हमाल दे धमाल' चित्रपटाच्या रम्य आठवणींना उजाळा रविवारी `विशेष शो'ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
हमाल दे धमाल' चित्रपटाच्या रम्य आठवणींना उजाळा
रविवारी `विशेष शो'ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई :२२ मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर एकेकाळी राज्य केलेल्या `हमाल दे धमाल' चित्रपटाच्या `विशेष शो'ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या चित्रीकरण व प्रदर्शनानंतरच्या अनेक रम्य आठवणींना उजाळा निघाला. या चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे (लक्षा) यांच्या आठवणींनी रसिक गहिवरून गेले होते.
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या वतीने प्रसिद्ध कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात `हमाल दे धमाल' चित्रपटाचा रविवारी विशेष शो पार पडला. पडद्यावरील लक्षाच्या एन्ट्रीचे रसिकांनी जोरदार टाळ्या वाजवत स्वागत केले. या वेळी पुरुषोत्तम बेर्डे, विजय पाटकर, जयवंत वाडकर , समीर आठल्ये, चेतन दळवी यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी या चित्रपटातील काही आठवणी , काही किस्से प्रेक्षकांसोबत शेअर केले. तसेच प्रिया बेर्डे यांची विशेष उपस्थिती असल्याने कार्यक्रमाला रंगत आली.
दरम्यान, चित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय संचालक दरम्यान प्रशांत साजणीकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
चित्रपटाचे दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी केले असून मुलाखती दरम्यान त्यांनी लक्ष्मीकांत यांच्या आठवणी सांगितल्या. या चित्रपटातील सर्वांत गाजलेली भूमिका लक्ष्मीकांत यांची होती. त्यांच्यावर मराठी चित्रपट रसिकांनी खूप प्रेम केले. त्यांचा अभिनय आजही आपल्यात आहे व कायम राहील, असे पुरुषोत्तम बेर्डे यांनी सांगितले. या वेळी विजय पाटकर व जयवंत वाडकर यांनीही काही किस्से सांगितले.

Comments
Post a Comment