‘लुक गुड फिल गुड’ वस्त्रदान उपक्रमात अभिनेता सोनू सूद सहभागी
‘लुक गुड फिल गुड’ वस्त्रदान उपक्रमात अभिनेता सोनू सूद सहभागी
रेमंड आणि गूंज फाउंडेशन चा सन्मानपूर्वक वस्त्रदान उपक्रम
मुंबई, ११ जुलै २०२५ : समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात रेमंडने गूंज या स्वयंसेवी संस्थेसोबत पुन्हा एकत्र येत आपल्या वार्षिक वस्त्रदान उपक्रमाच्या २०२५ सत्रासाठी ‘लुक गुड फिल गुड’ उपक्रम सुरू केला आहे. कपडे जेव्हा विचारपूर्वक पुढे दिले जातात तेव्हा ते दुसऱ्या कुणाच्या तरी आयुष्यात सन्मानाची भावना पुन्हा आणू शकतात. मोहिमेच्या या मुख्य संदेशाचा प्रसार करण्यासाठी अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूद यांना यात सहभागी करून घेण्यात आले आहे. प्रत्येक ग्राहकाला दान केलेल्या कपड्यांच्या संख्येनुसार जास्तीत जास्त १५ शिलाई व्हाऊचर्स मिळू शकतात. ही व्हाऊचर्स संबंधित दुकानात खरेदी केलेल्या रेमंडच्या फॅब्रिक्सवरील शिलाई शुल्कासाठी वापरता येतील.
वस्त्रदान उपक्रमाने गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने विस्तार केला आहे. या उपक्रमात लोकांना वापरण्यायोग्य असलेले पण आता गरज नसलेले, वापरात नसलेले कपडे दान करण्याचे आवाहन केले जाते. त्याबदल्यात, निवडक रेमंड दालन आणि काही आघाडीच्या मल्टी-ब्रँड आउटलेट्समध्ये मोफत शिलाई सेवा मिळते. हा उपक्रम ४ जुलैपासून सुरू झाला असून २७ जुलैपर्यंत चालेल. ग्राहकांना चांगल्या स्थितीतील कपडे दान करण्याचे आणि 'देण्याचा आनंद' अनुभवण्याचे आवाहन केले जात आहे. हे कपडे त्यानंतर मोहिमेच्या भागीदार गूंजच्या वितरण केंद्रांमध्ये तपशीलवार प्रक्रियेनंतर मटेरियल किट्सचा भाग बनतील. ही किट्स ग्रामीण समुदायांना जलस्रोतांचे पुनरुज्जीवन किंवा बांबू पूलांची उभारणी यांसारख्या त्यांच्या स्थानिक विकास समस्यांवर उपाय करण्यासाठी केलेल्या प्रयत्न आणि योगदानासाठी सन्मानस्वरूप दिली जातील.
परितोष तिवारी, रेमंड लाइफस्टाइल लिमिटेड म्हणाले,'‘लुक गुड फिल गुड’ हा नुसता केवळ एक उपक्रम नाही तर ते आमच्या मूल्यांचे एक प्रतिबिंब आहे. प्रत्येक दान केलेला कपडा कोणाच्यातरी आयुष्याचा भाग होऊ शकतो. यापूर्वीच्या प्रतिसादावरून हे स्पष्ट होते की लोकांना योगदान द्यायचे असते, त्यांना फक्त विश्वासार्ह आणि विचारपूर्वक मंचाची गरज असते. गूंजसोबतच्या भागीदारीतून तेच पुरविण्याचे आमचे ध्येय आहे.”
अंशू गुप्ता, संस्थापक-गूंज फाउंडेशन म्हणाले,“गूंज आणि रेमंड यांच्यातील दीर्घकालीन भागीदारी अनेक प्रकारे अनोखी आणि महत्त्वपूर्ण आहे. गेल्या काही वर्षातल्या या उपक्रमाच्या यशामुळे हे दिसून येते की जेव्हा लोकांना एखाद्या मोठ्या हेतूसाठी योगदान देण्याची संधी दिली जाते तेव्हा ते प्रतिसाद देतात. गूंजमध्ये गेल्या दोन दशकांतील आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून आम्ही लोकांच्या वापरात नसलेल्या कपड्यांविषयीच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये केवळ आवराआवर किंवा पुर्नवापर एवढाच उद्देश नाही तर गरज असलेल्या लोकांच्या सन्मानात भर घालणे, विकास आणि हवामान कृतीसाठी मोठ्या योगदानाच्या दृष्टीनेही हे महत्वपूर्ण ठरत आहे. भविष्यातही आम्हाला रेमंडसोबत अधिक काम करता येईल. त्यायोगे जगावर अधिक सखोल, सकारात्मक परिणाम करता येईल असे आम्हाला वाटते.”
‘लुक गुड फिल गुड’ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. २०२४ मध्येच ४ लाखांहून अधिक कपडे संकलित झाले. महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्ली या राज्यांमध्ये सर्वाधिक सहभाग नोंदवण्यात आला. विशेषतः विचारपूर्वक वापर आणि सामाजिक जबाबदारीबाबत जनजागृती वाढल्याने यावर्षीही हाच ओघ कायम राहील अशी रेमंडला अपेक्षा आहे.
Comments
Post a Comment