'खोया पाया': 56 व्या इफ्फीमध्ये परित्याग आणि प्रेमाची हृदयद्रावक कहाणी प्रदर्शित करण्यात आली
'खोया पाया': 56 व्या इफ्फीमध्ये परित्याग आणि प्रेमाची हृदयद्रावक कहाणी प्रदर्शित करण्यात आली
(अशोक रा. शिंदे यांजकडून)
दिग्दर्शक आशुतोष सिंग यांचा पहिला चित्रपट 'खोया पाया' आज 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खास प्रदर्शित करण्यात आला. कुंभमेळ्याच्या प्रचंड गर्दीत सोडून दिलेल्या आईवर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट एका वृद्ध आईची कथा सांगतो, जिला तिच्या मुलाने सोडून दिले आहे. तिला अनोळखी लोकांमध्ये अनपेक्षित मित्र सापडतात आणि शेवटी विश्वासघात करणाऱ्या पश्चात्तापी मुलाला ओळखण्यास ती नकार देते.
तुडुंब भरलेल्या चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित केल्यानंतर, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि प्रमुख कलाकारांनी महोत्सवाच्या ठिकाणी आयोजित पीआयबी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला.
आईची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी वृद्ध पालकांशी गैरवर्तन या चित्रपटाच्या विषयाबद्दल उत्कटतेने आपले मत मांडले . ही समस्या खूप व्यापक असल्याचे सांगत त्या म्हणाल्या : "मी अशी अनेक कुटुंबे पाहिली आहेत जिथे वृद्ध पालकांना वाईट वागणूक दिली जाते. सिनेमा हे एक शक्तिशाली माध्यम आहे जे समाजावर प्रभाव टाकू शकते. वृद्ध पालकांप्रति वाढती असंवेदनशीलता याबद्दल बोलले जाणे महत्त्वाचे आहे." वृद्ध पालकांना एकाकी सोडणारी मुले भारतासारख्या समाजात जास्त पहायला मिळू नये जिथे परंपरागत तीन पिढ्या एकत्र नांदतात असे मत त्यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या की या पटकथेने त्या लगेच प्रभावित झाल्याचे सांगत त्या म्हणाल्या : "जर त्या सोडून दिलेल्या आईच्या जागी मी असते तर मी परत आले नसते. स्वाभिमान आवश्यक आहे; आदराशिवाय, कौटुंबिक बंधांना अर्थ नसतो ." या प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितले की चित्रीकरणापूर्वीच्या कार्यशाळांमुळे टीमला पात्रे उत्तम रीतीने समजून घेण्यास आणि चित्रीकरणादरम्यान "पात्रांसोबत जगण्यास " मदत झाली.
मुलाची भूमिका करणारा अभिनेता चंदन रॉय सन्याल म्हणाला की, कलाकारांना अनेकदा सामाजिकदृष्ट्या अस्वीकारार्ह पात्रे साकारावी लागतात. त्याला वाटते की हा चित्रपट खूप प्रासंगिक आहे कारण जरी भारतात आईची पूजा केली जात असली तरी काही लोक वृद्ध पालकांना भार मानतात. त्यांनी ही भूमिका खलनायकी बनणार नाही याची काळजी घेत ही भूमिका साकारली, हे लक्षात घेऊन की दोषी व्यक्तींचेही स्वतःचे अंतर्गत समर्थन असते. त्यांच्या पात्राची अपराधीपणाची वेदनादायक जाणीव हा चित्रपटाचा एक महत्त्वाचा भावनिक भाग आहे.
अभिनेत्री अंजली पाटील यांनी सांगितले की, त्यांनी चित्रपटातील भूमिका कथेतील साधेपणासाठी स्वीकारली, जी समकालीन चित्रपटात दुर्मिळ आहे आणि दिग्गज अभिनेत्री सीमा बिस्वास यांच्याबरोबर काम करण्याची आणि शिकण्याची संधी यानिमित्ताने मिळाली.
चित्रपटाचे निर्माते हिमांशू राय यांनी आठवण सांगितली की एक वर्षापूर्वी गोव्यात पटकथा ऐकली होती आणि तिच्या ताकदीने आपण लगेच प्रभावित झालो होतो. ते म्हणाले की कथेचे सार त्यांच्याशी प्रतिध्वनीत झाले कारण ती कथा आई आणि मुलाच्या सर्वात मजबूत नात्याबद्दल आहे, जरी त्याला एक काळी बाजू देखील आहे. त्यांना वाटते की ही कथा खूप सशक्त आहे.
दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणारे आशुतोष सिंग यांनी महाकुंभातील प्रचंड गर्दीत चित्रपटाचे चित्रीकरण केले. त्यांचा गावही याच परिसरात आहे! कोट्यवधी भाविकांनी भेट दिलेल्या महाकुंभाच्या गर्दीत 10-12 दिवसांत चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. "चित्रपटाचा रंग महाकुंभातच सापडला" असे त्यांनी सांगितले. तसेच परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगमही त्यांनी अधोरेखित केला. डिजिटल उपकरणांसह फिरणारे यात्रेकरू, उत्साही लोकसंगीताचा माहोल आणि चित्रपटाच्या पोताला आकार देणारी दृश्ये – या सर्वांचे प्रतिबिंब चित्रपटात दिसून येते, असे त्यांनी नमूद केले.
आपल्या स्वतःच्या गावात चित्रीकरण करणे मजेदार असले तरीही कुंभात चित्रीकरण करणे हा सर्वात कठीण भाग होता, असे ते म्हणाले. "अशी ताकदवान कलाकारांची फळी असताना चित्रीकरण करणे म्हणजे फिल्म स्कूलमध्ये प्रशिक्षण घेण्यासारखे होते. एका चित्रपटासाठी उत्तम कलाकार असणे अत्यंत महत्त्वाचे असते”, असेही त्यांनी सांगितले.
कुंभसारख्या प्रत्यक्ष ठिकाणी चित्रीकरण करताना गर्दीचा सामना कसा करावा याबद्दल अधिक माहिती देताना, आशुतोष यांनी उघड केले की संपूर्ण कलाकार आणि तांत्रिक पथक स्थानिक लोकांसारखे कपडे घालत होते, कोणाच्याही अंगावर फॅन्सी "बोम्बैया कपडे" नव्हते. अशाप्रकारे, ते सहजपणे गर्दीचा भाग बनले! त्यांनी संगमातही डुबकी मारली. बरेच लोक व्हिडिओ कॅमेरे घेऊन फिरत असल्याने, शूटिंग उपकरणांचा वापर केल्याने ते फारसे वेगळे दिसले नाहीत, असे दिग्दर्शक म्हणाले. मात्र आव्हान एकच होते - गर्दीत चित्रपटातील पात्रे वेगळी दिसली पाहिजेत.

कुंभमेळ्यात चित्रीकरण करणे हे विलक्षण आणि आव्हानात्मक होते, परंतु साहसी आणि रोमांचक होते, असे चित्रपटाच्या मुख्य कलाकारांनी सांगितले. अंजली पाटील यांनी त्यांच्या व्यक्तीरेखेची कोणतीही दृश्ये कुंभमेळ्याची नसल्याने आपल्या दृश्यांचे तिथे चित्रीकरण न झाल्याबद्दल खंत व्यक्त केली. "गर्दीने चित्रीकरणात फार अडथळा आणला नाही, उलट खूप सहकार्य केले आणि साथ दिली, हे कदाचित आजूबाजूला असलेल्या आध्यात्मिक वातावरणामुळे घडले असावे", असे सीमा बिस्वास यांनी सांगितले.

Comments
Post a Comment