जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश असलेल्या किल्ल्यांचा चित्रनगरीने साकारला देखावा
जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश असलेल्या किल्ल्यांचा चित्रनगरीने साकारला देखावा
देखाव्यातून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य व पराक्रमाची गाथा
मुंबई : `चित्रनगरीच्या राजा'चा यंदाचा गणेशोत्सवातील देखावा आकर्षक ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य व पराक्रमाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील किल्ले व जिंजी किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा जीवनपट उलगडला आहे. या देखाव्याला पहिल्या दिवसापासून भाविकांची पसंती मिळत आहे.
हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण होणाऱ्या गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीत विराजमान होणाऱ्या श्री गणरायाचे यंदा ३२ वे वर्ष आहे.
महाराष्ट्रातील किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. आशिष शेलार , चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या संकल्पनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली हा देखावा साकारण्यात आला आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक सुमित पाटील यांनी हा देखावा साकारला आहे.
महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या ११ आणि तमिळनाडूच्या जिंजी आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली. त्याचबरोबर या किल्ल्यांच्या पराक्रमाची माहिती देण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांचा पराक्रम, त्यांची मूल्ये आणि त्यांच्या पर्यावरण प्रेमाची महती जनसामान्यांना समजावी, या दृष्टीकोनातून देखाव्यांना नाविन्यतेची जोड देण्यात आली आहे.
बोलीभाषेत राजमुद्रा!
छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेतील तपशील शाळकरी मुले व जनसामान्यांना सहजगत्या समजावा, यासाठी बोलीभाषेत राजमुद्रा मांडण्यात आली आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
प्रसिद्ध मूर्तीकार उदय खातू यांनी साकारली बाप्पाची मूर्ती.
गेली ७८ वर्षांचा इतिहास असलेले मुंबईतील प्रसिद्ध मूर्तीकार खातू बंधू यांचेपैकी श्री. उदय रामकृष्ण खातू यांनी यंदा पहिल्यांदाच चित्रनगरीच्या बाप्पाची मूर्ती साकारली आहे. सहा फूट उंच सिंहासनाधीश तलवार व त्रिशूळ धारण केलेली गणेशमूर्ती भवानी प्रभावळीसह विराजमान झाली आहे. मूर्तीचा गोडवा त्याची लिखाई अर्थात डोळे व इतर रेखीव कामामधून बाप्पाची प्रसन्न मुद्रा दिसत आहे. विशेष म्हणजे बाप्पांचे वस्त्र आणि आभूषणे विशेष उठून दिसत आहेत. भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन चित्रनगरी उत्सव समितीने केले आहे.
Comments
Post a Comment