चित्रपट क्षेत्रातील विविध घटकांकरिता कार्यशाळांचे आयोजन

 चित्रपट क्षेत्रातील विविध घटकांकरिता कार्यशाळांचे आयोजन 

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा 



गोरेगाव चित्रनगरीच्या माध्यमातून मराठी चित्रपट क्षेत्रातील उदयोन्मुख लेखकांसाठी कार्यशाळा, ग्रामीण तसेच शहरी भागातील होतकरू तरुणांसाठी अभिनय कार्यशाळा, निर्मात्यांसाठी निर्मिती कार्यशाळा, चित्रपट साक्षर रसिक तयार व्हावेत यासाठी चित्रपट आस्वादन कार्यशाळा यांसह विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी केली. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या 'चित्रांगण' या बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी त्यांनी नूतनीकरण केलेल्या कलागारे (स्टुडिओ) क्र ८ चे उद्घाटन केले. तसेच चित्रनगरीतील प्रशासकीय कामांचा आढावा घेतला.  यावेळी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, मुख्य लेखावित्ताधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, स्थापत्य उप अभियंता विजय बापट, विद्युत उप अभियंता अनंत पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी संजय कृष्णाजी पाटील उपस्थित होते.

"गोरेगाव चित्रनगरीच्या माध्यमातून या वर्षी मराठी चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख लेखकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून ग्रामीण तसेच शहरी भागातील होतकरू तरुण वर्गासाठी अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांनी या क्षेत्राकडे व्यवसायिक दृष्टीकोणातून बघावे या दृष्टीने चित्रपटाचे वितरण त्याचे अर्थकारण तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि आंतराराष्ट्रीय चित्रपटांची बाजारपेठ त्यांनी जाणून घ्यावी यासाठी मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच चांगले चित्रपटसाक्षर रसिक तयार व्हावेत म्हणून चित्रपट आस्वादन कार्यशाळांचे आयोजनदेखील करण्यात येणार आहे. 

मनोरंजनसृष्टीचा महाराष्ट्रभर विकास व्हावा म्हणून कोल्हापूर चित्रनगरी, एन.डी. स्टुडिओ (कर्जत), नागपूर चित्रनगरी प्रमाणेच नाशिक चित्रनगरीची स्थापना करण्याचा मनोदय आहे आणि त्यासाठी मौजे मुंडेगाव ता. इगतपुरी जि. नाशिक येथील शासकीय जागेवर नाशिक चित्रनगरी उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव येत्या २१ ते २४ एप्रिल २०२५ रोजी पु.ल.कला अकादमी येथे होणार असल्याची घोषणाही त्यानी यावेळी केली.  

यावेळी व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, ५०  व्या वर्षाकडे चित्रनगरीची घोडदौड सुरू आहे. त्यानिमित्ताने आपण नवीन योजना आणि चित्रनगरीचा पूर्णविकास करत आहोत. मनोविकासाय कलाविलास या बोधवाक्यावर आज चित्रनगरी चित्रपट, नाटक आणि कलेच्या जतन व संवर्धनासाठी सज्ज आहे. सुसज्ज चित्रनगरी होण्याच्या दृष्टिने 'चित्रांगण'ची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रांगणात चित्रपटाचे स्क्रीनिंग, परिक्षण, कार्याशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे”. 


Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE