‘एल अँड टी'ने सुरू केले 'प्लॅनेट एल अँड टी' हे जागतिक दर्जाचे कॉर्पोरेट अनुभव केंद्र
‘एल अँड टी'ने सुरू केले 'प्लॅनेट एल अँड टी'
हे जागतिक दर्जाचे कॉर्पोरेट अनुभव केंद्र
· या डिजिटल स्वरुपातील कॉर्पोरेट अनुभव केंद्रामध्ये 12 हाय-टेक विभागांत मिळेल एक थक्क करणारा अनुभव.
· ‘एली’ आणि ‘टी’ या यंत्रमानवांमार्फत ‘प्लॅनेट एल अँड टी’मध्ये अभ्यागतांना मार्गदर्शन, यातून ‘एल अँड टी’चा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर असलेला भर दर्शविण्याची कल्पकता.
मुंबई, 29 डिसेंबर, 2020 : अभियांत्रिकी, खरेदी व बांधकाम प्रकल्प, उत्पादन, संरक्षण आणि सेवा या सर्व क्षेत्रांत एकत्रितपणे कार्यरत असलेल्या भारतातील आघाडीच्या ‘लार्सन अँड टुब्रो ‘कंपनीने आज ‘प्लॅनेट एल अँड टी’ हे डिजिटल स्वरुपातील नवीन कॉर्पोरेट अनुभव केंद्र खुले केले. मुंबईतील पवई येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘ए. एम. नाईक टॉवर’मध्ये सुमारे 10,500 चौरस फूट जागेत हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
‘एल अँड टी’च्या विश्वाची एक मंत्रमुग्ध करणारी झलक देणाऱ्या ‘प्लॅनेट एल अँड टी’मध्ये, कंपनीचा गेल्या आठ दशकांचा विलक्षण इतिहास आणि तंत्रज्ञानामुळे कंपनीचे भवितव्य कसे घडत गेले याचा प्रवास दर्शकांना अनुभवता येतो. यंत्रमानवांतर्फे मार्गदर्शन व होलोग्राफिक प्रतिमा, मोठे टच स्क्रीन आणि ‘मल्टी-सरफेस प्रोजेक्शन इमर्सिव्ह झोन' यांच्या माध्यमातून कंपनीच्या व्यावसायिक अभ्यागतांना आणि अतिमहत्त्वाच्या अतिथींना यापूर्वी कधीही मिळाला नसेल, असा अनुभव येथे मिळेल.
या अविस्मरणीय प्रसंगी, ‘लार्सन अँड टुब्रो’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एन. सुब्रह्मण्यन म्हणाले, “आमच्या समुहाने गेल्या 8 दशकांच्या कालावधीत उभ्या केलेल्या वारशाची कहाणी व भविष्याची परिभाषा या ‘प्लॅनेट एल अँड टी’मध्ये दिसून येते. डिजिटलीकरण व भविष्यकाळात स्वीकाराव्या लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याशी हे केंद्र जोडले गेले आहे. आपल्या देशाला व जगालाही आकार देणाऱ्या ‘एल अँड टी’च्या कथा व्यक्त करण्यात हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल. आमच्या भागीदारांसह अर्थपूर्ण मार्गाने व्यग्र राहण्यात, समुदायांमध्ये होणारा आमच्या कामकाजाचा परिणाम दर्शविण्यात, वर्तमानातील व भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देण्यात, तसेच ‘एल अँड टी’च्या जीवनशैलीचा प्रचार करण्यात ‘प्लॅनेट एल अँड टी’ आम्हाला मदत करील.”
या अनुभव केंद्रामध्ये बारा महत्त्वाचे विभाग आहेत. त्यांमधून अभ्यागतांना मोठी फेरी मारता येईल किंवा ‘एल अँड टी’च्या भूतकाळातील, वर्तमानातील व भविष्यकाळातील विशिष्ट पैलू बारकाईने पाहता येतील. केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळील लॉबीमध्ये तंत्रज्ञानावर भर देणारा मंच आहे. येथे ‘एली’ आणि ‘टी’ या नावाचे दोन यंत्रमानव अभ्यागतांचे स्वागत करतील व केंद्राच्या पहिल्या विभागाची – स्वागत कक्षाची माहिती देतील. एखाद्या लहान तारांगणाच्या स्वरुपात असलेल्या स्क्रीनवर केंद्राची झलक देणारा लघुपट दाखविण्यात येतो व ‘प्लॅनेट एल अँड टी’मध्ये येणाऱ्या अभ्यागतांचे स्वागत करण्यात येते.
कॉर्पोरेट कथाकार अभ्यागतांना ‘माईलस्टोन्स’ या विभागात घेऊन जातात आणि ‘प्लॅनेट एल अँड टी’ची सफर सुरू होते. या ठिकाणी एका विशाल संवादात्मक स्क्रीनवर ‘एल अँड टी’चा गेल्या आठ दशकांचा इतिहास जीवित करण्यात आला आहे. त्यापुढील 'लीगसी ऑफ लीडरशिप' या विभागात ‘एल अँड टी’च्या संस्थापकांपासून सध्याच्या नेतृत्वापर्यंत कंपनीच्या प्रगतीत योगदान दिलेल्यांची कामगिरी दर्शविण्यात आली आहे. ‘एल अँड टी’चे अध्यक्ष ए. एम. नाईक यांना ‘द नॅशनालिस्ट’ म्हणून ओळखले जाते; त्यांनी ‘एल अँड टी’ची जडणघडण ज्या प्रकारे केली, त्यावर आधारीत ‘द नॅशनालिस्ट’ याच नावाने एक स्वतंत्र विभाग येथे बनविण्यात आला आहे. नाईक यांना मिळालेली असंख्य पारितोषिके, त्यांचा माध्यमांशी झालेला संवाद आणि त्यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचे टप्पे यांतून ही कथा पूर्ण होते.
‘एल अँड टी’चा ठसा विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये अस्तित्त्वात आहे आणि ही कंपनी असंख्य मार्गांनी लोकांच्या जीवनावर परिणाम करते. 'द मेकिंग ए मार्क' या विभागात ‘एल अँड टी’च्या याच दोन पैलूंवर भर देण्यात आला आहे. आपले जीवनमान बदलण्यात नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग ‘एल अँड टी’ कसा करते, हे अभ्यागतांना 'इनटू द फ्युचर' या विभागात समजून येते. विविध क्षेत्रांतील ‘एल अँड टी’च्या क्षमतांचा आढावा पॅनोरमा या विभागात घेण्यात आला आहे. येथे मागणीनुसार व्यवसायागणिक लघुपट दाखविणारे एक बिझनेस थिएटर उभे करण्यात आले आहे. गेल्या काही दशकांमध्ये ‘एल अँड टी’ने पटकावलेली असंख्य पारितोषिके ‘अॅकोलेड्स’ या विभागात मांडण्यात आली आहेत.
'डीप डाईव्ह' या विभागात ‘एल अँड टी’ने सादर केलेल्या प्रमुख तंत्रज्ञानाची झलक पाहावयास मिळते. विशिष्ट तंत्रज्ञान वापरून कंपनी वस्तू कशा वेगाने, चांगल्या आणि स्वस्तात बनवू शकते, हे येथे दिसून येते. त्यापुढील विभागात, ‘एल अँड टी’ने उभारलेले स्टेडियमपासून अंतराळ प्रक्षेपकांपर्यंतचे विविध मोठमोठे डझनावारी प्रकल्प डिजिटल स्वरुपात मांडून या अनुभव केंद्राने आपल्या भव्यतेचे दर्शन घडविले आहे. ‘एल अँड टी’मधील काही तरुण अधिकाऱ्यांची प्रतिभा व नाविन्यपूर्ण विचार यांची मांडणी 'एल अँड टी स्टार्स' विभागात करण्यात आली आहे. ग्राहकांचे समाधान व सुविधा यांकरीता उत्पादनांमध्ये व प्रक्रियांमध्ये सुधारणा करणाऱ्या कार्यसंघांचे नेतृत्व ज्यांनी केले, अशा अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा यात समावेश आहे.
Comments
Post a Comment