मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पातील २३७.१ किलोमीटरच्या नागरी बांधकामासाठी करारावर स्वाक्षऱ्या
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पातील २३७.१ किलोमीटरच्या
नागरी बांधकामासाठी करारावर स्वाक्षऱ्या
~ मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरसाठी करार स्वाक्षरी समारंभ~
नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) आणि लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी) लिमिटेड यांनी मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल (एमएएचएसआर) कॉरिडॉरच्या पॅकेज सी-४ साठीच्या कराराला अंतिम स्वरूप दिले आहे. एनएचएसआरसीएलने नोव्हेंबर २६, २०२० रोजी आयोजित केलेल्या करार स्वाक्षरी समारंभाला भारतातील जपानचे महामहीम राजदूत श्री. सातोशी सुझुकी व रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. व्ही. के. यादव उपस्थित होते.
एमएएचएसआर प्रकल्पाखाली झालेल्या प्रमुख करारांपैकी हा एक आहे. एमएएचएसआर प्रकल्पाच्या सी-४ पॅकेजमध्ये एकूण आरेखनाच्या सुमारे ४७ टक्के (५०८ किमी) भाग येतो. महाराष्ट्र-गुजरात सीमेपासून गुजरातमधील बडोदा शहरापर्यंतचा भाग यात येतो. कामाच्या व्याप्तीमध्ये व्हायडक्ट्सचे बांधकाम (२३७ किलोमीटर्स), स्थानकांचे बांधकाम (वापी, बिलीमोरा, सुरत व भडोच ही चार स्थानके), डेपोंची देखभाल, वापी व बडोदा यांदरम्यानचा बोगदा व सुरत डेपोचे बांधकाम आदींचा समावेश होतो. यासाठीचे बांधकाम १४६० दिवस (सुमारे ४ वर्षे) चालणे अपेक्षित आहे.
जेआयसीए इंडियाचे मुख्य प्रतिनिधी श्री. कात्सुओ मात्सुमोतो यावेळी म्हणाले, "नोव्हेल कोरोनाव्हायरस आजाराने संपूर्ण जगापुढे अभूतपूर्व अशी आव्हाने उभी केलेली असताना, भारतीय अर्थव्यवस्थाही अनेकविध आव्हानांना तोंड देत आहे. अशा परिस्थितीत देशाच्या भक्कम आर्थिक वाढीची संभाव्यता प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणे हे आव्हानाला तोंड देण्याच्या सर्वोत्तम धोरणांपैकी एक आहे. महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन्ही राज्ये राष्ट्राच्या वाढीचे चालक आहेत आणि जपानमध्ये हाय-स्पीड रेल्वे प्रणालीने अर्थव्यवस्थेला चालना दिली त्याप्रमाणे या दोन राज्यांतील आर्थिक वाढीलाही चालना मिळेल. एमएएचएसआर विस्तृत स्तरावर प्रादेशिक आर्थिक व सामाजिक वाढीत योगदान देईल असा विश्वास जेआयसीएला वाटतो. यामुळे भविष्यकाळातही स्थानिक रहिवाशांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व उत्पन्नवाढ होऊ शकेल.”
जेआयसीए एकूण २५०,००० दशलक्ष जेपीवाय (सुमारे १८,००० कोटी रुपये) ओडीए कर्जाचा पुरवठा २०१७ पासून करून मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल प्रकल्पाला सहाय्य करत आहे. मुंबई आणि अहमदाबाद या शहरांदरम्यान जपानचे शिंकान्सेन तंत्रज्ञान (“बुलेट ट्रेन” म्हणूनही हे तंत्रज्ञान ओळखले जाते) वापरून उच्च-वारंवारतेची मोठ्या प्रमाणातवरील वाहतूक व्यवस्था विकसित करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. त्यायोगे भारतातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊ शकेल आणि प्रादेशिक आर्थिक विकासालाही हातभार लागू शकेल.
Comments
Post a Comment