‘आयआयटी-कानपूर’मध्ये आतापर्यंतचा पहिला आभासी दीक्षांत समारंभ साजरा
‘आयआयटी-कानपूर’मध्ये आतापर्यंतचा पहिला आभासी दीक्षांत समारंभ साजरा
» ‘कोविड-19’च्या उद्रेकानंतर जूनमध्ये सेमिस्टर संपल्यावर झालेला आभासी दीक्षांत समारंभ
» पदवीधर, पदव्युत्तर आणि डॉक्टरेटच्या 2008 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान, सुमारे 100 बक्षिसांचे वितरण
» उत्कृष्ट पीएचडी प्रबंधांना प्रथमच पारितोषिके
» ‘आयबीएम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा हे प्रमुख पाहुणे
10 नोव्हेंबर, 2020: कानपूर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी-के) या संस्थेचा 53 वा दीक्षांत समारंभ आभासी (व्हर्च्युअल) स्वरुपात साजरा करण्यात आला. या समारंभात पदवीधर, पदव्युत्तर आणि ‘डॉक्टरेट’च्या 2008 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांना या प्रसंगी सुमारे 100 बक्षिसे देण्यात आली. आभासी स्वरुपात साजरा होणारा या संस्थेचा हा पहिलाच दीक्षांत समारंभ ठरला. ‘कोविड-19’ साथीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचे पालन करण्यासाठी विद्यार्थी या समारंभास प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाहीत. ‘आयबीएम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ‘आयआयटी-के’चे माजी विद्यार्थी डॉ. अरविंद कृष्णा हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. ‘आयआयटी-के’चे गव्हर्नर्स बोर्डाचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन के. कोपिलिल हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
“दीक्षांत समारंभ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासात महत्त्वाचा टप्पा असतो. विद्यार्थ्यांनी केलेल्या कष्टांचे व कामगिरीचे कौतुक होणारी ही एक संस्मरणीय घटना असते. शिक्षकांनाही याच वेळी आपल्या कष्टांना आलेली फळे पाहावयास मिळतात. म्हणूनच, कोविडच्या साथीची परिस्थिती असूनही दीक्षांत समारंभ घेणे महत्वाचे होते. अर्थात विद्यार्थ्यांची सुरक्षितता जपण्यासाठी त्यांची गर्दी टाळण्याच्या हेतूने हा समारंभ संस्थेच्या आवारात प्रत्यक्ष घेण्याऐवजी आभासी स्वरुपात घेण्याचे ठरविण्यात आले. यंदा प्रथमच दीक्षांत समारंभ ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला. देशभरातील विद्यार्थी, शिक्षक व संबंधितांनी आपापल्या घरांतून ‘लॉग इन’ करून त्यास दिलेल्या अप्रतिम प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलो आहोत, ”असे ‘आयआयटी-के’चे संचालक प्रा. अभय करंदीकर म्हणाले.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना दीक्षान्त समारंभाचे प्रमुख अतिथी डॉ. अरविंद कृष्णा यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी जीवनातील तीन मूलभूत मूल्यांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले. कुतूहल बाळगणे, खंबीर राहणे आणि आपण जे काही करू, त्याचा अर्थ शोधणे, ही ती तीन मूल्ये आहेत. त्यांचे परिश्रमपूर्वक अनुसरण केल्याने कारकीर्दीत यशस्वी होण्यास आपल्याला मदत झाली आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्यापेक्षा वेगळे असलेल्या व्यक्तींकडूनही काही शिकावे, कारण त्यामुळे आपल्या विचारसरणीला भिन्न परिमाण मिळतात, असे डॉ. कृष्णा विद्यार्थ्यांना म्हणाले. सध्याचे विद्यार्थी हे जगाच्या तंत्रज्ञानातील घडामोडींनी सुसज्ज व अद्ययावत असल्याने आताच्या परिस्थितीतही ते उभारी दाखवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘आयआयटी-के’मधील आपल्या पूर्वीच्या दिवसांचे स्मरण करीत डॉ. कृष्णा यांनी, अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र यांसारख्या विषयांचे सखोल ज्ञान आणि विश्लेषणात्मक व सर्जनशीलपणे विचार करण्याची क्षमता यांसारखी विविध कौशल्ये आपल्याला या संस्थेतच प्राप्त करता आली, असे सांगून, या कौशल्यांमुळेच आपली ‘आयबीएम’मधील कारकीर्द घडण्यास प्रचंड मदत झाली, असेही नमूद केले.
डॉ. कृष्णा यांनी 1985 मध्ये विद्युत अभियांत्रिकी विषयातील बॅचलर पदवी मिळवली. 1990 मध्ये इलिनॉईस विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी विषयात पीएचडी पूर्ण केल्यावर, त्याच वर्षी त्यांनी आयबीएममध्ये प्रवेश घेतला. 2015 मध्ये त्यांना ‘आयबीएम’मध्ये संशोधन विभागात वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून बढती देण्यात आली. नंतर ‘आयबीएम’च्या ‘क्लाऊड व कॉग्निटिव्ह सॉफ्टवेअर’ विभागात त्यांची बदली झाली. जानेवारी 2020 मध्ये त्यांनी ‘आयबीएम’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा भार स्वीकारला. त्यांनी एक डझनाहून अधिक पेटंट्सचे सह-लेखन केले असून कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाऊड, क्वांटम कंप्यूटिंग व ब्लॉक चेन या विषयांत ‘आयबीएम’साठी नवीन बाजारपेठ निर्माण केली व तिचा विस्तारही केला. जुलै 2019 मध्ये आयबीएमने ‘रेड हॅट’चे अधिग्रहण 34 अब्ज डॉलर्समध्ये केले, त्यात डॉ. कृष्णा यांची मोलाची भूमिका होती.
आजच्या दीक्षान्त समारंभामध्ये बॅचलर्स आणि बॅचलर्स-मास्टर या दुहेरी पदवी अभ्यासक्रमांच्या 931 विद्यार्थ्यांना पदव्या देण्यात आल्या. 204 विद्यार्थ्यांना सर्वोत्तम श्रेणी (8.5 व त्यापेक्षा जास्त सीपीआय) मिळाली. सर्व विद्यार्थ्यांना पदव्या आणि पदके टपालाने पाठविण्यात येणार आहेत.
यंदा प्रथमच सर्व विभाग व आंतरशाखा या स्तरांवर सर्वोत्कृष्ट पीएचडी प्रबंधांसाठी पारितोषिके देण्यात आली. एकूण 28 पीएचडी पदवीधरांना उत्कृष्ट पीएचडी प्रबंधांसाठी बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. 4 वर्षे / 5 वर्षे कालावधींच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या सर्व शाखांमध्ये मिळून सर्वोत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी केल्याबद्दल राघव गर्ग या विद्यार्थ्याला 2020चे राष्ट्रपती सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. 5 वर्षे कालावधीच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट अष्टपैलू यश व नेतृत्त्व यांसाठी सौम्यदीप दत्ता या विद्यार्थ्याला 2020चे संचालकांचे सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. 4 वर्षे कालावधीच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट अष्टपैलू यश व नेतृत्त्व यांसाठी आयुषी बन्सल या विद्यार्थिनीला 2020चे संचालकांचे सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर, 4 वर्षे / 5 वर्षे कालावधींच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट अष्टपैलू यश मिळवल्याबद्दल सिद्धार्थ श्रीवास्तव या विद्यार्थ्याला 2020चे ‘रतन स्वरूप स्मृति पारितोषिक’ देऊन सन्मानित करण्यात आले.
पारितोषिके मिळवणाऱ्यांमध्ये दोन प्राध्यापकांचाही समावेश होता. गणित व सांख्यिकी विभागाचे प्रा. अरीजित गांगुली यांना 2020चा ‘सुशिला व कांतिलाल मेहता पारितोषिक’ देऊन गौरविण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अध्यापनातून आणि संशोधनातून शुद्ध गणित हा विषय घेण्यासाठी प्रोत्साहित केले. यांत्रिक अभियांत्रिकी विभागाचे प्रा. मोहित सुभाष लॉ यांना ‘गोपाल दास भंडारी स्मृति सर्वोत्कृष्ट अध्यापक पारितोषिक’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पदवीपूर्व अभ्यासक्रमांतील विद्यार्थांच्या बॅचने त्यांची उत्कृष्ट शिक्षक म्हणून निवड केली होती.
Comments
Post a Comment