बीएमसी आणि मुंबई अग्निशमन दलाकडून दिवाळीनिमित्त अग्निसुरक्षेबाबत मार्गदर्शक सूचना जारी; अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन

 बीएमसी आणि मुंबई अग्निशमन दलाकडून दिवाळीनिमित्त अग्निसुरक्षेबाबत मार्गदर्शक सूचना जारी; अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन


मुंबई, ५ नोव्हेंबर २०२६: दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि मुंबई अग्निशमन दलाने मुंबईकरांना आनंद, उत्साह आणि जबाबदारीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. आगीच्या घटना आणि इतर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक अग्निसुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी, सजावटीसाठी पणत्यांचा वापर आणि विद्युत रोषणाई केली जाते. मात्र, आवश्यक ती खबरदारी न घेतल्यास यामुळे आग लागण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मुंबई अग्निशमन दलाने सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, सण साजरा करताना स्वतःची, कुटुंबीयांची तसेच आजूबाजूच्या नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई अग्निशमन दलाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी डॉ. दीपक घोष म्हणाले, "दिवाळी हा प्रकाश, आनंद आणि एकत्रितपणे सण साजरा करण्याचा उत्सव आहे. मात्र, हा आनंद साजरा करताना जागरूकता आणि जबाबदारीची जाणीव ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. फटाक्यांची आतषबाजी करणे, घरांमध्ये पणत्या लावणे आणि विद्युत रोषणाई करणे या दिवाळीच्या पारंपरिक पद्धती असल्या, तरी क्षणभराचा निष्काळजीपणा गंभीर आगीच्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो. नागरिकांनी इमारती, झाडे, उघड्या विद्युत वाहिन्या, गॅस पाइपलाइन आणि वाहनतळ यांपासून दूर असलेल्या मोकळ्या व सुरक्षित जागेतच फटाके फोडावेत. लहान मुलांना प्रौढ व्यक्तींच्या देखरेखीशिवाय कधीही फटाके फोडण्याची परवानगी देऊ नये. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक उंच इमारतीमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट उपलब्ध असावी आणि ती नसल्यास ती तातडीने बसविण्याची कार्यवाही करावी. आग लागल्याच्या आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी आणि आग विझवण्याच्या दृष्टीने हा सर्वात सुरक्षित आणि योग्य पर्याय आहे.”

मुंबई अग्निशमन दल आणि बीएमसीतर्फे सर्व मुंबईकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात येत असून, सुरक्षिततेचे नियम पाळून जबाबदारीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई अग्निशमन दलाने जारी केलेल्या महत्त्वाच्या अग्निसुरक्षा मार्गदर्शक सूचना

काय करावे (DO’s)

१. फटाके फोडताना नेहमी सुती कपडे परिधान करावेत. नायलॉन किंवा पॉलिस्टरचे कपडे घालणे टाळावे.

२. लहान मुलांना कधीही एकट्याने फटाके फोडू देऊ नयेत. फटाके फोडताना प्रौढ व्यक्तीने त्यांच्यासोबत असणे आवश्यक आहे.

३. फटाके फोडताना बंद पादत्राणे आणि डोळ्यांच्या संरक्षणासाठी सुरक्षा चष्मा वापरावा.

४. फटाके पेटवताना जवळ पाण्याची बादली ठेवावी. भाजल्यास प्रभावित भागावर तात्काळ भरपूर स्वच्छ पाणी ओतावे.

५. फटाके पेटवण्यासाठी लांब अगरबत्ती किंवा मेणबत्तीचा वापर करावा.

६. एका वेळी केवळ एकच फटका पेटवावा.

७. विद्युत रोषणाई करताना विद्युत जोडण्यांवर अतिरिक्त भार पडणार नाही किंवा सैल वायरिंग राहणार नाही, याची काळजी घ्यावी. सर्व विद्युत जोडणी आणि फिटिंगचे काम प्रशिक्षित इलेक्ट्रिशियनकडूनच करून घ्यावे.


काय करू नये (DON'Ts)

१. घरात, इमारतींच्या आतील भागात किंवा जिन्यांवर फटाके फोडू नयेत.

२. फटाके पेटवण्यासाठी आगपेटीतील काडी किंवा लायटरचा वापर करू नये.

३. झाडे, उघड्या विद्युत वाहिन्या किंवा उंच इमारतींच्या जवळ आकाशात उडणारे फटाके फोडणे टाळावे.

४. रॉकेट किंवा इतर फटाके कधीही माणसे, प्राणी किंवा घरांच्या दिशेने सोडू नयेत.

५. पडदे किंवा इतर ज्वलनशील वस्तूंच्या जवळ दिवे किंवा पणत्या ठेवू नयेत.

६. विद्युत केबल्स, गॅस पाइपलाइन किंवा वाहनतळाजवळ फटाके फोडू नयेत.

७. पेट न घेतलेला फटाका पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये. तो पूर्णपणे विझवण्यासाठी त्यावर पाणी टाकावे.

आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक


आगीची कोणतीही घटना किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ मुंबई अग्निशमन दलाशी १०१ या क्रमांकावर किंवा खालील आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा.

• ९०७६३३३१०१

• ९०७६३३३१०२

• ९०७६३३३१०३

• ९०७६३३३१०४

• ९०७६३३३१०५


नागरिक बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी १९१६ या क्रमांकावरही संपर्क साधू शकतात.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार