युनियन बँक ऑफ इंडियाचे वित्तीय निकाल जाहीर
युनियन बँक ऑफ इंडियाचे वित्तीय निकाल जाहीर
युनियन बँक ऑफ इंडियाने ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीचे लेखापरीक्षित वित्तीय निकाल जाहीर केले आहेत. बँकेचा निव्वळ नफा ५,०१७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत चांगला सुधार आहे. व्याज उत्पन्न २६,४४३ कोटी रुपये नोंदवले गेले.बँकेचा एकूण व्यवसाय वार्षिक ५.०४ टक्क्यांनी वाढून २२,३९,७४० कोटी रुपयांवर गेला आहे. यात एकूण कर्जवाटपात ७.१३ टक्के तर ठेवींमध्ये ३.३६ टक्के वाढ झाली आहे. किरकोळ, कृषी आणि लघु-मध्यम उद्योग क्षेत्रातील कर्जवाटपात वार्षिक ११.५० टक्के वाढ नोंदवली गेली. यात किरकोळ कर्ज २१.६७ टक्के तर लघु-मध्यम उद्योग कर्ज १९.७५ टक्क्यांनी वाढले.
थकित कर्जाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. एकूण थकित कर्ज (जीएनपीए) ३.०६ टक्के आणि निव्वळ थकित कर्ज (एनएनपीए) ०.५१ टक्के झाले आहे. भांडवल पर्याप्तता गुणोत्तर १६.४९ टक्के तर सीईटी-१ गुणोत्तर १३.९४ टक्के आहे. मागील तिमाहीच्या (सप्टेंबर २०२५) तुलनेत निव्वळ नफ्यात १८.०७ टक्के वाढ झाली. एकूण कर्जवाटप ४.२७ टक्क्यांनी वाढले, तर ठेवींत ०.९५ टक्के घट झाली. चालू-बचत खात्यांमध्ये (कासा) ३.२९ टक्के वाढ झाली.
आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या नऊ महिन्यांत (डिसेंबर २०२५ पर्यंत) निव्वळ नफा १३,३८१ कोटी रुपये झाला आहे, जो गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २.९१ टक्क्यांनी अधिक आहे. बँकेचे देशभरात ८,६७१ शाखा (परदेशी शाखांसह), ८,३०० एटीएम, २६,५४१ व्यवसाय प्रतिनिधी केंद्रे, १,६७५ सुवर्णकर्ज केंद्रे आणि १२ मोठ्या कॉर्पोरेट तसेच ३८ मध्यम कॉर्पोरेट शाखा कार्यरत आहेत.
वित्तीय समावेश योजनांत बँकेने चांगली कामगिरी केली आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेत ३.३७ कोटी खाती उघडली असून त्यात १४,४९८ कोटी रुपये जमा आहेत. तिमाहीत प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेत ३.५३ लाख आणि सुरक्षा बीमा योजनेत १०.३४ लाख नवीन नोंदण्या झाल्या. अटल पेन्शन योजनेत २.८५ लाख नवीन सदस्य जोडले गेले. महिला उद्योजिकांसाठी ‘युनियन नारी शक्ती’ योजनेत ३,५७६ प्रस्तावांना ६११ कोटी रुपये मंजूर केले. हरित ऊर्जा क्षेत्रात ३४,९६७ कोटी आणि ‘युनियन ग्रीन माईल्स’ योजनेत १,६३७ कोटी रुपयांची कर्जे मंजूर झाली आहेत.

Comments
Post a Comment