मधुमेहाचे निदान झाल्यानंतर केवळ 3–5 वर्षांत तरुणांमध्ये डायबीटिक रेटिनोपथीचा धोका वाढत असल्याचा नेत्रतज्ज्ञांचा इशारा
मधुमेहाचे निदान झाल्यानंतर केवळ 3–5 वर्षांत तरुणांमध्ये डायबीटिक रेटिनोपथीचा धोका वाढत असल्याचा नेत्रतज्ज्ञांचा इशारा
• भारतामध्ये डायबीटिक रेटिनोपथीमुळे दृष्टी गमावणाऱ्यांचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढत आहे
• जनजागृती आणि सुरुवातीच्या टप्प्यात निदान हीच दृष्टी गमावण्यापासून बचाव करण्याची गुरुकिल्ली आहे
मुंबई, 26 सप्टेंबर 20025 : नेत्रतज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या चिंतेनुसार तरुणांमध्ये डायबीटिक रेटिनोपथीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाचे निदान झाल्यानंतर अवघ्या तीन ते पाच वर्षांतच या आजाराचे रुग्ण आढळू लागले आहेत. पूर्वी हा आजार प्रामुख्याने वयस्कर रुग्णांमध्ये दिसून येत असे, मात्र आता 40 वर्षांखालील व्यक्तींमध्येही याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. अव्यवस्थित जीवनशैली, रक्तातील साखरेची अनियंत्रित पातळी, तसेच उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि मूत्रपिंड विकारांसारख्या विकारांमुळे ही स्थिती अधिक गंभीर बनत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते डोळ्यांची नियमित तपासणी आणि सुरुवातीच्या टप्प्यात निदान यांद्वारेच दृष्टी कायमस्वरूपी गमावण्यापासून बचाव करता येऊ शकतो.
वर्ल्ड रेटिना डेच्या पार्श्वभूमीवर डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलमधील नेत्रतज्ज्ञांनी इशारा दिला आहे की मधुमेह, अनारोग्यदायी जीवनशैली आणि इतर दीर्घकालीन आजारांमुळे रेटिनाशी संबंधित आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सुमारे 12–15 टक्के मधुमेहींना रेटिनोपथीचा त्रास होतो, त्यापैकी 4–5 टक्के रुग्णांची स्थिती गंभीर होऊन दृष्टीला धोका पोहोचू शकतो. मात्र, दृष्टीला मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतरच अनेक रुग्ण उपचारासाठी पुढे येतात. तरुण रुग्णांमध्ये, तसेच उच्च रक्तदाब, लठ्ठपणा किंवा मूत्रपिंडाचे विकार असणाऱ्यांमध्ये हा धोका अधिक असतो. बैठी जीवनशैली, चुकीचा आहार, ताणतणाव किंवा धूम्रपान यांसारख्या घटकांमुळे ही स्थिती आणखी गंभीर बनते.
डायबीटिक रेटिनोपथी ही अशी स्थिती आहे ज्यात रक्तातील साखरेची पातळी जास्त झाल्यामुळे डोळ्यांच्या पडद्यामधील रक्तवाहिन्यांना इजा पोहोचते. सुरुवातीच्या टप्प्यात डोळ्यांपुढे ठिपके दिसणे, धुसर दृष्टी, काळे किंवा पोकळ डाग जाणवणे, रात्रीची दृष्टी कमकुवत होणे आणि रंग ओळखण्यात अडचण होणे, अशी काही लक्षणे दिसू लागतात. आजाराचे स्वरुप सौम्य असेल तर रुग्णांनी रक्तातील साखरेचे योग्य नियंत्रण ठेवल्यास हा त्रास आटोक्यात ठेवता येतो. मात्र, आजार गंभीर टप्प्यावर पोहोचला असेल तर लेझर उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते.
ताडदेवमधील क्लिनिकल सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ. हितेंद्र मेहता म्हणाले, “आमच्या रुग्णालयांमध्ये डायबीटिक रेटिनोपथीच्या उपचारासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत, परंतु जागरूकतेच्या अभावामुळे अनेक रुग्ण उशिरा, म्हणजे आजार पुढील टप्प्यात पोहोचल्यानंतरच येतात. अशा वेळी दृष्टी गमावण्यापासून बचाव करणे अधिक कठीण ठरते. आजार वाढेपर्यंत थांबू नका, विशेषतः तुम्ही मधुमेही असाल किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या. डोळ्यांची नियमित तपासणी करून घेतल्यास दृष्टीचे संरक्षण करण्यासाठी हे हितावह पाऊल ठरू शकते.”
डायबीटिक रेटिनोपथीसह बहुतेक रेटिनाच्या आजारांमध्ये सर्वात मोठे आव्हान म्हणजे उशिरा निदान होणे. हे आजार सुरुवातीला फारशी लक्षणे न दर्शवता वाढत जातात आणि अर्ध्याहून अधिक रुग्णांना दृष्टी गमावण्याची शक्यता निर्माण होईपर्यंत त्यांना या आजाराबद्दल काहीच माहिती नसते, असे अभ्यासांती दिसून आले आहे. चेंबूरचे सल्लागार नेत्रतज्ज्ञ डॉ. महेश शिव शरण सिंह म्हणाले, “डायबीटिक रेटिनोपथीसह बहुतेक रेटिनाच्या आजारांचा धोका हाच आहे की ते कोणतीही लक्षणे न दर्शवता बळावत जातात. जोपर्यंत दृष्टी कमी होत नाही, तोपर्यंत रुग्णांना कोणतेही बदल जाणवत नाहीत. धुसर दिसणे, डोळ्यांपुढे तरंगणारे ठिपके, प्रकाशाची चमक दिसणे किंवा काळे डाग जाणवणे अशा सुरुवातीच्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. त्वरित रेटिना तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे, कारण थोडासा उशीर झाल्यासही दृष्टी वाचविण्याऐवजी गमावण्याची शक्यता निर्माण होऊ शकते."
अनेक शहरी भागांमध्ये रेटिनातज्ज्ञ सहज उपलब्ध असल्याने आणि जागरूकतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे आजाराचे निदान तुलनेने लवकर होते. मात्र, ग्रामीण किंवा वंचित भागांमध्ये जागरूकतेचा अभाव आणि प्रगत उपचारांची मर्यादित उपलब्धता असल्याने बहुतेकदा दृष्टीचे नुकसान झाल्यानंतर रुग्ण वैद्यकीय मदत शोधतात. एक सकारात्मक बाब म्हणजे तंत्रज्ञानामुळे या क्षेत्राचे चित्र बदलू लागले आहे. एआय-आधारित निदान साधने आणि समुदाय स्तरावरील तपासणी शिबिरे यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातील निदान अधिक सुलभ होत आहे आणि आरोग्यसेवा मर्यादित असलेल्या भागांतील रुग्णांपर्यंतही हे उपाय पोहोचू लागले आहेत.
डोळ्यांच्या पडद्याच्या आजाराचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात करण्यासाठी आणि कायमस्वरूपी नुकसान होण्यापूर्वी त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लवकर आणि डोळ्यांची नियमित तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विरार येथील क्लिनिकल सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ. प्रीतम के. मोहिते म्हणाले, “धोकादायक बाब म्हणजे अधिकाधिक तरुण रुग्णांमध्ये दृष्टी कमी होण्याची समस्या दिसू लागली आहे. अनेकदा, आजार गंभीर स्वरूप धारण करत नाही तोपर्यंत डायबीटिक रेटिनोपथीची कोणतीही ठोस लक्षणे दिसत नाहीत. परंतु आधुनिक वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे वेळेवर हस्तक्षेप केल्यास डोळ्यांचे आरोग्य जपणे आणि भविष्यासाठी दृष्टीचे संरक्षण करणे शक्य आहे.”
Comments
Post a Comment