17 व्या मिफ्फ मध्ये ‘मईरम- द फायरलाईन’ हा माणिपूरी दिग्दर्शक जेम्स खामेग्नबाम यांचा चित्रपट हिरव्या जंगलाची कथा सांगणारा

 

मानवता आणि सहृदयतेचे समान सूत्र सिनेमातून आत्मीयतेनं मांडणाऱ्या तीन दिग्दर्शकांची कथा

17 व्या मिफ्फ मध्ये ‘मईरम- द फायरलाईन’ हा माणिपूरी दिग्दर्शक 

जेम्स खामेग्नबाम यांचा चित्रपट हिरव्या जंगलाची कथा सांगणारा

(अशोक शिंदे यांजकडून)

मुंबई, 30 मे 2022 - मुंबईत कालपासून सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणेच या महोत्सवात अनेक उत्तमोत्तम विषयांवरील चित्रपट दाखवले जात आहेत. मिफ्फचे हे वैशिष्ट्य राहिलेले आहे, की या महोत्सवात निवडले गेलेले चित्रपट नेहमीच सामाजिक संदेश देणारे, मानवतेला आणि मानवाच्या सहृदयतेला साद घालणारे असतात. खरे तर हा संदेश काही मिनिटांच्या माहितीपटांमधून प्रेक्षकांच्या मनाला भिडेल अशा पद्धतीने पोहचवणे अत्यंत कठीण असते. मात्र, माहितीपट तयार करणारे दिग्दर्शक हे कौशल्य घेऊनच येतात, याचा प्रत्यय तुम्हाला या महोत्सवात नक्कीच येईल. 

मिफ्फचा भाग असलेल्या, ‘मिफ्फ डायलॉग’ मध्ये आज दोन माहितीपट दिग्दर्शक आणि म्यानमारच्या यंगून फिल्म स्कूलच्या क्युरेटर यांच्याशी प्रसारमाध्यमातल्या प्रतिनिधींनी संवाद साधला. माणिपूरचे युवा माहितीपट दिग्दर्शक, जेम्स खामेग्नबाम यांचा “मईरम – द फायरलाईन” या माहितीपट या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी निवडला गेला. या चित्रपटाविषयी माहिती देतांना, जेम्स खामेग्नबाम म्हणाले की त्यांच्या इंफाळ शहराजवळ असलेली लंगोलची ओसाड टेकडी हिरवीगार करण्याचं एक स्वप्न, लोइया नावाचा माणिपूरी तरुण पाहतो. त्याला तशाच समविचारी युवकांची साथ मिळते आणि ते सगळे मिळून वर्षानुवर्षे प्रचंड मेहनत करुन, या ओसाड टेकडीवर झाडे लावून तिला हिरवीगार बनवतात. मात्र उन्हाळ्यात जोराच्या वाऱ्यामुळे जंगलात वणवा पेटतो आणि वनसंपत्ती जाळून खाक होते. हे टाळण्यासाठी, युवकांची ही सगळी टीम मिळून ‘मईरम’ म्हणजे वणवा थांबवण्यासाठी एक फायरलाईन तयार करते. त्यामुळे निसर्गसंवर्धन होते, ज्याचा फायदा सगळ्या गावालाच होतो. आपण निसर्गाचे मालक नसून, त्याचे विश्वस्त आहोत, भूमीला आपली संस्कृती माता मानते. आपल्या या निसर्गाचे संवर्धन करणे, ही आपलीच जबाबदारी आहे, या भावनेने काम करणाऱ्या या निस्वार्थ युवकांचे प्रयत्न जेम्स यांना प्रेरणा देऊन गेले आणि म्हणूनच, त्यांनी ह्या सगळ्या मिशनवर हा सिनेमा तयार केला असं जेम्स खामेग्नबाम यांनी सांगितलं. ह्या सिनेमातून त्यांनी निसर्गाविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. निसर्गाशी संवाद साधत, त्यातल्या प्रत्येक घटकांच्या भावना मांडण्याचा हळुवार प्रयत्न केला आहे. या माहितीपटात केवळ 800 शब्द आहेत, असं त्यांनी सांगितलं.

ही सिनेमानिर्मिती आणि अशा झपाटलेल्या ध्येयवादी युवकांसोबत काम करणे हा अत्यंत आनंददायी अनुभव होता, असं खामेग्नबाम यांनी सांगितलंव्यवसायाने पत्रकार आणि स्तंभलेखक असलेल्या खामेग्नबाम यांचा हा पहिलाच माहितीपट आहे. या माहितीपटाची शुभारंभाचा माहितीपट म्हणून निवड केल्याबद्दल त्यांनी मिफ्फच्या आयोजकांचे आभार मानले. 

म्यानमारच्या यंगून फिल्म स्कूलचे आठ चित्रपट या महोत्सवात आहेत. या स्कूलच्या शिक्षिका आणि क्युरेटर देबजानी मुखर्जी यांनीही आजच्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. या महोत्सवात दाखवले जाणारे चित्रपट, ‘लैंगिक समानता’ आणि ‘मैत्री’ अशा दोन विषयांशी संबंधित आहेत, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या स्कूलचे विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून सिनेमांचे विषय आणतात, स्वतःच त्यावर विचार करतात आणि त्यांच्या आवडीनुसार, प्रतिभेनुसार चित्रपट बनवतात, त्यामुळे, हे अॅनिमेशन माहितीपट खूप वैविध्य असलेले आहेत, त्यात प्रत्येक विद्यार्थ्यांचा वैयक्तिक टच आहे, असं त्यांनी सांगितले. अत्यंत संवेदनशील विषयांवर चित्रपट बनवतांना अॅनिमेशन माध्यमाचा विशेष उपयोग होतो, कारण हे माध्यम आपल्याला शरीराच्या पलिकडे नेणारे असते, असेही देबजानी यांनी सांगितले.

या महोत्सवात त्यांच्या स्कूलचे 'काया लिली', 'व्हेव', 'होम', 'लिंबो', 'बियॉन्‍ड हेट्रेड', 'मोर दॅन स्कीन डीप', रायडिंग थरू द व्हेवज' आणि 'अवर टाऊन' असे माहितीपट आहेत. 

आजच्या पत्रकार परिषदेत, इन्व्हेस्टिंग लाइफ या हिन्दी-मराठी-इंग्रजी भाषेतील माहितीपटाच्या दिग्दर्शिका, वैशाली केंडले यांनीही माध्यमांशी संवाद साधला. मानव, प्राणी, निसर्ग या सगळ्यामधील समान चेतना केवळ जाणवलेल्या आणि ही चेतना जिवंत ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या तीन संवेदनशील व्यक्तींना त्यांनी आपल्या चित्रपटात एका सूत्रात बांधले आहे, ते सूत्र म्हणजे- सरव्‍हायवल', अस्तित्वाची लढाई. प्रत्येक सजीवाला जगण्याचा समान अधिकार आहे. मात्र कधी परिस्थिती तर कधी काही अपघात होतात, ज्यामुळे जगण्याचा हा मूलभूत हक्क हिरावला जातो. अशा स्थितीत मानवतेला आधार देणाऱ्या तीन सामाजिक कार्यकर्त्यांची कथा त्यांनी साकारली आहे. माजिदभाई लोखंडे हे रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांना तत्काल रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवा पुरवतात. कधी कोणी दुर्दैवाने दगावले तर त्यांचे अंत्‍यसंस्कार करतात. केवळ मानवतेच्या भावनेतून गेली कित्येक वर्षे ते स्वयंप्रेरणेने एकटेच हे कार्य करत आले आहेत. राघवेंद्र नांदे हे लहानपणापासून जखमी अवस्थेतल्या, संकटात असलेल्या मुक्या प्राण्यांची सुटका करतात, त्यांची शुश्रूषा करतात, त्यांना बरे करतात. कित्येक वर्षे, मनोभावे हे काम करत ते निसर्गाचे ऋण फेडत आहेत. अगदी हिंस्त्र प्राण्यांपासून ते मरणासन्न अवस्थेत असलेल्या प्राण्यांचीही ते सेवा-शुश्रूषा करतात, ते ही प्रसिद्धीपासून दूर राहून ! 

मृत्यू आणि अपघात जसा दुर्दैवी असतो, तेवढाच सामाजिक बहिष्कारही दुर्दैवी असतो. व्यक्तीला, कुटुंबाला सामाजिक दृष्ट्या बहिष्कृत केले तर ते जिवंतपणीच नरक यातना भोगतात. अशा व्यक्तींना, कुटुंबांना क्लेरेन्स मनटेरो, आधार देतात, त्यांच्यासाठी कायदेशीर लढाई लढतात, त्यांना समाजात पुन्हा स्वीकारले जावे यासाठी लोकांना भेटून त्यांचे मनःपरिवर्तन करतात. अशा या तिन्ही संवेदनशील मनांच्या अवलिया जगण्याची कविता म्हणजे, वैशाली केंडले यांचा 'इन्व्हेस्टिंग लाइफ' हा माहितीपट ! वैशाली केंडले ह्या अभिनेत्रीही आहेत. या आधी त्यांनी पिस्तुल्या आणि फँड्री या नागराज मंजुळे यांच्या गाजलेल्या चित्रपटातून अभिनय देखील केला आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24