'सुप्रा पॅसिफिक फायनान्शियल सर्व्हिसेस'चे देशभरात ५०० शाखांच्या विस्ताराचे लक्ष्य
'सुप्रा पॅसिफिक फायनान्शियल सर्व्हिसेस'चे देशभरात ५०० शाखांच्या विस्ताराचे लक्ष्य
मुंबईत नवीन कॉर्पोरेट कार्यालयाचा शुभारंभ; द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी शहरे तसेच ग्रामीण भारतात आर्थिक समावेशकता वाढवण्याची योजना
मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सूचीबद्ध 'बँकेतर वित्तीय कंपनी' (एनबीएफसी) 'सुप्रा पॅसिफिक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड'ने आज आपल्या दीर्घकालीन विकास धोरणाचा भाग म्हणून एक महत्त्वाकांक्षी विस्तार योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षांत १५ राज्यांमध्ये ५०० शाखा सुरू केल्या जाणार असून, २५०० कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या टप्प्याचे उद्दिष्ट ठेवून कंपनी काम करत आहे.
कंपनीने मुंबईतील अंधेरी येथील आपल्या नवीन कॉर्पोरेट कार्यालयाचा दिमाखदार शुभारंभही या निमित्ताने केला. या कार्यक्रमास 'फायनान्स इंडस्ट्री डेव्हलपमेंट कौन्सिल'चे (एफआयडीसी) अध्यक्ष श्री. महेश ठक्कर आणि 'सुप्रा पॅसिफिक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. मनोज रवी यांच्यासह उद्योगातील दिग्गज, प्रमुख भागधारक आणि कंपनीच्या व्यवस्थापनातील नेतृत्वदायी संघाचे सदस्य उपस्थित होते.
विस्तार योजनेचा भाग म्हणून, सुप्रा पॅसिफिक गुजरात, दिल्ली, राजस्थान, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांमध्ये नव्याने विस्तार करणार आहे, तसेच केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमधील आपल्या कामकाजात वाढ करणार आहे. सध्याच्या टप्प्यात, कंपनी गोव्यात पाच नवीन शाखा सुरू करणार असून, यामुळे अपुऱ्या आर्थिक सुविधा असलेल्या भागांमध्ये औपचारिक वित्तीय सेवांची उपलब्धता वाढण्यावर भर देणार आहे.
कंपनीने दमदार प्रगती नोंदवली असून, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तिच्या मालमत्तेत ६४.३९ टक्के वाढ झाली आणि मालमत्ता २९० कोटी रुपयांवरून ४९९ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. चालू आर्थिक वर्षात ७५० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा टप्पा गाठण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे, जेणेकरून तीन वर्षांत २,५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करता येईल.
सुप्रा पॅसिफिक आपल्या कर्ज व्यवसायात विविधता आणण्याचे काम सातत्याने करत आहे. यामध्ये गोल्ड लोन (सोने तारण कर्ज), मायक्रोफायनान्स (सूक्ष्म वित्तसाह्य), वाहन कर्ज आणि व्यावसायिक कर्जांचा समावेश आहे. तसेच, कंपनी व्यापारी आणि एमएसएमईंसाठी (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतची 'खेळते भांडवल' कर्जे सुरू करण्याची योजना आखत आहे. यासह, जलद आणि अधिक सुलभ डिजिटल वित्तीय सेवा पुरवण्यासाठी कंपनी एक नवीन मोबाइल ॲप्लिकेशनही सादर करणार आहे.
कंपनीच्या विस्तार योजनांवर भाष्य करताना, 'सुप्रा पॅसिफिक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रवी म्हणाले , "भारताची विकासाची वाटचाल ही विशेषतः द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी शहरे, ग्रामीण भाग आणि देशाच्या दुर्गम क्षेत्रांमधील पतपुरवठ्यातील तफावत भरून काढण्याची एक मोठी संधी उपलब्ध करून देते. आर्थिक समावेशकतेच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली असली, तरी अनेक भागांमध्ये औपचारिक कर्ज सुविधांची – विशेषतः सोने तारण कर्ज (गोल्ड लोन) आणि लघु-व्यवसाय कर्जांची – उपलब्धता अजूनही मर्यादित आहे. देशभरात आमचे अस्तित्व अधिक बळकट करून, भारताच्या आर्थिक समावेशकतेच्या उद्दिष्टांमध्ये अर्थपूर्ण योगदान देण्याचे आणि 'विकसित भारत २०४७' या राष्ट्रीय संकल्पनेला पाठिंबा देण्याचे आमचे ध्येय आहे."
दीर्घकालीन विकास धोरणाचा एक भाग म्हणून, कंपनी पुढील तीन वर्षांत आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या ७०० वरून २,००० पेक्षा जास्त करण्याच्या तयारीत आहे. तसेच, भविष्यातील विस्तार योजनांना बळ देण्यासाठी आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये 'अपरिवर्तनीय रोखे' (नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स - एनसीडी) सार्वजनिकरित्या जारी करण्याचीही कंपनीची योजना आहे.
तंत्रज्ञानावर आधारित नावीन्य, जबाबदार कर्जपुरवठा आणि ग्राहकाभिमुख सेवांवर विशेष लक्ष केंद्रित करून, 'सुप्रा पॅसिफिक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' देशभरात सर्वसमावेशक विकासाला चालना देणारा एक विश्वासार्ह आर्थिक भागीदार म्हणून आपली स्थिती अधिक मजबूत करत आहे.
Comments
Post a Comment