आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'खिसा'ची निवड

 


आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'खिसा'ची निवड

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांवर आपली मोहोर उमटवणाऱ्या 'खिसा' या मराठी शॉर्टफिल्मची ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृत निवड झाली आहे. हा महोत्सव १६ ते २४ जानेवारी २०२१ दरम्यान गोव्यात होणार आहे. 
   पी.पी. सिने प्रॉडक्शन, मुंबई आणि लालटिप्पा निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन राज प्रीतम मोरे यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे लेखन कैलास वाघमारे यांचे आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण विदर्भातील अकोला येथे झाले आहे. 
     इस्तंबूल फिल्म अवॉर्ड्स २०२० मध्ये 'खिसा' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट पटकथा हे पुरस्कार मिळाले. तर अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या १० व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवातही 'खिसा'ने सर्वोत्कृष्ट पटकथेच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. तुर्कस्थानातील इस्तंबूल येथे मार्च २०२१ मध्ये होणाऱ्या आयएफएच्या वार्षिक लाइव्ह स्क्रीनिंग मेळाव्यात प्रतिष्ठित अशा गोल्डन स्टार पुरस्कारासाठी ही शॉर्टफिल्म पात्र ठरली असून डब्लिन इंटरनॅशनल शॉर्ट अँड म्युझिक फेस्टिव्हल २०२० मध्ये 'खिसा'ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी नामांकन मिळाले आहे. या फेस्टिवलमध्ये या शॉर्टफिल्मचे प्रीमिअर ऑनलाईन स्क्रिनवर दाखवण्यात येणार आहे. मुंबई इंटरनॅशनल कल्ट फिल्म फेस्टिव्हलमध्येही 'खिसा' ने सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताच्या पुरस्कार मिळवला आहे. 
  कॅनडाच्या मॉन्ट्रियल इंडिपेंडंट फिल्म फेस्टिव्हल, २६ व्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, डायोरोमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, अर्जेंटिनाच्या डायोरोमा इंडी शॉर्ट्स अवॉर्ड्स, ब्युनोस आयर्स, येथील महोत्सवांत 'खिसा'ची अधिकृत निवड करण्यात आली आहे. २८ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत धर्मशाळा येथे होणाऱ्या धर्मशाळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही या शॉर्टफिल्मची निवड झाली होती. या वेळी या शॉर्टफिल्मचे वर्ल्ड प्रीमिअरही होणार होते मात्र सध्या सुरु असलेल्या महामारीमुळे या महोत्सवाचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले.  
  ललित कला अकादमीतर्फे ५४ वा राष्ट्रीय अकादमी पुरस्कार पटकावणारे राज प्रीतम मोरे आपल्या 'खिसा' या पहिल्या चित्रपटाबद्दल सांगतात, ''खिसा ही कथा देशाच्या सामाजिक वातावरणावर आणि खेडेगावातील आजही संकुचित असलेल्या दृष्टिकोनावर भाष्य करणारी आहे. महाराष्ट्रातील एका लहान गावात इतर मुलांच्या खिशापेक्षा मोठा खिसा शिवून घेणाऱ्या मुलाची खिशात न मावणारी कथा म्हणजे 'खिसा' मन हेलावून टाकणारी ही कथा आहे.'' 
  या शॉर्टफिल्ममध्ये कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, श्रुती मधीदीप, डॉ. शेषपाल गणवीर आणि वेदांत श्रीसागर यांच्या भूमिका असून याला पारिजात चक्रवर्ती यांचे संगीत लाभले आहे. संकलनाची धुरा संतोष मैथानी यांनी सांभाळली असून सिमरजितसिंह सुमन यांनी फोटोग्राफीचे दिग्दर्शन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24