गणपतीच्या उत्साहाला न्युकेलियाची अनोखी मानवंदना; नव्या ‘आला रे आला’ गाण्याची विशेष झलक सादर
गणपतीच्या उत्साहाला न्युकेलियाची अनोखी मानवंदना;
नव्या ‘आला रे आला’ गाण्याची विशेष झलक सादर
मुंबई, 1 सप्टेंबर: भारतातील आघाडीच्या आणि प्रभावशाली इलेक्ट्रॉनिक संगीत कलाकारांपैकी एक असलेल्या न्युकेलियाने आपल्या आगामी ‘आला रे आला’ या गाण्याची खास झलक सादर केली. भारतीय लोकसंगीत आणि पॉप-कल्चरमधील प्रभावांना ग्लोबल बास म्युझिकसोबत अनोख्या पद्धतीने जोडणाऱ्या न्युकेलियाने चिंचपोकळीचा चिंतामणी गणपतीच्या पवित्र आगमन सोहळ्यानिमित्त ही झलक म्हणून अनोखी मान वंदना दिली
‘कूचा मॉन्स्टर’, ‘बास राणी’ आणि ‘राजा बाजा’ यांसारख्या गाजलेल्या संगीतनिर्मितींसाठी तसेच EDC लास वेगास, NH7 वीकएंडर आणि सुंबर्न यांसारख्या मोठ्या संगीत महोत्सवांमधील दमदार सादरीकरणांसाठी न्युकेलिया ओळखला जातो. भारतीय आणि जागतिक संगीतप्रवाहांचा अनोखा संगम घडवणाऱ्या त्याच्या संगीताने भारतातील समकालीन इलेक्ट्रॉनिक संगीताच्या क्षेत्रावर स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे.
चिंचपोकळीचा चिंतामणी गणपतीच्या आगमन सोहळ्यात ‘आला रे आला’ची विशेष झलक सादर करणे हे न्युकेलियासाठी एका अर्थाने भावनिक घरवापसीच ठरली. मुंबई आणि तिच्या गणेशोत्सवाशी असलेले त्याचे दीर्घकाळचे नाते या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले. यापूर्वीही न्युकेलियाने आपल्या संगीताच्या माध्यमातून गणपती उत्सवाचा जल्लोष साजरा केला आहे. 2015 मध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी त्याने ‘बास राणी’ हा प्रसिद्ध अल्बम लाँच केला होता.
‘आला रे आला’च्या माध्यमातून न्युकेलिया पुन्हा एकदा गणेशोत्सवातील ऊर्जा, भावना आणि भव्य उत्साहाला आपल्या खास संगीतशैलीतून मानवंदना देत आहे. या गाण्याची झलक गणेशोत्सवाची ओळख असलेल्या उत्साहपूर्ण वातावरणाचे आणि संसर्गजन्य जल्लोषाचे दर्शन घडवते. न्युकेलियाच्या दमदार इलेक्ट्रॉनिक संगीताचा अनोखा ठेका आणि मुंबईच्या उत्सवी वातावरणाची रंगत यांचा सुंदर संगम या गाण्यात अनुभवायला मिळतो.
न्युकेलिया म्हणाला, “गणपतीचा उत्सव माझ्या मनात नेहमीच एक विशेष स्थान राखून आहे. या काळात मुंबईत जाणवणारी ऊर्जा इतर कशासारखीच नाही. या उत्सवात लोक, संगीत आणि जल्लोष एका अतिशय सुंदर पद्धतीने एकत्र येतात. 2015 मध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी मी ‘बास राणी’ लाँच केला होता. त्यामुळे यंदा पवित्र आगमन सोहळ्याच्या निमित्ताने ‘आला रे आला’ची झलक घेऊन पुन्हा परतणे माझ्यासाठी खूप खास आहे.”
मात्र, न्युकेलियासाठी भारताच्या उत्सवी संस्कृतीशी असलेले नाते केवळ पारंपरिक संगीत कार्यक्रम किंवा मोठ्या मंचांपुरते मर्यादित नाही. भविष्यात या उत्सवांचा अनुभव थेट त्या परिसरांमध्ये आणि समुदायांमध्ये घेऊन जाण्याची त्याची इच्छा आहे, जिथे या उत्सवांची खरी ऊर्जा निर्माण होते.
तो पुढे म्हणाला, “अशा प्रकारचे आणखी उत्सव साजरे करायला मला नक्कीच आवडेल. ‘गली सर्किट’सारखी संकल्पना मला प्रत्यक्षात आणायची आहे, ज्यामध्ये उत्सवाच्या काळात मी संगीताचा हा अनुभव शहरातील गल्ल्यांमध्ये आणि विविध परिसरांमध्ये घेऊन जाईन. केवळ मोठ्या मंचांवर कार्यक्रम करण्याऐवजी, या शहरांना त्यांची ओळख देणाऱ्या लोकांपर्यंत आणि समुदायांपर्यंत संगीत आणि जल्लोष थेट पोहोचवायचा आहे.”
ही संकल्पना न्युकेलियाच्या संगीताला पारंपरिक कॉन्सर्टच्या चौकटीबाहेर घेऊन जाण्याच्या व्यापक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. भारतातील सर्वाधिक उत्साही आणि रंगतदार उत्सवांना प्रेरणा देणाऱ्या समुदायांच्या अगदी जवळ संगीत पोहोचवण्याची त्याची ही दृष्टी आहे. ‘आला रे आला’च्या माध्यमातून तो समकालीन इलेक्ट्रॉनिक संगीताचा ठेका भारतीय सांस्कृतिक लयींसोबत जोडत आहे आणि भविष्यात अधिक जवळच्या, जिव्हाळ्याच्या आणि समुदाय-केंद्रित उत्सवांचा अनुभव निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
*‘आला रे आला’*च्या रिलीजची उत्सुकता वाढत असताना, या विशेष मानवंदनेमुळे भारतातील तरुणाई, संस्कृती आणि उत्सवांच्या भावनेशी न्युकेलियाचे दीर्घकाळचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
भारताच्या प्रभावशाली इलेक्ट्रॉनिक संगीत कलाकारांपैकी एक असलेला न्युकेलिया भारतीय लोकसंगीत आणि पॉप-कल्चरमधील प्रभावांना ग्लोबल बास म्युझिकसोबत अनोख्या पद्धतीने जोडण्यासाठी ओळखला जातो. ‘कूचा मॉन्स्टर’, ‘बास राणी’ आणि ‘राजा बाजा’ यांसारख्या गाजलेल्या संगीतनिर्मितींपासून ते EDC लास वेगास, NH7 वीकएंडर आणि सुंबर्न यांसारख्या आंतरराष्ट्रीय आणि देशातील प्रमुख संगीत महोत्सवांमधील सादरीकरणांपर्यंत, त्याने भारताच्या समकालीन इलेक्ट्रॉनिक संगीतविश्वाला आकार देणारी स्वतःची वेगळी संगीतभाषा आणि वारसा निर्माण केला आहे.
Comments
Post a Comment