन्ही कली प्रकल्पामध्ये मिशन इंद्रधनुष्य मोहिमेतून आशा आणि सकारात्मकता यांचा संदेश देण्यासाठी विविध ठिकाणच्या मुलींनी व्हर्च्युअली एकत्र येत रंगीबेरंगी इंद्रधनुष्ये रंगवून छायाचित्रांची केली देव-घेव.

मुंबई, 29 मे, 2020 : वाढलेली टाळेबंदी आणि बंद शाळा यांमुळे जगभरातील मुलांचे प्रश्न अवघड झाले आहेत. त्यातही हलाखीच्या परिस्थितीतील कुटुंबांमधील मुलांना डिजिटल शिक्षणाची सोय नसल्याने त्यांना मूलभूत शिक्षणापासूनच वंचित राहावे लागत आहे. ही परिस्थिती त्यांच्यासाठी दुर्धर झाली आहे. शाळा बंद असल्यामुळे या मुलांना घरातच कोंडून राहणे भाग पडले आहे. ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य नसल्याने, त्यांना शैक्षणिक, सर्जनशील किंवा सामाजिकदृष्ट्या व्यग्र राहण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही.
वंचित समाजातील मुलींना १० वर्षांपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यास सक्षम करणारा नन्ही कली हा भारतातील सर्वात मोठा प्रकल्प सध्या देशातील 8 राज्यांमधील 1 लाख 70 हजार उपेक्षित मुलींना आधार देत आहे. टाळेबंदीने घातलेली आव्हाने असूनही प्रत्येक मुलगी सुरक्षित, समाजाशी जोडलेली आणि शिकत राहिली पाहिजे या उद्देशाने या प्रकल्पाने अभिनव उपाय योजले आहेत.
नन्ही कली संघातर्फे प्रत्येक मुलीशी आणि तिच्या कुटुंबाशी नियमित संपर्क साधून विचारपूस करण्यात येत आहे. मुलींना सक्रीय राहण्यास प्रोत्साहन देण्यासाठी नन्ही कली प्रकल्पाने उन्हाळी शिबिरांचे आयोजन केले असून त्यामध्ये मुलींना ओरिगामी, कला, कौशल्य, वाचन आणि कथाकथन यांसारख्या उपक्रमांमध्ये दूरस्थपणे गुंतवून ठेवले आहे. याव्यतिरिक्त, निबंध लेखन, चित्रकला, पोस्टर बनवणे,  ओरिगामी, कविता आणि कथालेखन या विषयाxवरील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा घेण्यात येत आहेत, ज्यामध्ये प्रकल्पांच्या विविध ठिकाणी असलेल्या मुली त्यांच्या घरातून उत्साहाने सहभागी होत आहेत.
अलीकडेच नन्ही कली प्रकल्पामध्ये मिशन इंद्रधनुष्य ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये विविध ठिकाणी असलेल्या मुलींनी रंगीबेरंगी इंद्रधनुष्ये रंगवून त्यांच्या कलाकृतींची छायाचित्रे इतरांना पाठविली. आशा आणि सकारात्मकता यांचा संदेश देण्यासाठी हा व्हर्च्युअली एकत्रित असा उपक्रम आखण्यात आला होता. त्यातून मुलींच्या कलात्मकतेला चालना मिळालीच, त्याशिवाय कोरोनाच्या साथीमुळे आलेला तणाव व निर्माण झालेली अनिश्चिततता यांतून मनाला सावरण्याची आणि सकारात्मकतेची भावना जोपासण्यास त्यांना मदत झाली. नन्ही कलीच्या सोशल मीडिया पृष्ठांवर या मोहिमेची जाहिरात केली गेली. समाजातील अनेक व्यक्तींनी त्यांचे स्वतःचे इंद्रधनुष्याचे चित्र पोस्ट करून या मोहिमेला आपला पाठिंबा दर्शविला. वादळी रात्र सरल्यानंतर दिसणाऱ्या इंद्रधनुष्याप्रमाणे नन्ही कलींनीदेखील सध्याच्या कठीण काळात सर्वांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटविले.
या सर्जनशील छंदांव्यतिरिक्त नन्ही कली संघ मुलींना घरून अभ्यास करण्यासदेखील प्रोत्साहित करीत आहे. शिक्षक मुलींकडून गणिताच्या समस्या सोडवून घेतात, तसेच सामान्य ज्ञानाच्या चाचण्या व कोडी सोडविणे यांतूनही मुलींचा अभ्यास घेण्यात येतो. दूरध्वनीवरून मुलींच्या अभ्यासाचा आढावा घेतला जातो. नन्ही कली संघातील या शिक्षकांशी मुलींचे गेल्या बऱ्याच काळापासून स्नेहाचे बंध निर्माण झाले असल्याने त्या शिक्षकांशी मोकळेपणाने संवाद साधतात, शंका निरसन करून घेतात व मार्गदर्शनही मिळवतात. ज्या मुलींकडे इंटरनेट / स्मार्टफोन आहे, त्यांना नन्ही कलीकडून वर्कशीट्स व शासनाने सुरू केलेल्या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मच्या लिंक पाठविण्यात येतात.
प्रकल्पाच्या बऱ्याच ठिकाणी, नन्ही कलीतर्फे सध्या मास्क शिवले जात आहेत. त्यांचे वितरण मुली, त्यांचे कुटुंबिय आणि त्यांच्या समुदायातील सदस्यांना करण्यात येत आहे. फोन कॉल आणि व्हर्च्युअल मीटिंगद्वारे या समुदायांमध्ये स्वच्छतेच्या पद्धती आणि कोविड-19च्या प्रतिबंधक उपायांबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम नन्ही कली करीत आहे, तसेच अनेक कुटुंबांना घरगुती आवश्यक वस्तू मिळवून देत आहे. याशिवाय, नन्ही कली प्रकल्पातील शिक्षक आणि कार्यकर्ते यांच्यासाठी व्यापक ऑनलाईन प्रशिक्षण आणि क्षमता वाढवण्याच्या सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे; जेणेकरून शाळा पुन्हा सुरू झाल्याबरोबर हे सर्वजण पुढील कार्यवाही करण्यास सज्ज असतील.
महिंद्रा समुहाच्या सीएसआर विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा शीतल मेहता म्हणाल्या, “नन्ही कली या प्रकल्पासाठी सध्याचा काळ फार महत्त्वाचा आहे; कारण कोविड-19च्या संकटांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शिक्षण घेण्यापासून मुलींना डावलले जाण्याचे प्रमाण वाढू शकते. या अस्थिर काळात आम्ही मुलींशी संपर्क साधण्याचे नाविन्यपूर्ण मार्ग अवलंबले आहेत आणि घरी उपलब्ध असलेल्या अत्यल्प स्त्रोतांसह त्यांची शिक्षण घेण्याची प्रक्रिया सुरू राहील, यासाठी आमची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. भारतात असुरक्षित परिस्थितीत असलेल्या मुलींच्या शिक्षणास मदत करण्याचे आमचे प्रयत्न यापुढे दुपटीने वाढविण्याचे आम्ही ठरवले आहे. कोरोनाच्या साथीचे निमित्त होऊन या मुली मागे पडणार नाहीत, याची खातरजमा आम्ही करीत आहोत. मुलींच्या डिजिटल सक्षमीकरणावर गुंतवणूक करण्याच्या नियोजनावर आम्ही यापुढे भर देणार आहोत. हीच आमची पुढील दिशा असणार आहे.
--

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE