हिंदुजा फाउंडेशन’कडून मुंबईत वंचित मुलांसाठी अर्थ-साक्षरता उपक्रमाची सुरुवात
हिंदुजा फाउंडेशन’कडून मुंबईत वंचित मुलांसाठी अर्थ-साक्षरता उपक्रमाची सुरुवात
· या पायलट उपक्रमांतर्गत वरळीच्या झोपडपट्टीमधील स्थलांतरित कुटुंबांतील ६वी ते ८वीमधील १४० विद्यार्थ्यांना लाभ
· प्रत्यक्ष अनुभवासाठी मुलांना बँकेत झीरो-बॅलन्स बचत खाते उघडण्यास प्रोत्साहन
मुंबई, 5 सप्टेंबर २०२५ – ११० वर्षांचा वारसा असलेल्या ‘हिंदुजा ग्रुप’मधील हिंदुजा फाउंडेशन या सामाजिक सेवेत गुंतलेल्या संस्थेने मुंबईतील एका सरकारी शाळेत ‘मनीवाइज एक्सप्लोरर्स’ हा आगळावेगळा अर्थ-साक्षरता कार्यक्रम सुरू केला आहे. वंचित मुलांना पैशांचे व्यवस्थापन आणि बँकिंगचा प्रत्यक्ष अनुभव देऊन सक्षम करणे हा या अनोख्या उपक्रमाचा उद्देश आहे.
हा पायलट प्रकल्प ‘लर्निंग लिंक्स फाउंडेशन’च्या सहकार्याने राबविण्यात आला असून त्यात ६वी ते ८वीतील सुमारे १४० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. गोष्टी, भूमिकानिवेदन, कला-कौशल्ये व चर्चासत्रांच्या माध्यमातून बजेट कसे करावे, सुजाण खर्च कसा करावा आणि ऑनलाइन सुरक्षितता कशी राखावी हे दोन आठवड्यांत मुलांना शिकविण्यात आले.
या उपक्रमातील विशेष बाब म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला बँकेत झीरो-बॅलन्स बचत खाते उघडण्याची संधी मिळाली. त्यामुळे मुलांना प्रत्यक्ष बँकिंगचा अनुभव मिळाला आणि आर्थिक आत्मविश्वासाची पायाभरणी झाली.
“रिझर्व्ह बँकेने आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत एक किमान पातळी ठरवून दिली आहे. देशातील २७ टक्क्यांहून कमी लोकसंख्येची अर्थ-साक्षरता या पातळीपर्यंत पोहोचते. या संदर्भातील जागतिक सरासरी ४२ टक्के आहे. प्रौढांमध्ये दिसणाऱ्या आर्थिक सवयी या लहानपणी मिळालेल्या शिक्षणावर व अनुभवांवर खोलवर अवलंबून असतात, असे काही संशोधनातून दिसून आले आहे,” असे हिंदुजा फाउंडेशनच्या प्रवर्तक परिवारातील सदस्या निन्या हिंदुजा यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “मनीवाइज एक्सप्लोरर्स हा उपक्रम वंचित समुदायातील मुलांना भविष्यातील आर्थिक स्वावलंबनासाठी आवश्यक ती कौशल्ये देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा केवळ शैक्षणिक उपक्रम नसून व्यवहाराच्या पातळीवर सशक्तीकरण घडविण्याचे हे व्यापक धोरण आहे. आर्थिक साक्षरतेला शालेय अभ्यासक्रमाचा स्थायी भाग बनविण्याचे नियोजन आम्ही विविध सरकारी शाळा व शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने केले आहे.”
‘लर्निंग लिंक्स फाउंडेशन’च्या प्रमुख भागीदार अॅग्नेस नॅथन यांनी सांगितले, “योग्य साधने दिल्यास मुले केवळ अभ्यासातच नव्हे तर जीवनासाठी आवश्यक कौशल्यांमध्येही प्रगती करतात हे ‘हिंदुजा फाउंडेशन’सोबतच्या भागीदारीतून दिसून आले आहे. ‘मनीवाइज एक्सप्लोरर्स’च्या यशामुळे वंचित आणि गरीब समुदायांना सशक्त करण्यासाठी आर्थिक साक्षरता किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट होते.”
मनीवाइज एक्सप्लोरर्स हा ‘हिंदुजा फाउंडेशन’च्या रोड-टू-स्कूल उपक्रमाचा भाग आहे. तो राष्ट्रीय वित्त शिक्षण धोरण (२०२०–२०२५) व राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० यांच्याशी सुसंगत आहे. ‘लर्निंग लिंक्स फाउंडेशन’ने निन्या हिंदुजा यांच्या सहकार्याने तयार केलेल्या अभ्यासक्रमात एनसीईआरटी व एनसीएफई या स्त्रोतांचा वापर करून गुंतागुंतीच्या आर्थिक संकल्पना सोप्या व आकर्षक पद्धतीने मांडल्या आहेत.
हा कार्यक्रम अनेक शाळांमध्ये सातत्याने राबविण्याचे ‘फाउंडेशन’चे उद्दिष्ट असून, अग्रगण्य संस्थांच्या भागीदारीतून आर्थिक साक्षरतेने समृद्ध अशी नवी पिढी तयार करण्याचे आहे.
Comments
Post a Comment