चाइल्डहूड कॅन्सर सर्व्हायव्हर्सनी केले मुंबईतील सायकल फॉर गोल्डचे नेतृत्व
चाइल्डहूड कॅन्सर सर्व्हायव्हर्सनी केले
मुंबईतील सायकल फॉर गोल्डचे नेतृत्व
रविवार, 16 फेब्रुवारी रोजी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर आणि पनवेल येथून 200 हून अधिक सायकलस्वारांनी विकास यादव आणि इतर 12 चाइल्डहूड कॅन्सर सर्व्हायव्हर्सच्या (बालपणी कॅन्सरवर मात केलेले जिगरबाज योद्धे) नेतृत्वाखाली 'सायकल फॉर गोल्ड' रॅलीत सहभाग घेतला. कॅनकिड्स किड्सकॅन - द नॅशनल सोसायटी फॉर चेंज फॉर चाइल्डहूड कॅन्सर इन इंडिया यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
एनसीपीए, नरिमन पॉइंट येथून सुरू झालेल्या या सायकल रॅलीदरम्यान सायकलस्वारांनी 9 किलोमीटरची सायकल रपेट केली. मरीन ड्राइव्हवर रविवारी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांसमोर त्यांनी बाल्यावस्थेतील कर्करोग बरा होऊ शकतो आणि कर्करोगग्रस्त मुलांना नवजीवन मिळू शकते हा संदेश दिला. या सायकलस्वारांनी मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या कॅनकिड्स कॅनशाळा या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवादही साधला. श्री. राजीव निवतकर (आयएएस), आयुक्त, वैद्यकीय शिक्षण आणि आयुष, महाराष्ट्र शासन यांनी या सायकल रॅलीला हिरवा कंदील दाखवला.
हा उपक्रम 'सायकल फॉर गोल्ड' या भारतातील सर्वात मोठ्या चॅरिटी सायकलिंग उपक्रमाच्या चौथ्या आवृत्तीचा एक भाग आहे. लहानपणी होणाऱ्या कर्करोगावरील उपचारांविषयी जनजागृती करणे, मदत आणि निधी गोळा करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 40 दिवसांत एकूण 6,00,000 किलोमीटर सायकलिंगचा टप्पा पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच, कॅनकिड्स किड्सकॅन यांच्या सर्वसमावेशक उपचारप्रणाली अंतर्गत, कर्करोगाशी लढणाऱ्या 24,000 मुलांच्या उपचारांसाठी या वर्षी 3 कोटी रुपयांचा निधी संकलित करण्याचा संकल्प आहे.
15 फेब्रुवारी रोजी पाळण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल चाइल्डहूड कॅन्सर डेच्या (आयसीसीडी) निमित्ताने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 'विशिष्ट, लोककेंद्री उपचारांनी एकत्र येऊ या : प्रत्येक मुलाला जिंकवू या' या इंटरनॅशनल युनियन फॉर चाइल्ड कॅन्सरच्या संकल्पनेशी ही रॅली सुसंगत होती.
या रॅलीत धैर्याच्या प्रेरणादायी कथा समोर आल्या. त्यापैकी एक होती विकास यादव यांची, ज्यांनी या रॅलीचे नेतृत्व केले. 25 वर्षीय विकास यांनी रेटिनोब्लास्टोमा म्हणजे डोळ्याच्या कर्करोगावर मात केली आहे. ते म्हणाले, "कर्करोगामुळे मी एक डोळा गमावला, तेव्हा वाटले की माझे आयुष्य संपले. पण कर्करोगाचे निदान हा शेवट नव्हे, तर संघर्षाची सुरुवात असते." ते पुढे म्हणाले, "मी सायकल चालवतो, कारण मी जगलो. प्रत्येक मुलाला या आजारातून बाहेर पडून आनंदाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे."
त्यांनी बाल कर्करोग उपचारांच्या सुधारणेसाठी सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "मला Access2Care म्हणजे कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी उपचार मिळावेत, असे प्रत्येक कर्करोगग्रस्त रुग्णाला वाटते. सरकार, रुग्णालये, डॉक्टर, स्वयंसेवी संस्था आणि समाज एकत्र आल्यास हा अधिक प्रभावी लढा देता येईल. यामुळे प्रत्येक मुलाच्या गरजा पूर्ण केल्या जातील आणि त्यांना कर्करोगावर मात करण्यासाठी आवश्यक मदत मिळू शकेल."
मुख्य अतिथी श्री. राजीव निवतकर (आयएएस), आयुक्त, वैद्यकीय शिक्षण आणि आयुष यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "महाराष्ट्रभरातील सायकलस्वार एकत्र येऊन कर्करोगाशी लढणाऱ्या मुलांसाठी जनजागृती करत आहेत, हे खरोखर प्रेरणादायी आहे. लहानपणी झालेला कर्करोग बरा होऊ शकतो आणि ही मुले केवळ वाचू शकतातच नव्हे, तर आनंदाने आणि उत्साहाने जगू शकतात हा संदेश 'सायकल फॉर गोल्ड'सारख्या उपक्रमांमुळे पुन्हा अधोरेखित होतो. कॅनकिड्स बाल कर्करोग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. त्यांची सर्वसमावेशक मदत पद्धती खरोखरच प्रशंसनीय आहे."
महाराष्ट्रात कॅनकिड्सने 20 कर्करोग रुग्णालयांसोबत भागीदारी केली असून, आजपर्यंत 13,000 हून अधिक मुलांना आणि त्यांच्या कुटुंबांना मदत केली आहे. यामध्ये निदान चाचण्या, औषधे, शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव, शिक्षण आणि निवासासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते.
संचालक मंडळाच्या सदस्या प्रीती धल्ल यांनी एकत्रित प्रयत्नांचे महत्त्व स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, "कर्करोग हा जगभरातील मृत्यूंसाठी कारणीभूत असलेला एक प्रमुख आजार आहे. भारतात दरवर्षी सुमारे 80,000 मुलांमध्ये कर्करोगाचे निदान होते. 'सायकल फॉर गोल्ड'सारख्या संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून आपण 2030 पर्यंत जागतिक आरोग्य संघटनेचे 60 टक्के हे सर्व्हायव्हल रेटचे (कॅन्सरमधून बरे होण्याचा दर) लक्ष्य गाठू शकतो आणि एकाही मुलाला वंचित राहणार नाही, हे सुनिश्चित करू शकतो."
"सायकल फॉर गोल्ड हा केवळ सायकलिंगचा उपक्रम नाही, तर तो व्यक्ती, संस्था आणि संपूर्ण समाजाला एकत्र आणणारी चळवळ आहे," असे प्रीती धल्ल म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, "या रॅलीच्या निमित्ताने सायकलने चालविण्यात आलेल्या किलोमीटरगणिक कर्करोगग्रस्त मुलांसाठी चांगल्या उपचारांसाठी, अधिक मदतीसाठी आणि त्यांच्या जगण्याच्या संधी वाढवण्यासाठी आपण एक पाऊल पुढे गेलो."
मुंबईतील रॅलीच्या यशानंतर हा उपक्रम देशभरातील हजारो कर्करोगग्रस्त मुलांसाठी आशा निर्माण करत आहे आणि लोकांना पावले उचलण्यास प्रेरित करत असून 16 मार्चपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे.
Comments
Post a Comment