वर्धापन दिनी चित्रनगरीकडून सामाजिक बांधिलकीचे दर्शन
वर्धापन दिनी चित्रनगरीकडून सामाजिक बांधिलकीचे दर्शन
४८ व्या वर्धापन दिनानिमित्त दादासाहेब फाळके चित्रनगरीकडून पूरग्रस्तांसाठी ५ लक्ष रुपयांची मदत : सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
मुंबई दि.२६ : महाराष्ट्रात आज पूरग्रस्थ स्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन पूरग्रस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आपण सर्वांनीही पूरग्रस्थ शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, त्याच भूमिकेतून राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत चित्रनगरी उत्सव समितीला मिळलेल्या पारितोषिकाची राशी पूरग्रस्थांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतल्या बद्दल चित्रनगरीच्या कर्मचाऱ्यांचे कौतूक करत, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी चित्रनगरीच्या वतीने पूरग्रस्थाच्या मदतीसाठी ५ लक्ष रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा शुक्रवारी केली. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचा शुक्रवारी ४८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सेवा सप्ताह अंतर्गत वृक्षारोपण, रुग्णवाहिकेचे लोकार्पण तसेच एन.डी.स्टूडियोचे मोबाईल ऍप व चित्रनगरीचे डॅशबोर्डचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्यासह महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना मंत्री आशिष शेलार यांनी चित्रनगरीच्या गेल्या ४८ वर्षाच्या वाटचालीबद्दल गौरवोद्गार काढत वर्धापन दिना निमित्ताने उपस्थिताना शुभेच्छा दिल्या. तसेच सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असलेल्या चित्रनगरीने बदलत्या काळानुसार नवनव्या तत्रज्ञानास आत्मसाद करण्याची गरज व्यक्त केली. तसेच चित्रनगरीच्या आजवरच्या प्रवासात अमूल्य योगदान दिलेल्या सर्व घटकांतील चित्रकर्मीच्या कर्तृत्वाची दखल सुवर्ण महोत्सवी वर्षात घेतली जावी. चित्रनगरीचे अधिकारी व कर्मचारी यांना चित्रपट व कला या क्षेत्राविषयीचे व्यापक भान येण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित कराव्यात अशी सूचना केली. तर दोन वर्षांनी चित्रनगरी पन्नास वर्ष पूर्ण करत असताना त्यापुढील वर्षी ऑस्कर पुरस्काराला देखील १०० वर्ष पूर्ण होत आहेत. हा योगसाधून शतक महोत्सवी ऑस्कर पुरस्काराच्या अनुषंगाने आयोजित होणारा एक कार्यक्रम आपल्या चित्रनगरीतही व्हावा यासाठी आवर्जून प्रयत्न केले जातील. असे त्यांनी आश्वस्त केले.
यावेळी व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात महामंडळाच्या ४८ वर्षातील योगदानाचा आढावा घेतला. तसेच वर्तमान स्थितीत महामंडळाकडून राबविण्यात येत असलेल्या सेवा, उपक्रम, अभियानाची माहिती दिली.
IICT, FTII तसेच प्रसारभारती यांच्या समवेत महामंडळाने केलेल्या सामंजस्य कराराची माहिती देताना चित्रपट, कला व मनोरंजन या क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प येत्या काळात चित्रनगरीत उभारले जाणार आहेत असे सांगितले. चित्रनगरीला चित्रपट क्षेत्राचे वन स्टॉप डेस्टीनेशन करण्याचा प्रयत्न असून चित्रिकरणासाठीची परवाना प्रक्रिया सुलभ होण्यासाठी एक खिडकी प्रणाली २.० चित्रनगरी राबवत आहे. तसेच पुढील काळात कलासेतू पोर्टल २.० ची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती पाटील यांनी दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी केले. यावेळी वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाबरोबरच गुणवंत कर्मचाऱ्याचा सन्मान करण्यात आला.
महामंडळाच्या ४८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून चित्रपताका या त्रैमासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. महामंडळाच्या विविध योजना. सेवा,उपक्रम यांची माहिती देण्यासाठी तसेच चित्रपट,रंगभूमी व सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडीची दखल घेण्याच्या उद्देशाने महामंडळाकडून चित्रपताका या त्रैमासिकाची सुरुवात करण्यात आली आहे . शुक्रवारी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात या त्रैमासिकाच्या शुभारंभाच्या अंकाचे प्रकाशन झाले.
Comments
Post a Comment