'गोंधळ’ने इफ्फीमध्ये महाराष्ट्राचे मध्यरात्रीचे मिथक आणि संगीत केले जिवंत

 

'गोंधळ’ने इफ्फीमध्ये महाराष्ट्राचे मध्यरात्रीचे मिथक आणि संगीत केले जिवंत


 

(अशोक रा. शिंदे यांजकडून) 

आज इफ्फी मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत, ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांना थेट महाराष्ट्रात मध्यरात्री होणाऱ्या प्रतिष्ठित विधीतील ढोल-ताशांचा गजर, फेर धरणारी वस्त्रे आणि दैवी भक्तिभावाच्या वातावरणात नेले. दिग्दर्शक संतोष डावखर आणि अभिनेते किशोर कदम यांनी श्रद्धेचे प्रतीक म्हणून सादर होणारी ही प्राचीन लोककला वासना, फसवणूक आणि सुटका यांच्या एका थरारक कथेचा कणा कशी बनली, हे उलगडून सांगितले.

गोंधळ: एक सिनेभाषा

चर्चा सुरू करताना, संतोष यांनी स्पष्ट केले की, हा चित्रपट थेट गोंधळ लोककथेवर आधारित आहे; या कलाप्रकाराचे वर्णन त्यांनी “आपल्या डोळ्यांसमोर हळूहळू नाहीशी होत चाललेली संस्कृती” असे केले. त्यांच्यासाठी हा चित्रपट केवळ एक थ्रिलर नसून, तो सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचा एक प्रयत्न आहे.

ते म्हणाले, "आम्ही एक लोप पावत असलेली परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण संस्कृतीचे असंख्य घटक आहेत आणि गोंधळ ही त्यापैकी सर्वात शक्तिशाली अभिव्यक्ती आहे. निर्मितीदरम्यान आलेल्या सर्व अडथळ्यांवर मात करून, आमच्या टीमने हा वारसा जपण्यावर विश्वास ठेवला."

अभिनेते किशोर कदम यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. "मी माझ्या गावात गोंधळात भाग घेत मोठा झालो आहे. हे केवळ एक नृत्य नाही, तर संपूर्ण समुदायाचे जिवंत होणे आहे," असे त्यांनी सांगितले. आठवणींमध्ये हरवलेल्या स्वरात त्यांनी शेजाऱ्यांचे एकत्र येऊन प्रार्थना करणे आणि उत्सव साजरा करत रात्रभर कला सादर करणे, याविषयी सांगितले.

या चित्रपटाची कथा सांगण्याची पद्धत ही “खोलवरच्या सिनेमॅटिक विचारसरणीतून" आल्याचे सांगत, त्यांनी विविध प्रकारचे धर्मविधी कथाकथनाचे माध्यम कसे बनतात यावर प्रकाश टाकला. "पारंपरिक गोंधळामध्ये, लग्नानंतरचे सादरीकरण ही समस्यामुक्त वैवाहिक जीवनासाठी केलेली प्रार्थना असते. या चित्रपटात, कथा गाणी आणि गोंधळाच्या माध्यमातून सांगितली गेली आहे. ही एक उत्कृष्ट सिनेमॅटिक कल्पना आहे आणि त्याचे संपूर्ण श्रेय दिग्दर्शकाचे आहे."

एखादे पात्र खरेखुरे साकारतांना झालेल्या सर्जनशील प्रक्रियेविषयीही सविस्तर बोलताना किशोर यांनी  सांगितले की,  खरी किमया म्हणजे विस्मरण. कलाकार म्हणून आपण चित्रीकरणासाठी जाताना स्वतःच्या कलेचा किंवा अनुभवाचा विचार घेऊन जाऊ नये. पटकथेतच सर्व काही अंतर्भूत असते. अनेकदा दिग्दर्शकाला फक्त तुमच्याकडून संवाद उच्चारून घ्यायचा असतो, कारण भावना आधीच त्या शब्दांत जिवंत असतात. प्रत्येक वेळी अभिनय करणे आवश्यक नसते.

प्रत्येक चौकटीत परंपरेचे जतन आणि मराठी सिनेमाला नवा मापदंड 

संतोषसाठी ‘गोंधळ’ हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. तो लहानपणी आजी-आजोबांसोबत गोंधळाच्या कार्यक्रमांना जात असे; त्या वेळी स्वयंपाक सामूहिकरीत्या तयार केला जात असे, प्रकाशयोजना अगदी साधी असायची आणि फक्त चार वाद्यांच्या साथीने गाणी सादर केली जात. आज मात्र आचारी येतात, पारंपरिक वाद्यांसोबत कीबोर्ड वाजवण्यात येतो आणि प्रकाशयोजना पूर्णपणे रंगमंचीय पद्धतीने केली जाते, असे त्याने सांगितले. पुढील पिढ्यांसाठी आहे तसाच, अस्सल गोंधळ टिपून ठेवण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.  एका रात्रीत चित्रीकरण केल्याने खर्च कमी झाला आणि वेषभूषा बदलावी लागली नाही. त्यामुळे अस्सल गोंधळाचा अनुभवही कायम राहिला, असे त्याने पुढे सांगितले.

संतोष यांनी भारतीय प्रेक्षकांच्या बदलत्या अभिरुचीविषयीही स्पष्टपणे मत व्यक्त केले. मराठी प्रेक्षकांना हिंदी चित्रपट सहज उपलब्ध असल्याने प्रादेशिक चित्रपटांनी सातत्याने उच्च दर्जा राखणे आवश्यक असल्याचे ते सांगतात.  आपल्याला एक नवीन मापदंड स्थापित करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. जर प्रेक्षक टिकीटसाठी पैसे देत असेल, तर त्यांना त्या बदल्यात एक चांगला चित्रपट पाहायला मिळावा.

चित्रपट निर्मात्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमांचे  त्यांनी कौतुक केले; मात्र बजेटमध्ये वाढ होत नाही आणि त्यामुळे अनेक अडचणी  निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. बजेट कमी असेल तर पडद्यावरची भव्यता, तपशील इत्यादी घटते. कथा जिवंत करायची असेल तर पटकथेत काटछाट करून चालत नाही, असे त्यांनी सांगितले. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीच्या यशाचा त्यांनी प्रेरणादायी उदाहरण म्हणून उल्लेख केला.

या संवादातून एक गोष्ट स्पष्टपणे समोर आली की, ‘गोंधळ’ हा केवळ एक चित्रपट नाही. तो भूतकाळ आणि वर्तमान, परंपरा आणि वास्तव, स्मृती आणि आधुनिकता यांना जोडणारा दुवा आहे. दिग्दर्शक आणि अभिनेत्याने निर्मिती प्रक्रियेचे स्तर उलगडत गेल्याने ही पत्रकार परिषद केवळ एक माध्यम घटना न राहता, अस्तित्व टिकवण्यासाठी झगडणाऱ्या एका कलावैभवाला केलेले अभिवादन आहे असे वाटले, तसेच  दुर्लक्षित होत चाललेल्या संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाची चाहूल देणारा ठरला.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs