गृहकर्जासाठी अर्ज करताना टाळल्या पाहिजेत अशा 5 प्रमुख चुका
गृहकर्जासाठी अर्ज करताना टाळल्या पाहिजेत अशा 5 प्रमुख चुका
- नीरज धवन, व्यवस्थापकीय संचालक, एक्सपिरियन इंडिया
- घर खरेदी करणे हा भावनाप्रधान निर्णय आहे. तुमच्यासोबत आयुष्यभर राहणाऱ्या स्मृती निर्माण करण्याची घर ही जागा आहे. मात्र, गृहकर्ज घेण्यापूर्वी आपण पुरेसे नियोजन करतो का? आपण निवडलेली गृहकर्ज योजना क्षेत्रातील सर्वोत्तम आहे अशी खात्री आपल्याला असते का?
गृहकर्ज घेण्यासाठी विश्लेषण व नियोजनाची गरज असते, कारण, ही एक दीर्घकालीन व महागडी बांधिलकी असते. पुरेसे संशोधन न करता घेतलेले कर्ज तुमच्या आर्थिक स्वास्थ्याला हानी पोहोचवू शकते. गृहकर्जासाठी अर्ज करताना लोकांनी खूपच सावध राहिले पाहिजे, जेणेकरून, अयोग्य योजना किंवा अयोग्य कर्जदात्याची निवड आपण करणार नाही.
गृहकर्जासाठी अर्ज करताना केल्या जाणाऱ्या काही चुका पुढे दिल्या आहेत:
१. स्वत:चे मूल्यमापन न करणे: कोणत्याही कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी पहिली अनिवार्य पायरी म्हणजे चांगले क्रेडिट स्कोअर असणे. एक्सपिरियनसारखा क्रेडिट ब्युरो तुम्हाला मोफत व अमर्याद क्रेडिट रिपोर्ट्स पुरवतो. हे रिपोर्ट्स डाउनलोड करण्यासाठी सोपे व सोयीस्कर आहेत. 700हून अधिक क्रेडिट स्कोअर तुम्हाला अनुकूल योजना मिळवून देऊ शकतो. यामुळे तुम्हाला सर्वोत्तम बँकांमार्फत कर्जासाठी अर्ज करण्याची शक्तीही प्राप्त होते. कर्जदाते तुमच्या पतअर्हतेचे मूल्यमापन करतील; खराब क्रेडिट/ परतफेडीचा इतिहास निकृष्ट असेल तर स्कोअर खाली येईल आणि कर्जदार चांगल्या गृहकर्ज योजनांसाठी पात्र ठरणार नाही. एक्सपिरियन स्कोअर 300-700 असलेल्या ग्राहकांना, भारतातील बाजारपेठेत मंजूर होणाऱ्या गृहकर्जांपैकी, केवळ 7 टक्के कर्जे दिली जातात.
२. व्यवस्थित संशोधाचा अभाव: गृहकर्जे आता मोठ्या प्रमाणात घेतली जातात आणि सोप्या पद्धतीने उपलब्धही होतात. वाढत्या मागणीमुळे अनेकविध आर्थिक संस्था कर्जदाराच्या गरजा पूर्ण करणाऱ्या कस्टमाइझ्ड योजना पुरवतात. त्यामुळे एखाद्या संस्थेकडे कर्जसाठी अर्ज करण्यापूर्वी व्यवस्थित संशोधन करणेही तेवढेच महत्त्वाचे झाले आहे. घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांच्या गरजा पुन्हापुन्हा तपासून बघाव्या, वित्तपुरवठ्याचे नियोजन करावे, नियम व अटी तपासून बघाव्यात, प्रक्रिया शुल्कासारखे छुपे खर्च ओळखावे, परतफेडीचे लवचिक पर्याय तपासून बघावे, योग्य बँक व योजनेची निवड करावी. आता अनेक वेबसाइट्स तुम्हाला वेगवेगळ्या बँकाद्वारे दिल्या जाणाऱ्या गृहकर्ज उत्पादनांची तुलना करण्याची मुभा देतात. पुरेसे संशोधन न केल्यामुळे तुम्हाला अनावश्यक शुल्के भरावी लागू शकतात किंवा जास्त ईएमआय भरावा लागू शकतो.
३. कालावधी जेवढा कमी, तेवढी जोखीम अधिक: शक्यतो छोट्या कालावधीच्या कर्जांचा पर्याय स्वीकारणे टाळलेले उत्तम, कारण, कालावधी जेवढा कमी, तेवढी कर्जापोटी मिळणारी रक्कमही कमी असते. त्यामुळे ईएमआयची रक्कम बरीच वाढते आणि ईएमआय चुकण्याची जोखीमही वाढते. पात्र रक्कम ही वय,क्रेडिट इतिहास तसेच परतफेडीची क्षमता आदी अनेक बाबींवर अवलंबून असते. शिवाय, मोठ्या रकमेचे कर्ज मिळवण्यासाठी तसेच अनुकूल नियम व अटी प्राप्त करण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर उच्च असणे व परतफेडीची पार्श्वभूमी चांगली असणे आवश्यक आहे. कालावधी दीर्घ असेल, तर ईएमआयची रक्कम कमी होते आणि तुम्ही आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करू शकता.
४. परतफेडीची क्षमता: परतफेडीची क्षमता मोजताना अनेक जण एक मोठी चूक करतात. ती म्हणजे त्यांच्या मासिक खर्चांचा समावेश या हिशेबात करत नाहीत. बँक सामान्यपणे कर्ज मंजूर करताना अर्जदाराची दायित्वे विचारात घेते. तुमचे मासिक खर्च अधिक असतील आणि तुम्ही मोठ्या ईएमआयचे गृहकर्ज घेतले तर यातून कदाचित मोठे आर्थिक संकट निर्माण होऊ शकते. तुमचा ईएमआय मासिक उत्पन्नाच्या 30-40 टक्क्यांहून अधिक असता कामा नये. मोठ्या कर्जासाठी अर्ज करताना पगारवाढीसारख्या भविष्यकाळात घडणाऱ्या घडामोडींवर अवलंबून राहू नये, तर आपली वर्तमान आर्थिक स्थितीच गृहीत धरावी. वर्तमान स्थिती लक्षात घेता, कर्जासाठी अर्ज करताना किंवा महागडे घर निवडताना तुमच्या खर्चाचा सखोल अभ्यास करणे उत्तम ठरते.
५. विम्याचे संरक्षण बघून घेणे : गृहकर्ज घेणाऱ्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक संकटापासून वाचवण्यासाठी योग्य विमा संरक्षण घेतले पाहिजे. एखादे आकस्मिक संकट निर्माण झाल्यास, गृहकर्ज विमाकंपनी कर्जदाराच्या कुटुंबाला कर्ज फेडण्यात मदत करू शकते. गृहकर्जाला संरक्षण देणारी अनेकविध विमा उत्पादने आहेत. यामध्ये लाइफ कव्हर घेतल्यास तुमच्या दायित्वांचा त्यात समावेश होतो. दायित्वांना संरक्षण न देणे ही एक खूप मोठी जोखीम आहे पण बहुतेक गृहकर्जदारांना ती समजत नाही. तुमच्या कुटुंबियांवर कोणताही आर्थिक बोजा पडू नये म्हणून विमा संरक्षण घेणे खूपच आवश्यक आहे.
Comments
Post a Comment