उपजिविकेच्या नवीन संधींसह ९६९ महिलांच्या जीवनाला नवीन कलाटणी देण्यासाठी हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाची स्टँडर्ड चार्टर्ड बँकेशी भागीदारी
उपजिविकेच्या नवीन संधींसह ९६९ महिलांच्या जीवनाला नवीन कलाटणी देण्यासाठी हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाची स्टँडर्ड चार्टर्ड बँकेशी भागीदारी
मुंबई, १० जानेवारी २०२३ : गृहनिर्माण क्षेत्रातील ना-नफा संस्था (एनजीओ) हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाने स्टँडर्ड चार्टर्ड बँकेशी ९६९ महिलांना कौशल्य विकास, पर्यायी उपजीविकेच्या संधी आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी सूक्ष्म-उद्योग स्थापन करण्यात मदत करण्यासाठी भागीदारीची घोषणा केली आहे. हा प्रकल्प महिला सक्षमीकरण आणि उपजीविका हस्तक्षेपाद्वारे वंचित घटकांच्या जीवनांत सुधाराच्या दृष्टीने मोलाची भूमिका बजावणार आहे.
लाभार्थी महिला छत्तीसगड, महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यातील आहेत. या प्रकल्पाचे उद्दिष्ट महिलांमध्ये नेतृत्व गुण आणि तांत्रिक कौशल्यांसह सक्षम करणे, त्यांना उत्पन्न निर्मितीच्या कार्यात गुंतवणे आणि त्यांना शक्ती, स्थिरता आणि आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी बळ प्रदान करणे असे आहे. जेणेकरून त्यांचे स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी चांगले जीवन निर्माण करण्यासाठी बलशालीकरण होऊ शकेल.
हा उपक्रम तीन राज्यांमध्ये ८५ महिला बचत गट (स्वयं-सहायता गट- एसएचजी) तयार करून आणि बळकट करून पूर्ण करण्यात आला, ज्याद्वारे महिलांना एकत्र आणले गेले, तसेच व्यवसाय विकास, विपणन आणि सरकारी योजना समजून घेण्यासाठी प्रशिक्षण दिले गेले. बचत गटांना बीज भांडवल, व्यवसायाच्या प्रत्येक पायरीवर मदत आणि हॅबिटॅटच्या त्या त्या विषयांतील तज्ज्ञांकडून बहु-स्तरीय तांत्रिक प्रशिक्षणाद्वारे त्यांचे स्वतःचे व्यवसाय स्थापित करण्यात मदत करण्यात आली. याव्यतिरिक्त, बचत गटांच्या सदस्यांना त्यांच्या नवीन व्यवसायांसाठी बँक खाती उघडण्यासाठी आणि आर्थिक नोंदी ठेवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
क्रांती तांबे, एक बचत गट सदस्या आणि महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील नवोदित उद्योजक म्हणाल्या, “मला दुग्ध व्यवसाय हाताळणे सोडा, उद्योग चालवण्याबद्दल काहीच माहीत नव्हते. पण आमच्या बचत गटातील सहकारी महिलांची एकजूट, सखोल प्रशिक्षण आणि हॅबिटॅटकडून आम्हाला मिळालेल्या मदतीमुळे मला माझा आत्मविश्वास पुन्हा प्राप्त झाला. आता माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मीच करत आहे हे जाणून मला अधिक ताकदवान झाल्याचे वाटत आहे. खरंच, महिला एकत्र आल्यावर काहीही अशक्य नाही.’’
या उपक्रमावर भाष्य करताना, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजन सॅम्युअल म्हणाले, ‘‘२०२० पासून, कोविड-१९ निर्बंध आणि त्यानंतरच्या जागतिक टाळेबंदीच्या स्थितीचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आणि ग्रामीण भारतीय कुटुंबांच्या जीवनमानावर खोलवर परिणाम झाला आहे. ज्या कुटुंबांमध्ये एकटी महिला हीच एकमेव कमावती आहे अशा कुटुंबांना गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. महिला शेतमजूर म्हणून त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत कमी कमावत असल्याने, आम्हाला असे वाटले की या महिलांना उपजीविकेच्या पर्यायी संधींद्वारे सक्षम करणे हे त्यांच्या कुटुंबांना चांगले, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर चांगले जीवन जगण्यास मदत करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. या उपक्रमात स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.’’
“आमचा ठाम विश्वास आहे की नवीन भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय विकासासाठी महिलाच बिनीच्या फळीतील मशालवाहक आहेत. आमच्या ‘चेंजमेकर्स उपक्रमा’चे उद्दिष्ट महिलांचे सक्षमीकरण करणे आहे जेणेकरुन महिला कर्मचार्यांना आर्थिक वाढीच्या दिशेने एक आदर्श बदल घडवून आणता येईल. या प्रेरणादायी महिलांसाठी पर्यायी आणि अनोख्या उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या प्रकल्पात हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियासोबत सहकार्य करताना निश्चितच आनंद झाला,” असे स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या भारतातील शाश्वतता उपक्रमांच्या प्रमुख श्रीमती करुणा भाटिया म्हणाल्या.
सूक्ष्म-उद्योगांसाठी स्थान-विशिष्ट क्षेत्रांचे वर्गीकरण तीन क्षेत्रांमध्ये केले गेले होते, जसे की शेती ज्यामध्ये मशरूम, वांगी, टोमॅटो इत्यादी पिकांची व भाजीपाला लागवड समाविष्ट आहे; दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन यासारखे कृषी-संलग्न उपक्रम; आणि घरगुती उद्योग ज्यात डिटर्जंट्स, पेपर-प्लेट्स, मसाले आणि डाळ गिरण यांचा समावेश आहे.
Comments
Post a Comment