पितृत्वालाही वयोमर्यादा : वैज्ञानिक संशोधनातून सत्य जाणून घ्या
पितृत्वालाही वयोमर्यादा : वैज्ञानिक संशोधनातून सत्य जाणून घ्या
लेखक: डॉ. निलेश उन्मेश बलकवडे,
प्रादेशिक वैद्यकीय प्रमुख - वाकड, ओएसिस फर्टिलिटी
आजवर प्रजनन क्षमता या विषयांत केवळ महिलांच्या वयाला महत्त्व दिले गेले आहे. मात्र वडिलांचे वाढते वयही गर्भधारणा, गर्भाचा विकास आणि संततीच्या आरोग्यावर परिणामकारक ठरु शकतो, असे संशोधनातून समोर आले आहे.
गर्भधारणा तसेच अपत्यप्राप्तीकरिता मातेचे वय महत्त्वाचे मानले जाते. मात्र संततीप्राप्तीसाठी केवळ आईच्याच नव्हे तर वडिलांचेही वय महत्त्वाचे ठरते हे आता संशोधनातून समोर येत आहे. गर्भधारणेसाठी केवळ मातेचेच नव्हे तर वडिलांचे वयदेखील परिणामकारक ठरते. संततीप्राप्तीसाठी वडिलांचे वय उलटून गेले असेल तर गर्भधारणेत समस्या उद्भवतात. याचा फटका नवजात शिशूलाही बसतो. गर्भधारणेची शक्यता धूसर होत जाते. गर्भधारणा झाल्यानंतरही प्रसूतीकाळापर्यंत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गर्भाशयातील मूलाच्या आरोग्याला सतत धोका जाणवतो. मूल जन्मल्यानंतरही आरोग्याच्या तक्रारी सुरु राहतात. वडिलांचे वय जास्त असल्यास जन्मलेल्या मूलाच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम दिसून येतो, असे या संशोधनातून स्पष्टपणे नमूद आले आहे.
गर्भधारणेच्या वेळी वडिलांचे वय का महत्त्वाचे असते ?
गर्भधारणेच्यावेळी पुरुषाच्या वयाला ‘वडिलांचे वय’ असे संबोधले जाते. किशोरवयापासूनच पुरुषांमधील प्रजनन क्षमतेची सुरुवात होते. या वयात त्यांच्या शरीरात बदल होत असतात. या बदलांमुळे शुक्राणूंची निर्मिती आणि टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाचा स्त्राव सुरु होतो. विसाव्या वर्षी शुक्राणूंची संख्या, त्यांची हालचाल आणि संप्रेरकांचे संतुलन हळूहळू स्थिर होते.
साधारणपणे वयाच्या २५ ते ३५ वर्षांच्या दरम्यान पुरुषांची प्रजनन क्षमता पूर्णपणे विकसित झालेली असते. या वयोगटातील पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या स्थिरावते. त्यांना पुरेशी गती प्राप्त होते. डीएनएची गुणवत्ताही सुधारते. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते. गर्भधारणेतील भ्रूण निरोगी जन्माला येण्याची शक्यता दुणावते.
मात्र, पुरुषांमधील ही सक्षम प्रजनन क्षमता उतारवयात क्षीण होते.
नकळत कमी होत जाणारी पुरुषांची प्रजनन क्षमता
मुळात पुरुषांना महिलांप्रमाणे प्रजनन क्षमतेच्या वयोमर्यादेच्या समस्या उद्भवत नाही. त्यांच्या शरीरात आयुष्यभर शुक्राणूंची निर्मिती होत असते. वाढत्या वयानुसार शुक्राणूंच्या गुणवत्तेत बदल होतो. हे शुक्राणू शरीरात मुबलक प्रमाणात असले तरीही उतारवयात त्यांची गुणवत्ता कमी होत जाते. विविध संशोधनानुसार, वयाच्या पस्तीशीनंतर शुक्राणूंमध्ये सूक्ष्म बदल घडायला सुरुवात होते. त्यांची हालचाल मंदावते. शुक्राणूंचा आकार आणि रचनाही बदलते. वीर्याचे प्रमाण कमी होते. शुक्राणूंना स्त्रीच्या अंड्यापर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो. याचा थेट परिणाम फलन प्रक्रियेवर होतो. परिणामी, गर्भधारणा होण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो.
वाढत्या वयाचा फटका डीएनएलाही बसतो. शुक्राणूंच्या डीएनएची गुणवत्ता घटते. वाढत्या वयात शरीरात शुक्राणू तयार करणा-या पेशींचे विभाजन होते. ही विभाजनाची प्रक्रिया सतत घडत असल्याने जनुकीय रचनेत चुका होण्याची शक्यता बळावते. कालांतराने डीएनए फ्रॅग्मेंटेशनची समस्या उद्भवते. शुक्राणूंमधील जनुकीय घटकांमध्ये बिघाड होतो. हे बदल शरीराच्या अंतर्रचनेत घडत असल्याने बाहेरुन दिसून येत नाहीत. मात्र, त्यांचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. अशा बदलांमुळे गर्भधारणेची शक्यता कमी होऊ शकते. गर्भाशयातील भ्रूणाच्या विकासावरही परिणाम होण्याची शक्यता असते.
वयस्कर वडिलांमुळे गर्भ आणि संततीच्या आरोग्यावर होणारा परिणाम
वाढत्या वयासोबत पुरुषांमध्ये सतत जनुकीय बदल होत असल्याचे दिसून येते. यातील बहुतांश बदल निरुपयोगी ठरतात. मात्र काही बदलांचा गर्भाच्या विकासावर तसेच मूल जन्मल्यानंतर त्याच्या आरोग्यावरही परिणाम होतो. विविध संशोधनानुसार, वयस्कर पुरुषांमुळे गर्भपाताचा धोका संभवतो. यामध्ये शुक्राणूंमधील जनुकीय दोष आणि इतर घटक कारणीभूत ठरतात. अशा बदलांमुळे गर्भाशयात फलित अंड्याचे रोपण योग्यरित्या होत नाही. सुरुवातीच्या टप्प्यातच गर्भाची वाढ खुंटण्याची भीती असते. गर्भधारणा टिकून राहण्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कुटुंब नियोजनाच्या निर्णय प्रक्रियेत पुरुषांचे वय हा घटक फार महत्त्वाचा ठरतो.
यशस्वीरित्या गर्भधारणा झाल्यानंतरही बाळाच्या आरोग्यावरचे संकट गडदच होत जाते, असे विविध संशोधनाच्या अहवालातून अधोरेखित करण्यात आले आहे. वडिलांचे वय जास्त असल्यास जन्मलेल्या मुलामध्ये जनुकीय आणि मज्जासंस्थेशी संबंधित विकारांचा धोका जास्त असतो. यामध्ये ‘ऑटिझम स्पेक्ट्रम डिसोर्डर’ आणि ‘स्किझोफ्रेनिया’ यांसारख्या विकारांचा समावेश आहे. आईच्या वयापेक्षाही वडिलांचे वय हे मुलांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. वडिलांचे वय जास्त असल्यास मुलाचे आरोग्य आणि एकूण विकासावर व्यापक परिणाम दिसून येतो. मात्र या आजाराचे संभाव्य धोके फारच कमी असतात, असेही तज्ज्ञांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
योग्य वयात मूल जन्माला घालणे याकरिता पुरुषांचे वयही महत्त्वाचे असते हे सिद्ध होते. हा केवळ प्रजनन क्षमतेपुरता मर्यादित असून, एकूण प्रजनन आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा विषय ठरतो.
पुरुषांची प्रजननक्षमता: वाढत्या वयासोबत बदलणारे वास्तव
पुरुषांच्या प्रजनन क्षमतेसाठी कोणताही ठराविक सार्वत्रिक वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. अनेक पुरुष वाढत्या वयातही पितृत्वाचा आनंद घेऊ शकतात. मात्र मूल जन्माला घालणे आणि त्यासाठी शरीराची पूर्णपणे तयारी असणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असतात.
पुरुषांची प्रजनन क्षमता वाढत्या वयामुळे संपुष्टात येत नाही, असे अनेक अभ्यासांतून सिद्ध झाले आहे. प्रजनन प्रक्रियेची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. वयाच्या पस्तीशीनंतर शुक्राणूंच्या गुणवत्तेत लक्षणीय बदल दिसू लागतात. चाळीशीनंतर हे बदल प्रखरतेने दिसून येतात. हा नैसर्गिक बदल तसेच याबाबतीतील कालमर्यादा समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तरुण जोडप्यांना कुटुंब नियोजनाबत योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.
जागरूकता, घबराट नव्हे
पुरुषांची प्रजननक्षमता स्थिर असते, हा समाजमनात गैरसमज असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मुळात पुरुषांची प्रजनन क्षमता ही त्यांचे वय, जीवनशैली आणि आरोग्य या तीन घटकांवर अवलंबून असते. याबाबत आवश्यक जनजागृती करणे, सतर्कता निर्माण करणे, हा या संशोधनामागील मुख्य उद्दिष्ट आहे. या संशोधनामुळे पुरुषांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, पुरुषांना वयानुसार शरीरात होणा-या नैसर्गिक बदलांबाबत पुरेशी माहिती असायला हवी.
खरेतर शरीरातील इतर जैविक प्रक्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या प्रजनन क्षमतेत लवचिकता पाहायला मिळते. पुरुषांच्या शरीरात शुक्राणूंची निर्मिती ही सतत घडणारी प्रक्रिया असते. या निर्मितीची गुणवत्ता चांगली राखता यावी, याकरिता आवश्यक काळजी घ्यायला हवी. निरोगी जीवनशैली, वैद्यकीय उपचार, नियोजित प्रजनन यावर लक्ष केंद्रित करायला हवे. वाढत्या वयानुसार निर्माण होणा-या समस्यांवर मात करण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. हा सकारात्मक दृष्टीकोन जोडप्यांना पालकत्व स्विकारण्यासाठी सक्षम बनवतो.
आरोग्याशी संबंधित इतर घटकांप्रमाणेच पितृत्वाबद्दलही सखोल माहितीच्या आधारे निर्णय घेणे योग्य ठरते. पुरुषांच्या बाबतीतील वयाचा घटक महिलांच्या तुलनेत फारसा लक्षात येत नाही. परंतु पुरुषांनाही वयाची मर्यादा लागू होते. ही प्रक्रिया शांतपणे घडते. अनेकदा दुर्लक्षित राहते. त्यामुळे निरोगी भविष्यासाठी याकडे वेळीच लक्ष द्यायला हवे.
Comments
Post a Comment