घरगुती पाहुणचारात वाढतोय प्रीमियम फूड डिलिव्हरीचा ट्रेंड
घरगुती पाहुणचारात वाढतोय प्रीमियम फूड डिलिव्हरीचा ट्रेंड
~ खास प्रसंगांसाठी प्रीमियम रेस्टॉरंट्समधून फूड ऑर्डर्स देण्याचे प्रमाण वाढले ~
रेस्टॉरंटमधून जेवण मागवणे ही आता केवळ सोयीची गोष्ट उरलेली नसून घरातील कौटुंबिक कार्यक्रम आणि मित्रांच्या पाहुणचारासाठी प्रीमियम रेस्टॉरंट्सच्या जेवणाला पसंती दिली जात आहे. रेडसीरच्या 'स्टेट ऑफ इंडियाज फूडसर्व्हिसेस मार्केट २०२६' या अहवालानुसार, देशातील फूड सर्व्हिस बाजारपेठेत ऑनलाइन डिलिव्हरीचा वाटा सध्या ११ टक्के असून पुढील पाच वर्षांत तो २० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हा बदलता ट्रेंड लक्षात घेता रेस्टॉरंट्सनी डिलिव्हरीकडे केवळ विक्रीचे माध्यम न पाहता आपल्या आदरातिथ्याचा (Hospitality) विस्तार म्हणून पाहायला हवे, असे मत बेलोना हॉस्पिटॅलिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि 'ईशारा'चे (Ishara) संस्थापक प्रशांत इस्सर यांनी व्यक्त केले आहे.
बदलत्या ग्राहकमानसिकतेवर प्रकाश टाकताना प्रशांत इस्सर म्हणाले, "जेव्हा कोणी कुटुंबीय किंवा मित्रांसोबतच्या डिनरसाठी अनेक पदार्थ ऑर्डर करतो, तेव्हा तो केवळ जेवण मागवत नसतो, तर यजमानपद भूषवत असतो. त्या संध्याकाळपुरते त्याने आमचे स्वयंपाकघर उसने घेतलेले असते. त्यामुळे जेवण वेळेत पोहोचण्यासोबतच, ज्या रेस्टॉरंटमधून ते आले आहे, त्याचा आदरातिथ्याचा मूळ अनुभव घरातही कायम राहाणे अत्यंत महत्त्वाचे आहे."
प्रीमियम रेस्टॉरंट्स आता प्रवासाचा विचार करून विशेष डिलिव्हरी मेन्यू तयार करत आहेत. रोटी-नानचा कुरकुरीतपणा टिकवणे, डंपलिंग्स सुरक्षित हाताळणे किंवा सॉस वेगळा पॅक करणे अशा विविध पातळ्यांवर बदल केले जात आहेत. तसेच, अशा मोठ्या ऑर्डर्ससाठी अति-वेगापेक्षा ठरलेल्या वेळेत आणि उत्तम स्थितीत जेवण पोहोचण्याला ग्राहक जास्त महत्त्व देत आहेत.
इस्सर यांनी पुढे नमूद केले की, "पूर्वी आम्ही आमच्या रेस्टॉरंटच्या दारात उभे राहून पाहुण्यांचे स्वागत करायचो. आता ते दार शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेले कोणाचे तरी घर असू शकते. तिथे जे पोहोचेल, त्यात आमची ओळख आणि गुणवत्ता स्पष्टपणे दिसावी, याची खात्री करणे हे आमचे ध्येय आहे. ग्राहकाने रेस्टॉरंटमध्ये डाइन-इन करावे किंवा घरी मागवावे, त्याला दोन्हीकडे एकसारखाच उत्कृष्ट अनुभव देणे हीच प्रीमियम रेस्टॉरंट्स समोरील मोठी संधी आहे."

Comments
Post a Comment