महानदी कोलफिल्ड्स लिमिटेडचा आयपीओ १९ नोव्हेंबर २०२६ रोजी खुला होणार
महानदी कोलफिल्ड्स लिमिटेडचा आयपीओ १९ नोव्हेंबर २०२६ रोजी खुला होणार
· प्रति समभाग ₹२ दर्शनी मूल्याच्या समभागासाठी ₹१२९ – ₹१३६ किंमतपट्टा निश्चित
· बोली/प्रस्ताव उघडण्याची तारीख – १९ नोव्हेंबर २०२६ आणि बोली/प्रस्ताव बंद होण्याची तारीख – २३ नोव्हेंबर २०२६
· किमान बोली लॉट ११० समभागांचा असून त्यानंतर ११० समभागांच्या पटीत बोली लावता येईल
महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (“कंपनी”) ने आपल्या प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावासाठी (आयपीओ) प्रति समभाग ₹२/- दर्शनी मूल्याच्या समभागाकरिता ₹१२९/- ते ₹१३६/- असा किंमतपट्टा निश्चित केला आहे.
कंपनीचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (“आयपीओ ” किंवा “प्रस्ताव”) १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि २३ नोव्हेंबर २०२६ रोजी बंद होईल.
गुंतवणूकदार किमान ११० समभागांसाठी आणि त्यानंतर ११० समभागांच्या पटीत बोली लावू शकतात.
आजच्या तारखेपर्यंत प्रति समभाग ₹२ दर्शनी मूल्याचे एकूण ६,६१८,३६३,००० समभाग जारी केलेले आहेत.
₹२ दर्शनी मूल्य असलेला हा आयपीओ प्रवर्तक – कोल इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे ६६१,८३६,३०० समभागांच्या विक्री प्रस्तावासाठी (Offer-for-Sale) आहे.
हा प्रस्ताव सेबी (ICDR) नियमांनुसार बुक-बिल्डिंग प्रक्रियेद्वारे सादर केला जात असून, यामध्ये निव्वळ प्रस्तावापैकी ५०% पेक्षा जास्त हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIBs) राखीव नसेल, तर बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NIIs) किमान १५% आणि किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी (RIIs) किमान ३५% हिस्सा राखीव असेल.
१९९२ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी आर्थिक वर्ष २०२६ मधील उत्पादनानुसार भारतातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी आहे, जिचा देशांतर्गत कोळसा उत्पादनात २१% वाटा आहे (स्रोत: क्रिसिल अहवाल). १ एप्रिल २०२६ पर्यंत, तालचेर आणि इब व्हॅली कोळसा क्षेत्रांमध्ये सुमारे १०६.७६ अब्ज टन इतका अंदाजित कोळसा साठा होता (स्रोत: क्रिसिल अहवाल). १ एप्रिल २०२६ पर्यंत, JORC संहितेनुसार कंपनीचा लेखापरीक्षित कोळसा साठा ९,८४०.३१ दशलक्ष टन इतका होता, जो सध्याच्या उत्पादन पातळीनुसार (आर्थिक वर्ष २०२६ मधील २१८.३१ दशलक्ष टन वार्षिक कोळसा उत्पादन) कंपनीचे उत्पादन कार्य सुमारे ४५ वर्षे टिकवून ठेवू शकतो (स्रोत: DMT अहवाल). मागील १० वर्षांच्या उत्पादनावर आधारित ४.७०% च्या चक्रवाढ वार्षिक वृद्धी दराने (CAGR) दरवर्षी उत्पादनात वाढ होईल असे गृहीत धरल्यास, हे कोळसा साठे सुमारे २५ वर्षे टिकतील (स्रोत: DMT अहवाल).
नॉन-कोकिंग कोळसा हे कंपनीचे प्रमुख उत्पादन आहे. कंपनी धुतलेल्या / शुद्ध केलेल्या कोळशासह नॉन-कोकिंग कोळशाच्या विविध श्रेणींचे उत्पादन करते. कंपनी राज्य वीज कंपन्या, खाजगी वीज कंपन्या, कॅप्टिव्ह पॉवर प्लांट्स आणि स्वतंत्र वीज उत्पादकांसह ऊर्जा क्षेत्राला, तसेच सिमेंट आणि स्पंज आयर्न क्षेत्रासारख्या बिगर-ऊर्जा उद्योगांना कोळसा पुरवते.
ही कंपनी कोल इंडिया लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असून तिला ३ डिसेंबर २०१९ रोजी 'मिनी रत्न श्रेणी १' दर्जा प्रदान करण्यात आला. ओडिशातील तालचेर आणि इब व्हॅली या दोन कोळसा क्षेत्रांमधून कोळसा उत्पादन वाढवून देशाची वाढती ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी, ३ एप्रिल १९९२ रोजी साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमधून वेगळी करून या कंपनीची स्थापना करण्यात आली.
कोल इंडिया लिमिटेडच्या उपकंपन्यांमध्ये ही कंपनी सर्वात मोठी कोळसा उत्पादक असून, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कोल इंडिया लिमिटेडच्या एकूण कोळसा उत्पादनात तिचा २८.४% वाटा होता (स्रोत: क्रिसिल अहवाल).
कंपनीने गेल्या काही वर्षांत आपल्या कामकाजाचा लक्षणीय विस्तार केला असून, तिचे कोळसा उत्पादन आर्थिक वर्ष २०२४ मधील २०६.१० दशलक्ष टनांवरून ५.९२% ने वाढून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये २१८.३१ दशलक्ष टनांवर पोहोचले आहे.
३० सप्टेंबर २०२६ पर्यंत, कंपनीकडे संपादित आणि भाडेतत्त्वावरील जमिनीसह सुमारे ३३,५०८.७९ हेक्टर (३३५.०९ चौरस किलोमीटर) जमीन होती, ज्यापैकी १६७.३७ चौरस किलोमीटर तालचेर कोळसा क्षेत्रात, १६५.९६ चौरस किलोमीटर इब व्हॅली कोळसा क्षेत्रात आणि उर्वरित १.७६ चौरस किलोमीटर ओडिशातील संबळपूर, भुवनेश्वर आणि पाटणागड येथे आहे. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत, कोळसा क्षेत्र (संपादन आणि विकास) कायदा, १९५७ नुसार कंपनीकडे ओडिशातील तालचेर आणि इब व्हॅली कोळसा क्षेत्रातील ३०,१९२.१४ हेक्टर जमिनीवर पृष्ठभागाच्या हक्कांसह खाणकाम करण्याचे हक्क होते. निहित, मालकीच्या किंवा भाडेतत्त्वावरील उर्वरित ३,३१६.६५ हेक्टर जमिनीचा वापर प्रामुख्याने वसाहती आणि संबंधित पायाभूत सुविधांसाठी केला जातो.
कंपनीच्या कार्यक्षेत्रात खुल्या (opencast) आणि भूमिगत खाणकाम प्रकल्पांसह कोळसा हाताळणी प्रकल्प, जलद लोडिंग प्रणाली आणि सायलो यांसारख्या वाहतूक पायाभूत सुविधा तसेच एका कोळसा शुद्धीकरण प्रकल्पाचा (coal washery) समावेश आहे.
३० सप्टेंबर २०२६ आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या सहामाही कालावधीत तसेच २०२६, २०२५ आणि २०२४ या आर्थिक वर्षांमध्ये कंपनीच्या एकूण कोळसा उत्पादनापैकी अनुक्रमे ९९.८३%, ९९.८२%, ९९.८५%, ९९.७९% आणि ९९.७८% उत्पादन खुल्या खाणींमधून (opencast mines) झाले आहे.
३० सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या सहामाही कालावधीत कंपनीचा ऑपरेशनल महसूल ₹१६०,९३०.४० दशलक्ष होता, जो ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या सहामाही कालावधीत ₹१४७,२४५.४० दशलक्ष इतका होता.
३० सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या सहामाही कालावधीत कंपनीचा करपश्चात नफा ₹४८,८०६.६० दशलक्ष होता, जो ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या सहामाही कालावधीत ₹४५,७३७.१० दशलक्ष इतका होता.
आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीचा ऑपरेशनल महसूल ₹३०५,४९५.९० दशलक्ष आणि करपश्चात नफा ₹१०६,९८१.२० दशलक्ष इतका होता.
एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, बीओबी कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड हे या प्रस्तावाचे बुक-रनिंग लीड मॅनेजर्स आहेत, तर केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड हे रजिस्ट्रार आहेत.
कंपनीचे समभाग नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) आणि बीएसई लिमिटेड (BSE) वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

Comments
Post a Comment