गजा अल्टरनेटिव्ह अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडचा आयपीओ बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी खुला होणार
गजा अल्टरनेटिव्ह अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडचा आयपीओ बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी खुला होणार
गजा अल्टरनेटिव्ह अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीचा प्राथमिक समभाग विक्रीचा प्रस्ताव म्हणजे आयपीओ बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी खुला होणार आहे. या आयपीओसाठी प्रति समभाग १५२ रुपये ते १६० रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येकी ५ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्ससाठी किमान किंमत दर्शनी मूल्याच्या ३०.४० पट तर कमाल किंमत ३२.०० पट इतकी आहे.
या ऑफरची बोली बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी खुली होईल आणि शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीची प्रक्रिया मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी होईल. प्रत्येकी ५ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या किमान ९३ समभागांसाठी बोली लावता येईल. त्यानंतर ९३ समभागांच्या पटीत बोली लावता येणार आहे.
या ऑफरचा एकूण आकार ५५० कोटी रुपये इतका आहे. यामध्ये ४५० कोटी रुपयांचे नवीन समभाग जारी करण्यात येणार आहेत तर १०० कोटी रुपयांच्या समभागांचा विक्री प्रस्ताव समाविष्ट आहे. नवीन समभागांच्या विक्रीतून मिळणारा निव्वळ निधी कंपनी काही विशिष्ट उद्देशांसाठी वापरणार आहे. फंड-४ अंतर्गत असलेल्या पुढील निधींमध्ये प्रायोजक म्हणून असलेली उर्वरित आर्थिक बांधिलकी पूर्ण करण्यासाठी तसेच ब्रिज लोनची परतफेड करण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. यामध्ये गजा कॅपिटल इंडिया फंड २०२० एलएलपी, गजा कॅपिटल इंडिया फंड २०२१ तसेच ब्रिज लोन रक्कम यांचा समावेश आहे. प्रस्तावित फंड-५ मधील प्रायोजक म्हणून असलेली बांधिलकी पूर्ण करण्यासाठी आणि सेकंडरीज फंडमधील प्रायोजक बांधिलकीसाठीही हा निधी वापरण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरली जाईल.
दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस अंतर्गत ऑफर करण्यात येणारे हे समभाग बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. या ऑफरसाठी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज हा नामनिर्देशित शेअर बाजार असेल. जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
ही ऑफर सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट नियम, १९५७ मधील नियम १९ (२) (ब) तसेच सेबी आयसीडीआर नियमावलीतील नियम ३१ आणि नियम ६ (१) यानुसार बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे आणली जात आहे. या ऑफरपैकी कमाल ५० टक्के इतकाच हिस्सा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला जाईल. कंपनीला बुक रनिंग लीड मॅनेजर्स यांच्याशी सल्लामसलत करून पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार हिश्शापैकी ६० टक्क्यांपर्यंत हिस्सा अँकर गुंतवणूकदारांना वाटप करण्याचा अधिकार असेल. या अँकर गुंतवणूकदार हिश्शापैकी ३३.३३ टक्के हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी आणि ६.६७ टक्के हिस्सा आयुर्विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांसाठी राखीव असेल. अँकर गुंतवणूकदारांच्या भागाला संपूर्ण प्रतिसाद न मिळाल्यास उर्वरित समभाग उर्वरित पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार हिश्शात समाविष्ट केले जातील.
निव्वळ पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार हिश्शापैकी ५ टक्के हिस्सा केवळ म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध असेल. सेबी आयसीडीआर नियमावलीनुसार ऑफरपैकी किमान १५ टक्के हिस्सा बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. या हिश्शापैकी एक-तृतीयांश हिस्सा २ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतच्या बोलींच्या अर्जांसाठी तर दोन-तृतीयांश हिस्सा १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या अर्जांसाठी राखीव असेल. ऑफरपैकी किमान ३५ टक्के हिस्सा किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल.
Comments
Post a Comment